Mango Over Eating: उन्हाळा आणि आंबा यांची जोडी अगदी घट्ट मानली जाते. आंब्याच्या चवीमुळे व त्यातल्या विविध गुणधर्मांमुळे त्याला फळांचा राजा अर्थात आजच्या भाषेत सुपर फूड म्हटले जाते. उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच बाजारात आंब्यांची प्रचंड मागणी वाढते. आंबे कितीही महाग झाले तरीही लोक ते आवर्जून खरेदी करून खातात. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्यांची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. मात्र, चवीबरोबरच त्यांचे सेवन करताना सावधगिरी बाळगणेही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाच्या मते, आंबे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्यांचे अतिसेवन हानिकारकही ठरू शकते.
आंबे खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारी फळे शरीरासाठी फायदेशीर असली तरी आंबा हे त्यापैकीच एक आहे. त्याचा थंडावा देणारा गुणधर्म फायदेशीर मानला जातो आणि तो शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतो. आंब्यांमधील पाणी आणि पोषक तत्त्वे शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) टाळतात, ज्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेत आराम मिळतो. १०० ग्रॅम आंब्यामध्ये ६० कॅलरीज एवढी ऊर्जा असते तर पोटॅशिअम १६८ मिलीग्रॅम एवढे असते. जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. रोज आपल्याला लागणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या २१ टक्के एकट्या १०० ग्रॅम आंब्यामधून मिळते, तर त्यात ‘क’ जीवनसत्व ६० टक्के असते.
आंब्यात लोह, ‘क’ जीवनसत्व, ‘अ’ जीवनसत्व आणि फॉलिक अॅसिड, कॉपर भरपूर प्रमाणात असल्याने ते रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे अॅनेमियावर हा चांगला उपाय आहे.
‘अ’ जीवनसत्व व ‘क’ जीवनसत्व भरपूर असल्याने तसेच व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन इ इत्यादीमुळे जंतुसंसर्गापासून शरीराचे रक्षण होते.
जीवनसत्व ‘अ’ मुळे त्वचेवर स्रवणाऱ्या द्रावाचे नियंत्रण केले जाते, त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या कमी होतात तसेच केस व चेहऱ्यावरील स्निग्धांश कायम ठेवला जातो. केसांची वाढ होते, त्वचेचा रंग उजळतो.
उन्हाळ्यातील अरुची, भूक न लागणे यावर आंबा हा उत्तम उपाय आहे.
आंब्याचे अतिसेवन ठरू शकते घातक
कोणताही पदार्थ प्रमाणातच खायला हवा, नाहीतर आरोग्यावर त्याचा दुष्परिमाण होऊ शकतो. जास्त आंबे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढून फोड आणि मुरुमांसारख्या
समस्या उद्भवू शकतात .
पोटाच्या समस्या : जास्त आंबे खाल्ल्याने अपचन, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटावर परिणाम होऊ शकतो.
वजन वाढणे : आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते, म्हणून आपले वजन नियंत्रणात ठेवण्याकडे लक्ष द्या.
ॲलर्जीचा धोका : काही लोकांना आंब्याची ॲलर्जी असू शकते. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने या ॲलर्जीच्या प्रतिक्रिया वाढू शकतात.
साखरेची पातळी वाढणे : आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे, मधुमेहींसाठी त्याचे सेवन चांगले मानले जात नाही.
आंब्याबरोबर ‘हे’ पदार्थ खाऊ नका
दही
आंब्याचा उष्ण गुणधर्म असतो, तर दह्याचा शीत गुणधर्म असतो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, गॅस किंवा अपचन यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच यामुळे शरीरातील विषारी घटकही वाढू शकतात .
पाणी
अनेक लोक आंबे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, ही एक सामान्य चूक आहे. आंबे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोट फुगणे, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते. याचे कारण असे की, आंब्यामध्ये फायबर आणि साखर असते आणि पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. आंबे खाल्ल्यानंतर किमान ३०-४५ मिनिटांनी पाणी प्या.
थंड पेये
आंब्यामध्ये आधीपासूनच नैसर्गिक साखर असते, तर थंड पेयांमध्ये अतिरिक्त साखर आणि विविध रसायने असतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, जे मधुमेहींसाठी विशेषतः धोकादायक ठरू शकते. यामुळे पोटदुखी आणि पचनाच्या समस्यादेखील वाढू शकतात .
कारले
आंबा आणि कारले यांचे मिश्रण आरोग्यासाठी चांगले नाही. आंबा गोड असतो आणि कारले कडू असते. त्यांच्या भिन्न चवी आणि गुणधर्मांमुळे ते एकत्र खाल्ल्याने मळमळ, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
