Fruits Which Cause Acidity: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार सर्व वयोगटांतील लोकांना त्रास देत आहेत. काहीही खाल्ल्यानंतर लगेच गॅस होणे, अपचन, पोटफुगी व पोटदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी हे त्रास कमी करण्यासाठी लोक थंडगार फळं खातात; परंतु कधी कधी फळं खाल्ल्यानंतरही छातीत जळजळ आणि आम्लता वाढते. पण असे का होते? खरं तर, पोट थंड राहण्यासाठी आणि छातीतील जळजळ टाळण्यासाठी योग्य फळे खाणे आवश्यक आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, फळांमुळे अॅसिडिटीदेखील होऊ शकते. काही फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते. आज आम्ही तुमच्यासाठी अशा फळांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांचे कमी प्रमाणातच सेवन करायला हवे.
‘या’ फळांमुळे होऊ शकते अॅसिडिटी
संत्री
संत्र्यांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील, तर संत्र्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
लिंबू
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते आणि पोटात अॅसिडचे उत्पादन वाढू शकते, विशेषतः रिकाम्या पोटी. म्हणून लिंबूचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे.
अननस
अननस आम्लयुक्त असते आणि त्याचे सेवन केल्याने पित्त वाढते. म्हणून जर तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या असतील, तर अननसाचे सेवन टाळा. कारण- अननसात असलेले एंझाइम आणि आम्ल हे घटक संवेदनशील आतड्याच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात.
कैरी
कैरी आम्लयुक्त आणि पचायला जड असते. ती पचवण्यासाठी पोटाला जास्त मेहनत करावी लागते. त्याच्या सेवनाने कफ आणि वायू वाढतो. अपचनदेखील होऊ शकते.
आंबट द्राक्षे
आंबट द्राक्षे आम्लयुक्त असतात आणि पित्त वाढवतात, ज्यामुळे पोटफुगी आणि वायू होऊ शकतो. म्हणून जर पचन क्षमता कमी झाली असेल, तर द्राक्षे आणि आंबट फळे मर्यादित प्रमाणातच खा.
त्याव्यतिरिक्त, पेरू त्याच्या बियांसह खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. पेरू त्याच्या बियांसह खाल्ल्याने पोट फुगू शकते. त्याशिवाय बेरी आणि ब्लॅकबेरी खाणे टाळा. आयुर्वेदानुसार, आंबट व तिखट फळे पित्त वाढवतात आणि जठराग्नीला कमकुवत करतात. त्यामुळे तुम्हालादेखील अॅसिडिटीचा प्रचंड त्रास होत असेल, तर या फळांचे सेवन करणे टाळा.
