सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल लोकांना अनेकदा प्रश्न पडतात. आरोग्याबद्दल जागरूक असलेले अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात ताज्या फळांनी करतात, ज्यामध्ये पपई हा एक लोकप्रिय पर्याय आहे. पपई चविष्ट असण्यासोबतच पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. त्यामध्ये असलेले ‘पेपेन’ एंझाइम, फायबर आणि व्हिटॅमिन सी हे घटक शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या दोन्हींचा असा विश्वास आहे की, पचन सुधारणे, वजन कमी करणे व बद्धकोष्ठता दूर करणे यांसाठी पपई उपयुक्त आहे.

भारतीय योगगुरू, लेखक, संशोधक व टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र सांगतात की, पपई हे पोटासाठी एक औषध आहे. पपईमधील ‘पेपेन’ नावाचे एंझाइम बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करते. पपईच्या सेवनाने मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल वाढते. पचनासाठी दररोज पपई खाणे अत्यंत प्रभावी आहे. चला, तज्ज्ञ आणि संशोधनातून समजून घेऊया की, पपईच्या सेवनाने आरोग्याला कसे फायदे होतात.

पपईमध्ये आढळते पेपेन एंझाइम

पपईमध्ये ‘पेपेन’ हे एक एंझाइम असते, जे प्रथिनांच्या पचनात महत्त्वाची भूमिका बजावते. हे एंझाइम प्रथिनांचे लहान भागांमध्ये विघटन करण्यास मदत करते. पपई खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते आणि पचनक्रिया सुधारते. ‘न्यूरोएंडोक्राइनोलॉजी लेटर्स’ (२०१३)मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार, पपईपासून तयार केलेला अर्क (कॅरिकोल) सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता व पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्यांमध्ये सुधारणा होते. पपईमध्ये असलेले ‘पेपेन’ एंझाइम जटिल प्रथिनांचे सहजपणे विघटन करते, ज्यामुळे पचन जलद होण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

फायबरमुळे पोट भरल्याची भावना अनुभवता येते

पपईमधील फायबर जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. रात्री झोपल्यानंतर सकाळी त्याचे सेवन केल्याने भूक शमते. हे फायबरयुक्त फळ पचनसंस्था आणि आतडे सक्षम ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करणे सोपे करते. ‘द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अँड न्यूट्रिएंट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आहारातील फायबरने समृद्ध फळे भूक शमविणारे हार्मोन्स (तृप्तीचे संकेत) वाढवतात. सकाळी पपई खाल्ल्याने, त्यातील विद्राव्य आणि अविद्राव्य फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे अति खाणे टळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पपईमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम व फोलेट यांसारखी पोषक तत्त्वे असतात. व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीनसारखी संयुगे शरीराच्या अँटीऑक्सिडंट संरक्षणात भूमिका बजावतात. शरीरातील सामान्य स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी पोटॅशियम हे एक आवश्यक खनिज आहे. फूड केमिस्ट्री आणि यूएसडीए फूड डेटा सेंट्रलच्या अहवालानुसार, १०० ग्रॅम पपईमधून शरीराच्या व्हिटॅमिन सीच्या दैनंदिन गरजेपैकी अंदाजे ७५-१००% गरज पूर्ण होते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींचे (WBCs) उत्पादन वाढवते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याव्यतिरिक्त त्यात असलेले पोटॅशियम इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास आणि स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत करते.

अँटिऑक्सिडंट्समुळे फायदेदेखील मिळतात

पपईमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट संयुगे असतात, जी शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यात भूमिका बजावतात. आहार आणि जीवनशैली सुधारण्यासोबतच दररोज पपई खाल्ल्याने प्रचंड फायदे मिळतात. ‘बायोलॉजिकल अँड फार्मास्युटिकल बुलेटिन (२०११)’ आणि ‘फ्री रॅडिकल बायोलॉजी अँड मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पपईमधील लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन शरीरातील फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करतात. ही प्रक्रिया ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून पेशींचे नुकसान टाळते आणि वृद्धत्वाची लक्षणे व जुनाट आजारांचा धोका कमी करते.

पपई हृदयासाठीही गुणकारी आहे

जर्नल ऑफ मेडिसिनल फूड अँड न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पपईमध्ये व्हिटॅमिन सी, लायकोपीन व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स वाईट कोलेस्ट्रॉलचे (LDL) ऑक्सिडेशन रोखतात. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखले जाते, तेव्हा धमन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.