Leftover Rice Benefits : रात्री भात उरल्यास अनेक घरांमध्ये तो फेकून देण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये गरम करून खाल्ला जातो. काही लोकांना उरलेला भात आरोग्यासाठी चांगला वाटतो, पण खरोखरच शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याविषयी डॉक्टरांकडून सविस्तर जाणून घेऊ..

एका हिंदी वृ्तसंस्थेशी बोलताना जयपूरमधील ‘एंजेलकेअर-ए न्यूट्रिशन अँड वेलनेस सेंटर’च्या संचालिका, आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांनी सांगितले की, शिळ्या भाताचे सेवन काही विशिष्ट पद्धतीनेच केले जाऊ शकते, परंतु रोज फ्रिजमध्ये ठेवलेला उरलेला भात किंवा अन्न आपल्या आहाराचा भाग बनवणे योग्य नाही.

सकाळी उरलेला भात खाणे आरोग्यासाठी चांगले की हानिकारक?

आहारतज्ज्ञ अर्चना जैन यांच्या मते, शिळा भात खाणे नेहमीच हानिकारक असते असे नाही, परंतु तो खाण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या ‘पांता भात’ किंवा ‘पखाला भात’च्या स्वरूपात भाताचे सेवन केले जाऊ शकते. हा पदार्थ बनवण्यासाठी शिजवलेला भात पाण्यात भिजवून ठेवला जातो आणि नंतर सकाळी खाल्ला जातो. मात्र, याचा अर्थ असा नाही की रात्री उरलेला कोणताही भात कोणतीही काळजी न घेता सकाळी खावा. भात कसा साठवला गेला आहे, किती वेळ ठेवला गेला आहे आणि त्याचे तापमान काय होते, या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

पांता भात ठरतो फायदेशीर

न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन सांगतात की, पांता भात आणि पखाला भात हे भातापासून बनवले जाणारे पारंपारिक पदार्थ आहेत. हे प्रामुख्याने पूर्व भारत आणि ओडिसा, पश्चिम बंगाल यांसारख्या भागांमध्ये खाल्ले जातात. हे बनवण्यासाठी शिजवलेल्या भातात पाणी मिसळून ते रात्रभर ठेवले जाते. त्यानंतर सकाळी यात मीठ, हिरवी मिरची, कांदा किंवा इतर गोष्टी घालून खाल्ले जाते. या प्रक्रियेत भातामध्ये नैसर्गिक फर्मेंटेशन (आंबवण्याची प्रक्रिया) होते, जी पोटाच्या आरोग्यासाठी (गट हेल्थ) अत्यंत फायदेशीर ठरते. अशा प्रकारे शिळ्या भाताचा वापर केला जाऊ शकतो.

वर्ष २०२४ मध्ये ‘फूड अँड ह्युमॅनिटी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, रात्रभर पाण्यात भिजवून बनवलेला पारंपारिक ‘पांता भात’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. भात रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे त्यात लॅक्टिक अ‍ॅसिड तयार करणारे चांगले जिवाणू (बॅक्टेरिया) वाढतात. याशिवाय, त्यात लोह (आयन), जस्त (झिंक) आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो. साध्या भाताच्या तुलनेत शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, कुपोषणाशी लढण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतो.

शिळा भात खाण्याचे तोटे

आहारतज्ज्ञ अर्चना जैन यांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवून रोज उरलेला भात किंवा अन्न खाण्याची सवय टाळली पाहिजे. विशेषतः जेव्हा भात शिजवल्यानंतर बराच वेळ खोलीच्या तापमानावर (नॉर्मल टेंपरेचर) सोडला जातो आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवला जातो. वास्तविक पाहता, शिजवलेल्या भातामध्ये हानिकारक जिवाणू देखील वाढू शकतात.

जर भात दीर्घकाळ सामान्य तापमानावर ठेवला, तर त्यात जिवाणू वाढू शकतात आणि विषारी घटक (टॉक्सिन) तयार करू शकतात. असा भात खाल्ल्यास फूड पॉयझनिंगचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे उलटी, पोटदुखी, पोटात कळा मारणे आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, यात भात पुन्हा गरम केल्याने काही जिवाणू नष्ट होऊ शकतात, परंतु आधीच तयार झालेले टॉक्सिन नष्ट होतातच असे नाही.

शिळा भात खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

आहारतज्ज्ञ अर्चना जैन असा सल्ला देतात की, जर तुम्हाला रात्री उरलेला भात सकाळी खायचा असेल, तर काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे:

भात शिजल्यानंतर तो फार वेळ खोलीच्या तापमानावर खुला ठेवू नका.

उरलेला भात लवकरात लवकर थंड करून स्वच्छ आणि झाकलेल्या डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.

भात फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही खूप दिवस साठवून ठेवू नका.

खाण्यापूर्वी भात चांगला कडक गरम करून घ्या.

भाताचा वास बदलल्यास, तो चिकट झाला असल्यास किंवा त्यात काही बदल जाणवल्यास तो अजिबात खाऊ नका.

अनेक दिवस साठवून ठेवलेल्या उरलेल्या भाताचे सेवन करणे टाळा.