Wheat Chapati Side Effects: भारतातील प्रत्येक घरात गव्हाच्या पिठाची पोळी हादेखील दैनंदिन आहारातील मुख्य भाग आहे. लोक ती भाज्या, डाळी आणि दुधाबरोबर मोठ्या आवडीने खातात. पोळी केवळ शरीराला ऊर्जाच देत नाही, तर तिचे अनेक फायदेही आहेत. तथापि, काही लोकांना गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर खूप अस्वस्थता जाणवते. मात्र, ही अस्वस्थता पोळीमुळे होत आहे की इतर कशामुळे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही आजार असलेल्या लोकांनी गव्हाची पोळी खाणे टाळायला हवे.

ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ऑक्झलेटची मात्रा मर्यादेपेक्षा जास्त असते. अशा व्यक्तींसाठी गव्हाची पोळी खाणे धोकादायक ठरते. अशा व्यक्तीने गव्हाच्या पोळीपासून लांबच राहायला हवे. गव्हाच्या पोळीमध्ये ऑक्झलेटची मात्रा जास्त असते आणि म्हणूनच आपण दिवसभरातून अनेक वेळा चपाती खात असतो. जर या घटकाची मात्रा आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाढली, तर भविष्यात आपल्याला अनेक गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात.

‘हे’ आजार असलेल्यांनी चुकूनही गव्हाची पोळी खाऊ नका

सेलिऍक रोग

हा एक स्वयंप्रतिरोधक विकार आहे, ज्यामध्ये शरीर ग्लुत्टेन पचवू शकत नाही. गहू खाल्ल्याने लहान आतड्याला इजा पोहोचते आणि पोषक तत्वांचे शोषण थांबते.

ग्लुटेन संवेदनशीलता

काही लोकांना सेलिऍक रोग नसतो; परंतु गहू खाल्ल्यावर त्यांना पोट फुगणे, गॅस, अतिसार किंवा पोटदुखीचा त्रास होतो. अशा लोकांनी गव्हाचे सेवन मर्यादित ठेवावे किंवा ते पूर्णपणे टाळावे.

गव्हाची अॅलर्जी

गहू खाल्ल्यानंतर शरीरात होणारी ही एक अॅलर्जीची प्रतिक्रिया आहे. त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नाक वाहणे ही याची लक्षणे आहेत.

इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS)

इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या काही लोकांना गव्हातील फ्रक्टॅन्स पचायला अवघड जातात. त्यामुळे गॅस आणि पचनाचा त्रास वाढू शकतो.

टाईप २ मधुमेह

गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. मधुमेहासाठी गहू पूर्णपणे वर्ज्य नसला तरी, रिफाईंड पीठ टाळावे आणि फक्त संपूर्ण गव्हाचेच सेवन करावे.

गव्हाच्या पोळीचे ‘या’ वेगळ्या पद्धतीने करा सेवन

बहुतेक लोक गव्हाच्या पिठाची पोळी अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनविण्यासाठी त्यामध्ये काही पौष्टिक पिठांचा वापर करतात.

गव्हाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पीठ

जवस पावडर
तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये जवस पावडरदेखील मिसळू शकता. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण खूप जास्त असते. जवस पावडर गव्हाच्या पिठात मिक्स केल्याने पोळीची चव वाढते.

ओट्स
ओट्समध्ये भरपूर पौष्टिक, फायर मँगनीज, मॅग्निशियम, फॉस्फरस आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही ओट्स गव्हाच्या पिठात मिसळू शकता. ते मिसळण्यासाठी ओट्स बारीक करून, त्याची पावडर बनवा आणि ते पिठात मिसळा. वजन कमी करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.

बेसन
तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये बेसनदेखील घालू शकता. बेसनमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.

वाळलेली मेथी
वाळलेल्या मेथीमुळे पोळीचा सुगंध वाढतो. हे पचनासाठीदेखील चांगले आहे. त्यासाठी सुकलेल्या मेथीची पावडर पिठात मिसळा.

ओवा
ओव्यामध्ये अनेक खनिजे आणि फायबर असतात. ओवा पचनासाठीदेखील खूप फायदेशीर मानला जातो. गव्हाच्या पिठात ओवा घातल्याने पोट फुगत नाही आणि पोळीची चवदेखील छान लागते.