Endometriosis And Fertility : एंडोमेट्रिओसिस ही महिलांमधील एक सामान्य पण गंभीर समस्या आहे, जी अनेकदा गर्भधारणेत अडथळा ठरते. या स्थितीत गर्भाशयाच्या (Uterus) आतील अस्तरासारख्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. त्यामुळे ओटीपोटात वेदना, सूज आणि प्रजनन अवयवांमध्ये बदल घडून येतात. याच कारणामुळे एंडोमेट्रिओसिसचा सामना करणाऱ्या महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यात अडचणी येऊ शकतात.
CIFAR च्या डायरेक्टर आणि IVF तज्ज्ञ डॉ. पुनीत राणा अरोरा यांच्या सांगण्यानुसार, एंडोमेट्रिओसिसचा परिणाम महिलेच्या प्रजनन क्षमतेसह आयव्हिएफच्या (In Vitro Fertilization) निकालांवरही पडू शकतो. मात्र, योग्य उपचार आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अनेक महिला यशस्वीपणे आई होऊ शकतात.
एंडोमेट्रिओसिसमुळे प्रजनन क्षमतेवर कसा होतो परिणाम?
एंडोमेट्रिओसिसमुळे शरीरात सतत सूज (Inflammation) राहते. यामुळे पेल्विक भागात पेशी एकमेकांना चिकटू शकतात, ज्याचा परिणाम अंडाशय (Ovary) आणि इतर प्रजनन अवयवांवर होतो.
डॉ. अरोरा म्हणतात की, ही परिस्थिती स्त्रीबीज (Egg) आणि शुक्राणू (Sperm) यांच्या मिलनामध्ये अडथळा निर्माण करू शकते. अनेक प्रकरणांमध्ये फॅलोपियन ट्यूब्सवरही (Fallopian tubes) याचा परिणाम होतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.
स्त्रीबीजांच्या (Eggs) गुणवत्तेवरही पडू शकतो प्रभाव
डॉ. पुनीत अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एंडोमेट्रिओसिसचा परिणाम जर अंडाशयावर झाला, तर त्यामुळे स्त्रीबीजांच्या गुणवत्तेवरही (Egg quality) परिणाम होऊ शकतो.
आजारामुळे येणारी सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (Oxidative stress) स्त्रीबीजांच्या वाढीवर परिणाम करतात. यामुळेच काही महिलांमध्ये IVF दरम्यान अपेक्षेप्रमाणे स्त्रीबीजांची संख्या किंवा गुणवत्ता मिळत नाही.
IVF प्रक्रियेत काय अडचणी येतात?
एंडोमेट्रिओसिसमुळे ज्या महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नाही, त्यांच्यासाठी IVF हा एक उत्तम आणि प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, आजाराच्या तीव्रतेनुसार IVF चे निकाल वेगवेगळे असू शकतात.
डॉक्टरांच्या मते, एंडोमेट्रिओसिस गर्भाशयाच्या वातावरणात बदल घडवून आणते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि सूज निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया भ्रूणाच्या (Embryo) इम्प्लांटेशनवर परिणाम करू शकतात. काही अभ्यासांनुसार, यामुळे काही रुग्णांमध्ये इम्प्लांटेशन आणि प्रेग्नन्सी रेट कमी होऊ शकतो.
तरीही, याचे परिणाम प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळे असतात. यामध्ये वय, ओव्हेरियन रिझर्व्ह (Ovarian Reserve), आजाराची तीव्रता आणि आधी घेतलेले उपचार यांसारखे अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
एंडोमेट्रिओसिसमध्ये प्रेग्नन्सी सुरक्षित राहते का?
गर्भधारणा झाल्यास बहुतेक महिलांची प्रेग्नन्सी सामान्य आणि सुरक्षित राहते. परंतु काही संशोधनांमध्ये एंडोमेट्रिओसिसचा संबंध गर्भपात (Miscarriage), वेळेआधी प्रसूती (Premature Delivery), नाळेशी (Placenta) संबंधित समस्या आणि गरोदरपणातील उच्च रक्तदाबाच्या (High BP) धोक्याशी जोडला गेला आहे.
त्यामुळेच डॉक्टर नियमित प्रेग्नन्सी मॉनिटरिंग आणि वेळोवेळी तपासणी करण्याचा सल्ला देतात, जेणेकरून कोणत्याही संभाव्य समस्येचे वेळेत निदान करता येईल.
योग्य वेळी उपचार केल्यास यशाची शक्यता वाढते
डॉ. पुनीत राणा अरोरा सांगता की, एंडोमेट्रिओसिस असणे म्हणजे महिला आई होऊ शकत नाही असा अजिबात अर्थ होत नाही. आज IVF आणि आधुनिक फर्टिलिटी उपचारांच्या मदतीने लाखो महिला यशस्वीरीत्या आई होत आहेत.
उपचाराची निवड नेहमी महिलेचे वय, ओव्हेरियन रिझर्व्ह, लक्षणांची तीव्रता आणि एंडोमेट्रिओसिसची स्थिती लक्षात घेऊन केली जाते. त्यामुळे प्रजनन संदर्भात काही समस्या असल्यास वेळेतच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
