How many cloves can safely eat in a day : लवंगाला (Cloves) एक गुणकारी मसाला मानले जाते. कारण त्यामध्ये युजेनॉल (Eugenol) नावाचे नैसर्गिक घटक असतात. या घटकामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे लवंगाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास काही आरोग्य फायदे तुम्हाला मिळू शकतात. लवंगाचा उपयोग पचन, तोंडाचे आरोग्य आणि किरकोळ त्रास कमी करण्यासाठी केला जातो. मात्र, एखादी गोष्ट जास्त प्रमाणात घेतली म्हणजे त्याचा अधिक फायदा होतोच असे नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, असे ठाण्यातील KIMS रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ (Chief Dietitian) अमरीन शेख म्हणाले.

एका व्यक्तीने Quora वर प्रश्न विचारला होता की, ‘माझा मित्र दररोज १० ते १२ लवंगा खातो. असे करणे आरोग्यासाठी चांगले की हानिकारक?’या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी यांनी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मते दररोज १० ते १२ लवंगा खाणे अनेक लोकांसाठी जास्त ठरू शकते. एखाद्या दिवशी चुकून जास्त लवंगा खाल्ल्याने कदाचित त्रास होणार नाही. मात्र, दररोज मोठ्या प्रमाणात लवंग खाण्याची सवय असल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त लवंगांमुळे खाल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

पोटात जळजळ होणे,आम्लपित्त, जळजळ, पोटात अस्वस्थता, मळमळ किंवा पचनाचा त्रास तर काही लोकांना तोंडात जळजळ जाणवू शकते. काही जणांचे रक्त सुद्धा पातळ होऊ शकते. कारण – लवंगांमधील सक्रिय घटक असलेल्या युजेनॉलमुळे रक्त सौम्यपणे पातळ करतात. रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या किंवा शस्त्रक्रियेची तयारी करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. जास्त प्रमाणात सेवन केल्यास संवेदनशील व्यक्तींमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

लवंगांचे सेवन दीर्घकाळ जास्त प्रमाणात केल्यास यकृताच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, याचा धोका प्रामुख्याने लवंगांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास किंवा लवंगांच्या तेलासारख्या अधिक तीव्र स्वरूपाचा वापर केल्यास असतो. स्वयंपाकात नेहमीच्या प्रमाणात लवंग वापरल्याने सहसा असा धोका नसतो.

मग किती प्रमाण योग्य मानले जाते?

लवंगाचा वापर संतुलित आहाराचा एक भाग म्हणून करणे अधिक फायदेशीर ठरते. दररोज जास्त प्रमाणात लवंग खाण्याची गरज नाही. चहा, स्वयंपाक किंवा घरगुती उपायांमध्ये थोड्या प्रमाणात लवंग वापरणे पुरेसे आहे. शरीराला एकाच पदार्थाचे जास्त सेवन करण्यापेक्षा विविध पोषक घटक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने अधिक फायदा होतो.

सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच्या समजुतीमुळे लोक एखादा पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाऊ लागतात. अशा वेळी त्या पदार्थाचे इतक्या मोठ्या प्रमाणात सेवन करणे खरोखर फायदेशीर आहे की, त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात, याचा विचार करणे आवश्यक आहे, असे शेख यांनी सांगितले.