Expired Condom Risks: आरोग्याशी संबंधित काही गोष्टी अशा असतात, ज्याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. विशेषतः वैयक्तिक आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित विषयांबाबत अनेक जण खुलून बोलत नाहीत. पण, अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आता डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. आजकाल कंडोम हा केवळ गर्भधारणा टाळण्यासाठीच नव्हे, तर लैंगिक संसर्गजन्य आजारांपासून (STIs) संरक्षण मिळविण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, अनेकांना एक गोष्ट माहिती नसते किंवा ती गांभीर्याने घेतली जात नाही- ती म्हणजे कंडोमची एक्स्पायरी डेट.

“कंडोमवर दिलेली एक्स्पायरी डेट ही फक्त औपचारिकता नसते,” असे स्पष्ट सांगत डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण- एक्स्पायर झालेला कंडोम दिसायला व्यवस्थित असला तरी तो सुरक्षित असेलच याची खात्री नसते.

एक्स्पायर झालेला कंडोम धोकादायक का ठरू शकतो?

पीएसआरआय हॉस्पिटलचे युरॉलॉजी विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. प्रशांत जैन यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, “कालांतराने लेटेक्स किंवा पॉलीयुरेथेनसारख्या पदार्थांची गुणवत्ता कमी होत जाते. त्यामुळे कंडोमची लवचिकता घटते आणि तो सहज फाटण्याची शक्यता वाढते.” डॉ. जैन पुढे म्हणाले, “एक्स्पायरी डेट तुमच्या सुरक्षिततेसाठी असते. केवळ सोईसाठी आरोग्याशी धोका घेणं योग्य नाही.” विशेष म्हणजे एक्स्पायर झालेल्या कंडोममध्ये अतिशय सूक्ष्म भेगा किंवा मायक्रो-टिअर्स तयार होऊ शकतात. या भेगा डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे कंडोम बाहेरून ठीक दिसला तरी त्याची सुरक्षितता कमी झालेली असू शकते.

गर्भधारणा आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो?

डॉक्टरांच्या मते, अशा सूक्ष्म भेगांमधून वीर्य किंवा संसर्गजन्य घटक बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे अनपेक्षित गर्भधारणा होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच लैंगिक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्याची क्षमता कमी होऊ शकते. “एक्स्पायर झालेला कंडोम गर्भधारणा आणि STI या दोन्हींपासून कमी संरक्षण देतो. त्यामुळे तो वापरणं सुरक्षित मानलं जात नाही,” असे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.

एक्स्पायरी डेट आधीच कंडोम खराब होऊ शकतो?

अनेकांना वाटतं की, पॅकेटवर दिलेल्या तारखेपर्यंत कंडोम पूर्णपणे सुरक्षित असतो; पण डॉक्टरांच्या मते, चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्यास कंडोम मुदत संपण्यापूर्वीच खराब होऊ शकतो. विशेषतः पाकीट, पर्स, गाडीचा डॅशबोर्ड किंवा खिशात दीर्घकाळ कंडोम ठेवणं धोकादायक ठरू शकतं. उष्णता, घर्षण आणि सूर्यप्रकाशामुळे लेटेक्सचं नुकसान होतं. “जर एखाद्यानं महिनोन महिने पाकिटात कंडोम ठेवला असेल, तर तो एक्स्पायरी डेटपूर्वीच निकामी होऊ शकतो,” असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

कंडोम ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

डॉ. जैन यांच्या मते, कंडोम नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवावेत. थेट सूर्यप्रकाश, उष्णता किंवा धारदार वस्तूंपासून ते दूर ठेवणं आवश्यक आहे. बेडजवळील ड्रॉवर किंवा कपाट हे त्यासाठी योग्य ठिकाण मानलं जातं. दीर्घकाळ खिशात किंवा पाकिटात ठेवणं टाळावं. कारण- त्यामुळे कंडोमवर दबाव आणि घर्षण निर्माण होऊ शकतं.

एक्स्पायरीनंतर काही दिवस वापरला तर चालतो?

काही लोकांना वाटतं की, एक्स्पायरी डेट निघून गेल्यानंतर काही दिवसांनी वापरला तरी चालू शकतो. मात्र, डॉक्टरांच्या मते हा मोठा गैरसमज आहे. “एकदा कंडोमची एक्स्पायरी डेट संपली की, तो लगेच असुरक्षित मानावा. तो दिसायला सामान्य वाटला तरी त्यावर विश्वास ठेवू नये,” असे डॉ. जैन यांनी सांगितले.

आरोग्याशी संबंधित अशा गोष्टींमध्ये छोटासा निष्काळजीपणाही मोठा धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणतंही उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची एक्स्पायरी डेट तपासणे आणि योग्य साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(टीप : ही माहिती तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आणि सार्वजनिक माहितीनुसार देण्यात आली आहे. कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)