Does Eating Dinner After 8 PM Cause Weight Gain? रात्रीचं जेवण ८ वाजण्यापूर्वीच झालं पाहिजे, नाहीतर वजन वाढतं… हा नियम तुम्हीही अनेकदा ऐकला असेल. पण खरंच रात्री ८ नंतर खाल्लेला प्रत्येक घास शरीरात चरबी साठवतो का? तज्ज्ञांच्या मते याचं उत्तर ‘नाही’ आहे. वजन वाढण्यामागे केवळ जेवणाची वेळ जबाबदार नसते. तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेत आहात, काय खात आहात, किती प्रमाणात खात आहात आणि तुमची जीवनशैली कशी आहे, याचा वजनावर मोठा परिणाम होतो.

रात्री ८ वाजता घड्याळाचा काटा पुढे गेला की शरीर ‘फॅट स्टोरेज मोड’मध्ये जातं का?

नाही! डॉ. करुणा चतुर्वेदी यांच्या मते, वजन वाढण्याचा संबंध एखाद्या ठराविक वेळेशी थेट जोडता येत नाही. शरीराला रात्री ८ वाजता अचानक आता चरबी साठवायची असा सिग्नल मिळत नाही. वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराच्या गरजेपेक्षा सातत्याने जास्त कॅलरीज घेणं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रात्री ९ वाजता जेवते; मात्र तिचं एकूण कॅलरी सेवन गरजेपुरतंच आहे, तर केवळ ९ वाजता जेवल्यामुळे तिचं वजन वाढेलच असं नाही. याउलट, एखादी व्यक्ती संध्याकाळी ७ वाजताच जेवत असेल, पण दिवसभर गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असेल, तरी वजन वाढू शकतं.

मग रात्री उशिरा खाणं अयोग्य का आहे?

समस्या अनेकदा किती वाजता खातो? यापेक्षा त्या वेळी काय आणि किती खातो? यात असते. दिवसभराचा थकवा, ताण, कंटाळा किंवा टीव्ही पाहण्याची सवय यामुळे रात्री अनेकांना भूक नसतानाही काहीतरी खावंसं वाटतं. बिस्किटं, चिप्स, फरसाण, मिठाई, तळलेले पदार्थ, उरलेलं जेवण किंवा गोड पेय असं खाताना आपण किती खाल्लं याचं भानही अनेकदा राहत नाही. म्हणूनच उशिरा जेवणं आणि उशिरा जास्त खाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

रात्री ८ नंतर खाण्यासाठी खरंच कोणताही ‘कट ऑफ टाइम’ नाही?

डाएटिशियन आस्था शर्मा यांच्या मते, रात्री ८ वाजल्यानंतर शरीर आपोआप अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर करतं अशी कोणतीही ठोस जैविक मर्यादा नाही. म्हणजेच कधीतरी कामामुळे ८.३० किंवा ९ वाजता जेवण झालं, म्हणून लगेच वजन वाढण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की रात्री उशिरापर्यंत पोटभर, जड पदार्थ खात राहणं योग्य आहे.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचं circadian rhythm म्हणजेच जैविक घड्याळ झोप, हार्मोन्स, भूक, रक्तातील साखर आणि चयापचय यांसारख्या अनेक प्रक्रियांवर प्रभाव टाकतं. त्यामुळे शरीर दिवसाच्या प्रत्येक वेळी अन्नावर अगदी एकसारखी प्रतिक्रिया देईलच असं नाही.

रोज रात्री खूप उशिरा आणि जड जेवण करण्याची सवय शरीरासाठी कमी अनुकूल ठरू शकते. त्यातही जेवण आणि झोप यामध्ये फार कमी अंतर असेल, तर काही लोकांना पोट जड होणे, अस्वस्थ वाटणे किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. आणि झोप नीट झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी भूक आणि खाण्याच्या निवडींवरही परिणाम होऊ शकतो.

वजन कमी करायचं असेल तर ‘किती वाजता?’ पेक्षा ‘ताटात काय?’ पाहा!

एखादी व्यक्ती कामामुळे रात्री ८.४५ वाजता डाळ, भाजी आणि पोळीचं संतुलित जेवण करते. तर दुसरी व्यक्ती संध्याकाळी ७.३० वाजता भरपूर तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेय घेते आणि नंतर टीव्ही पाहताना चिप्स खाते. फक्त ‘८ नंतर खाऊ नये’ हा नियम लावला, तर पहिली व्यक्ती चुकीची आणि दुसरी योग्य ठरेल. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटी असू शकते. म्हणून वजन नियंत्रणासाठी जेवणाची वेळ, अन्नाची गुणवत्ता, एकूण कॅलरीज आणि portion size या सगळ्यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

रात्री उशिरा जेवावं लागत असेल तर काय कराल?

तुमची नोकरी, प्रवास किंवा दैनंदिन वेळापत्रकामुळे रात्री उशिरा जेवण होत असेल, तर घड्याळाशी संघर्ष करण्यापेक्षा जेवणाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या.

  • रात्रीचं जेवण संतुलित आणि योग्य प्रमाणात घ्या.
  • अतितेलकट आणि अतिजड पदार्थ कमी करा.
  • जेवताना टीव्ही किंवा मोबाईलमध्ये गुंतून मनसोक्त खाणं टाळा.
  • भूक नसताना केवळ कंटाळा किंवा ताणामुळे खाणं टाळा.
  • जेवण आणि झोप यामध्ये शक्य तितकं अंतर ठेवा.
  • दिवसभरातील एकूण आहार आणि कॅलरी सेवनाकडे लक्ष द्या.

‘८ वाजण्याचा नियम’ प्रत्येकासाठी लागू होतोच असं नाही! प्रत्येकाची जीवनशैली सारखी नसते. कोणी सकाळी लवकर उठतं, कोणी रात्री उशिरापर्यंत काम करतं. काही जण संध्याकाळी व्यायाम करतात, तर काहींचं कामच रात्री संपतं. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवा हा एकच नियम लावणं व्यवहार्य ठरेलच असं नाही. उलट, खूप लवकर जेवून नंतर प्रचंड भूक लागल्यास रात्री अनियंत्रितपणे स्नॅक्स खाण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी कठोर नियमांपेक्षा सातत्याने पाळता येईल अशी आहारशैली अधिक महत्त्वाची आहे.

मग रात्री ८ नंतर जेवलं तर वजन वाढतं का?

थोडक्यात केवळ ८ नंतर जेवल्यामुळे वजन वाढत नाही. शरीरात अशी कोणतीही जादुई वेळ नाही की ७.५९ वाजता खाल्लेलं अन्न ठीक आणि ८.०१ वाजता खाल्लेलं अन्न थेट चरबीमध्ये बदलतं. मात्र रोज रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात, कॅलरीयुक्त आणि जड पदार्थ खाण्याची सवय असेल, तर वजन वाढण्याचा धोका नक्कीच वाढू शकतो. म्हणून पुढच्या वेळी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी जेवण झालं म्हणून अपराधी वाटून घेऊ नका.

घड्याळाकडे पाहण्यापेक्षा ताटाकडे पाहा

तुम्ही काय खात आहात, किती खात आहात, खरंच भूक लागली आहे का आणि जेवल्यानंतर किती वेळाने झोपता हे प्रश्न वजन नियंत्रणासाठी अधिक महत्त्वाचे आहेत. ८ वाजण्याचा आकडा नाही, तर तुमचा संपूर्ण आहार आणि जीवनशैली वजनावर मोठा परिणाम करतात.