Tomato Benefits: आजच्या काळात टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वांत महत्त्वाची फळभाजी आहे. त्याशिवाय आपली भाजी, आमटी, सांबार, सूप, सॅलेड किंवा अगदी सॉसदेखील अपूर्ण वाटतात. सकाळच्या पोळीभाजीपासून ते संध्याकाळी पास्ता व पिझ्झापर्यंत प्रत्येक पदार्थात टोमॅटोचा बेस असतो. टोमॅटो ही एक अशी भाजी आहे, जी सॅलेड असो वा चटणी, जवळजवळ प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. त्याची चव आणि रंग कोणत्याही पदार्थाला एक वेगळाच चटकदारपणा देतात. त्यातील व्हिटॅमिन ए आणि सी, फायबर, फोलेट आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीरही आहेत. आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने असंख्य फायदे मिळू शकतात.

दररोज टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवणे

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास आणि सर्दी, खोकला व विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन नक्कीच करावे.

त्वचा उजळ होते

टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट लायकोपीन सुरकुत्या कमी करण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकते. त्याच्या नियमित सेवनाने तुमची त्वचा स्वच्छ आणि उजळ होण्यास मदत होते.

पोटाची समस्या दूर होते

टोमॅटोमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता व अपचन यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्यांचे सेवन केले जाऊ शकते.

वजन नियंत्रणात राहते

टोमॅटोमध्ये कॅलरीज खूप कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते एक उत्तम पर्याय ठरतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर टोमॅटोचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

टोमॅटो खाण्याचे तोटे

टोमॅटो खाण्याचे जितके फायदे आहेत, त्याप्रमाणे काही तोटेही आहेत. विविध गुणधर्मांनी समृद्ध असलेला टोमॅटो आरोग्यासाठी काही प्रमाणात हानिकारकदेखील ठरू शकतो.

१) टोमॅटोतील अम्लीय घटकामुळे काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो, यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात किंवा अ‌ॅसिड रिफ्लक्ससारख्या परिस्थितीची लक्षणे वाढू शकतात.

२) पोषणासंबंधित समस्या वाढू शकतात.

३) लघवीच्या समस्या, मायग्रेन, ग्लायकोआल्कलॉइड्सशी संबंधित शारीरिक वेदना, अ‌ॅनाफिलेक्टिक रिअ‌ॅक्शन, लाइकोपेनोडर्मियाचा त्रास होऊ शकतो.

‘या’ लोकांनी जास्त टोमॅटो खाणे टाळावे

मूतखडा, संधिवात, आमवात, आम्लपित्त असलेल्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळावे. टोमॅटोमधील ऑक्सॅलेट्स घटकामुळे मूतखड्याचा त्रास वाढतो, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.