How to Store Potatoes the Right Way: भारतीय स्वयंपाकघर बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. बटाटा हा एक असा जिन्नस आहे, जो प्रत्येक पदार्थात वापरला जातो. बटाटा वापरून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता, त्यामुळे बटाटे मोठ्या प्रमाणात घरात उपलब्ध असतात. पण, पावसाळा किंवा उष्णतेच्या दिवसांत बटाटे पटकन सडतात, त्याला मोड येणे, हिरवे डाग पडणे किंवा ते मऊ होणे, असे काही ना काही होते आणि अखेर ते वापरण्यायोग्य राहत नाहीत. तुम्हीही अशा समस्येला नेहमी सामोरे जाता का? तर ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण- केवळ एक सोपी गोष्ट बटाट्यांचे आयुष्यमान वाढवू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असा पारंपरिक देशी उपाय, जो आपल्या आजी-आजोबांनी करून पाहिला आहे आणि जो आजही तितकाच प्रभावी आहे.
अंधाऱ्या आणि थंड जागेचं महत्त्व
बटाटे साठवताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते थंड, कोरड्या व अंधाऱ्या जागी ठेवणं. बटाटे उन्हाच्या संपर्कात आले की, त्यांना अंकुर फुटतात. त्यासाठी बटाट्यांना कपाटात, बंद कॅबिनेटमध्ये किंवा बेसमेंटसारख्या थंड जागी ठेवा; मात्र फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. कारण- तिथला थंडावा बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत करते, ज्यामुळे त्यांचा स्वाद बदलतो.
बटाटा आणि कांदा एकत्र? करू नका अशी चूक!
कांद्यातून निघणारा एथिलीन वायू बटाट्यांना लवकर खराब करतो. त्याऐवजी जर तुम्ही बटाट्यांसोबत एक-दोन सफरचंदे ठेवलीत, तर त्यामुळे बटाट्यांचे अंकुरण थांबवते.
प्लास्टिक नव्हे, कागद ठेवा!
प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या, जुने वर्तमानपत्र किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरा. प्लास्टिकमध्ये हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे बटाटे लवकर सडतात. तर कागद ओलसरपणा शोषून घेतो आणि बटाटे कोरडे व ताजे ठेवतो.
पुदिन्याची जादू
पुदिन्याच्या पानांचं काम खूप मोठं आहे. बटाट्यांमध्ये पुदिन्याची काही ताजी पानं ठेवा. त्यातून येणाऱ्या सुगंधामुळे एथिलीन वायू कमी होतो आणि बटाटे अंकुरणाच्या प्रक्रियेतून वाचतात. पानं कोमेजल्यावर नवीन पानं ठेवायला विसरू नका.
माती किंवा वाळूचा देसी जुगाड
आजींचा आजमावलेला एक जुना उपाय जर मोठ्या प्रमाणात बटाटे साठवायचे असतील, तर कोरडी माती किंवा वाळूच्या थरांमध्ये बटाटे पुरून ठेवा. वाळू वा माती प्रकाश आणि आर्द्रतेपासून संरक्षण करते आणि बटाट्यांना खराब होण्यापासून वाचवते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, सडलेले किंवा कापलेले बटाटे इतर चांगल्या बटाट्यांनाही खराब करतात, त्यामुळे साठवणुकीआधी प्रत्येक बटाटा नीट तपासा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

