डॉ. नीलम रेडकर

मुंबईत गेल्या आठवडय़ापासून सर्दी, खोकला आणि तापाची साथच सुरू झाली आहे. हवेत अचानक वाढलेला गारवा आणि मुंबईत झपाटय़ाने पसरणारी ओमायक्रॉनची तिसरी लाट या दोन्ही बाबी यास कारणीभूत आहेत. ओमायक्रॉन आणि अन्य विषाणूजन्य आजार यांची बहुतांश लक्षणे सारखीच असल्यामुळे संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे. परंतु या परिस्थितीतही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे.

ओमायक्रॉनमुळे मुंबईत तिसरी लाट

२१ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. मुंबईत जवळपास दैनंदिन सुमारे १८ ते १९ हजार रुग्णांची नव्याने भर पडत आहेत. यात सुमारे ८५ टक्के लक्षणेविरहित आहेत, तर उर्वरित जणांनाही सौम्य लक्षणे आहेत. त्यात गेल्या आठवडय़ापासून हवेतील गारवा वाढल्यामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्याही वाढलेली दिसत आहे. परिणामी बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकला आणि ताप या रुग्णांचा रांगा लागलेल्या आहेत. ओमायक्रॉनचीही हीच लक्षणे असल्यामुळे अनेकांमध्ये लक्षणे दिसून आल्यावर संभ्रम निर्माण होत आहे. डाव्‍‌र्हिनच्या सिद्धांतानुसार पृथ्वीतलावरील प्रत्येकजीव आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वत: मध्ये काही बदल करत असतो. कुठलाही विषाणू जर तीव्र स्वरुपाचा असेल  करणारा असेल तर तो संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये मृत होतो. परंतु सौम्य स्वरुपाचा विषाणू  बाधित व्यक्तींमध्ये जिवंत राहतो व संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये सहज वेगाने पसरतो. तसेच काही वेळा संसर्ग झाल्यावर लक्षणे न दिसल्यामुळे व्यक्ती स्वत: ला विलग करत नाहीत आणि म्हणूनच तो सहज पसरू शकतो. असेच करोनाच्या ओमायक्रॉन या रूपाबाबत झाले आहे.

ओमायक्रॉनची लक्षणे बहुतांश जणांमध्ये सौम्य असून रुग्ण गृहविलगीकरणातच बरेदेखील होत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. तसेच ओमायक्रॉनमुळे फुफ्फुसांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाणही दहा पटीने कमी असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आले आहे. वेगाने पसरणारा ओमायक्रॉन लवकरच डेल्टा विषाणूची जागा घेईल आणि करोनाची साथ संपुष्टात येईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. या जरी दिलासा देणाऱ्या गोष्टी असल्या तरी पुढील काही आठवडे ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे भारतात किंवा मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार व लक्षणांनुसार अंतिम निष्कर्ष काढता येईल. नागरिकांनी मात्र संभ्रम न ठेवता चाचणी करून शंका दूर कराव्यात.  जेणेकरून घरातील वयोवृद्ध, अन्य दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांच्याबाबत विशेष काळजी घेता येईल. ओमायक्रॉनचे स्वरुप सौम्य असले तरी अद्यापडेल्टाही काही प्रमाणात अजून वावरत आहेत. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी रुग्णांनी चाचणी करणे गरजेचे आहे.

ओमायक्रॉनमुळे लक्षणे तीव्र झालेल्या बहुतांश रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले नसल्याचे आढळले आहे. तेव्हा लस करोना होण्यापासून बचाव करणार नसली तरी आजाराचे स्वरूप तीव्र होण्यापासून रोखण्यास निश्चितच मदत करते. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेले नसल्यास करून घ्यावे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढला आहे, त्याच वेगाने कमी होईल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबईतील वाढणारी रुग्णसंख्या पाहून घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास विषाणूजन्य आजार की करोना आहे, याची खात्री करून घ्यावी आणि त्यानुसार उपचार करावेत. यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासही मदत होईल आणि उपचारही वेळेत सुरू होतील.

ओमायक्रॉनची प्रमुख लक्षणे

  •   सर्दी होणे, नाक गळणे
  •    ताप येणे
  •    डोकेदुखी, अंगदुखी
  •    घसा दुखणे, घसा खवखवणे, घशामध्ये टोचल्यासारखे वाटणे किंवा बोलताना आवाज घोगरा होणे.
  •    सुका खोकला येणे किंवा चिकट कफ पडणे
  •    उलटी किंवा जुलाब होणे
  •    वास न येणे, तोंडाला चव नसणे ही लक्षणे कमी प्रमाणात दिसून आली आहेत.

घ्यावयाची काळजी

  •    घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला ताप आल्यास व वरील लक्षणे दिसल्यास गृहविलगीकरण केले पाहिजे.
  •    जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा खासगी प्रयोगशाळेतून रॅपिड प्रतिजन चाचण्या कराव्यात.
  •    कुटुंबामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी.
  •    गृहविलगीकरणात असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
  •    दर चार तासांनी ऑक्सिजनची पातळी तपासावी
  •    सहा मिनिटे चालल्यावर ऑक्सिजनची पातळी चार  किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क  साधावा.
  •    सहा मिनिटे चालण्याची चाचणी दर चार ते पाच तासांनी करावी.
  •    लक्षणांनुसार नेहमीची औषधे घ्यावीत. परंतु मॉल्नुपिराविर किंवा प्रतिजैविके अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ नयेत.
  •    पुरेशी विश्रांती, झोप, सकस आहार घ्यावा गंभीर लक्षणे
  •    अत्यंत थकवा जाणवणे
  •    दम लागणे
  •    सतत खोकला येऊन छातीत दुखणे
  •    ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा खाली जाणे
  •    ६० वर्षांवरील रुग्णांमध्ये व इतर व्याधी असलेल्या  रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे असण्याची शक्यता जास्त आहे.

खालील प्रकारच्या व्याधी असलेल्या रुग्णंनी ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि वेळीच रुग्णालयात भरती झाले पाहिजे

  •    मधुमेह   
  •    हृदयरोग व उच्च रक्तदाब      
  •    मूत्रिपडाचे आजार    
  •    कर्करोग रुग्ण
  •    जे रुग्ण इतर आजारांसाठी स्टिरॉईडस किंवा तत्सम रोगप्रतिकारकशक्ती कमी करणारी  औषधे घेत असल्यास किंवा  केमोथेरपीवर असल्यास    
  •    दम्याचा किंवा श्वसनाचा आजार

(लेखिका कूपर रुग्णालयात औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.)