वर्षभरात ३ हजार ८३२ किलोमीटर जॉगिंग केलेल्या IAS अधिकाऱ्याचा भन्नाट फिटनेस फंडा वाचाच

त्यांच्या जेवणाच्या वेळा पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल

महेश झगडे

‘आरोग्यम् धनसंपदा’ असं म्हटलं जात. आरोग्य व्यवस्थित ठेवणे हीच खरी संपत्ती आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. आपल्यापैकी अनेकजण फीट राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. कोणी डाएट करत तर कोणी व्यायामशाळेत जातं. मात्र या सर्वात सोप्पा व्यायाम म्हणजे चालणे किंवा धावणे. मात्र व्यायाम म्हणून चालताना किंवा धावतानाही काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, उदाहरणार्थ आहार व व्यायामाची वेळ व नियमितता इत्यादी. आपल्या कारकिर्दीमध्ये कर्तव्यकठोरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महेश झगडे या माजी आयएएस अधिकाऱ्यानं धावण्याच्या व्यायामातूनही एक नवा आदर्श घालून दिला आहे. नववर्षाचा संकल्प अनेकजणांचा एका आठवड्यातच संपुष्टात येतो. मात्र झगडे यांनी २०१९ या संपूर्ण वर्षभरात या संकल्पाचं आचरण इतक्या चिकाटीनं केलं की त्यांनी एका वर्षात चक्क तीन हजार ८३२ किलोमीटर अंतर पायी कापले आहे. आता तुलनाच करायची झाल्यास, कन्याकुमारी या भारताच्या दक्षिणेकडून सुरु होत थेट उत्तरेतील श्रीनगरपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४४ हा तीन हजार ७४५ किलोमीटर लांबीचा आहे. यावरुन तुम्ही कल्पना करू शकता की झगडे यांनी व्यायामाला किती प्राधान्य दिलं आहे ते. महेश झगडे हे व्यायामाइतकंच आहाराला व शिस्तबद्धतेलाही महत्त्व देताना दिसतात. त्यांचा हा अनुकरणीय उपक्रम जाणून घेऊया त्यांच्याशी झालेल्या बातचितीतून प्रश्नोत्तर स्वरूपात…

प्रश्न:
तुम्ही ट्रेडमीलवर चालला आहात का?
उत्तर:
नाही मी ट्रेडमीलवर कधीच व्यायाम करत नाही. मला मोकळ्या जागेत चालायला आवडतं.

प्रश्न:
तुम्ही कधी आणि किती अंतर चालता?
उत्तर:
सामान्यपणे मी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास रात्रीचं जेवण करतो. त्यानंतर मी १२ ते १८ किलोमीटर चालतो. मला आधी ऑफिसमध्ये पाच वाजता डबा मिळायचा. त्यामुळे मी पाच वाजता जेवण्याची सवय लावली. ती सवय आजही कायम असून अंधार पडायच्या आत मी जेवतो.

प्रश्न:
मग तुम्ही सकाळचं जेवणं किती वाजता करता?
उत्तर:
मी सकाळचा नाश्ताच जेवणासारखा भरपूर करतो. काहीही झालं तरी मी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान दुपारचं जेवतो.

प्रश्न:
मधल्या वेळेत तुम्ही काही खाता का?
उत्तर:
नाही काहीच नाही. पण सकाळीच भरपेट जेवल्यामुळे दिवसभर टवटवीत वाटते. आळस आल्यासारखं वाटतं नाही आणि दिवसभर उत्साहात असतो.

प्रश्न:
तुम्ही दिवसाला पाणी किती पिता?
उत्तर:
खरं हा प्रश्न गोंधळात टाकणार आहे. कारण मी खूप कमी पाणी पितो. मला खूप कमी तहान लागते. त्यामुळे मी दिवसातून एक लिटरच्या आसपास पाणी पितो. जास्त पाणी प्यायला हवं असा सल्ला काहीजणांनी मला दिलाय पण मला तहानच कमी लागते.

प्रश्न:
दुपारी झोपता का?
उत्तर:
नाही. दुपारी मी कधीच झोपत नाही. मात्र रात्रीचं १२ ते १८ किलोमीटर चालल्यावर मी अक्षरश: पडल्या पडल्या झोपतो आणि ती झोप अत्यंत डाराडूर असते.

प्रश्न:
सामान्यपणे डाएटवर असणारे लोक गोड पदार्थ किंवा चहा पिणे टाळतात. तुम्ही ही हा नियम पाळता का?
उत्तर:
नाही. मला गोड चहा आवडतो. मी गोड पदार्थ अगदी मनसोक्त खातो. गोड पदार्थांना मी कधीच नाही म्हणत नाही.

प्रश्न:
तुम्ही मांसाहार करता का?
उत्तर:
मांसाहार हा माझी आवड नाही. मी शक्यतो शाकाहारचं पसंत करतो. पण समजा शाकाहारी पदार्थ उपलब्धच नसतील तर मी क्वचित मांसाहारही करतो. पण ती माझी आवड नाही हे नक्की.

प्रश्न:
व्यायामाचं मोजमाप ठेवण्यासाठी कोणतं हेल्थ अॅप वापरता?
उत्तर:
रनकीपर आणि आयओएसवर बिल्टइन असलेले हेल्थ अॅप मी वापरतो.

प्रश्न:
चालण्यासंदर्भातील काही मजेदार किस्सा?
उत्तर:
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी चालतो. मी पुण्यामध्ये आयुक्त असताना मुंबईला मीटिंगला यायला लागायचं. त्यामुळे नेम चुकू नये म्हणून मीटिंग आटोपल्यावर पुण्याला परत जाताना मी खंडाळ्याला गाडीतून उतरत असे. खंडाळा ते लोणावळा अंतर मी जॉगिंग करत जाई आणि ड्रायव्हरला गाडी लोणावळ्याला आणायला सांगत असे…

महेश झगडे यांचा हा उपक्रम सगळ्यांनी आचरणात आणावा व कुठला ना कुठला व्यायाम नियमितपणे करावा यात काही शंका नसावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex ias officer mahesh jhagade walked 3832 km in 2019 scsg

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या