scorecardresearch

अवांतर : पाणी पुरेसे न पिण्याचे दुष्परिणाम

गेल्या काही दिवसांमध्ये अचानक वाढलेले तापमान आणि लागणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे शरीराला थकवा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अचानक वाढलेले तापमान आणि लागणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे शरीराला थकवा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळेही थकवा वाढण्याचे प्रमुख कारण आहे. पाणी हा सर्वात कमी महत्त्व दिला जाणारा पोषणघटक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत ठेवण्यासाठी, शरीरातील अनावश्यक पदार्थाचे उत्सर्जन करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे.

शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आपल्या शरीरातील द्रावांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे यासाठी शरीराचे तापमान योग्य राखणे आवश्यक असते. तसे न झाल्यास अनेक क्रिया बंद पडू शकतात. तहान लागणे म्हणजे शरीरातील पाणी कमी होण्याचे शेवटचे लक्षण आहे. डिहाड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने वंगणाची मात्रा कमी होते आणि त्यामुळे क्रॅम्प्स किंवा पेटके येतात. शारीरिक मेहनत घेणाऱ्यांनी सातत्याने पाणी पिणे आवश्यक आहे.  पाण्याची कमतरता आणि ऊर्जा कमी झाल्यास रक्तदाबही कमी होतो.

करोनाच्या काळात घरातील वातावरणात काम करण्याची सवय झाली आहे. पाणी पिण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परंतु आता बरीचशी कार्यालये सुरू झाली असून कार्यालयात काम करतानाही ही सवय बदललेली नाही. त्यामुळे आपल्याला सतत पाणी पिण्याची आठवण ठेवायला हवी. त्यासाठी पाण्याची बाटली जवळच ठेवा किंवा ही आठवण करून देण्यासाठी एखाद्या आरोग्यासंबंधित अ‍ॅपचा वापरही करता येईल.

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवणाच्या आधी? की जेवणानंतर? की जेवताना?ह्ण या तीनही वेळा पाणी प्यायल्याने अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचतं. यामुळे लाळ तयार होण्यात मदत होते. यातील इलेक्ट्रोलायटस, म्युकस आणि एन्झाइम्स अन्न पचण्यात मदत करतात आणि मौखिक आरोग्य चांगले राहते. अन्नाचे पचन तोंडातच सुरू होते आणि वयानुसार लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे पडल्यासारखे वाटत असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

उत्सर्जनासाठी गरजेचे

  • दिवसभरात शरीरात अनेक टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक जमा होत असतात, त्यातील काही पर्यावरणातील असतात, काही अन्नातून येतात. यांचे उत्सर्जन होण्याची क्रिया मूत्रातून, मलातून आणि घामातून होते. घामामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित होत असते. कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता किंवा मूतखडय़ाचा त्रास होतो. पाणी कमी पिणाऱ्या लोकांना मूत्रविर्सजनाचा त्रास होतो आणि त्यातून खडे तयार होतात. मूत्र योग्य रीतीने द्राव म्हणून बाहेर पडावे यासाठी पुरेसं पाणी प्यायला हवे. मलविसर्जन योग्य रीतीने होण्यासाठीही याचा फायदा होतो.
  • रक्तातील प्रवाहीपणा कायम राखण्यासाठीही आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. त्यामुळे पोषक घटक शरीरात सर्वत्र सहज पोहोचतात आणि सक्रियता वाढते, मानसिक थकवा कमी होतोच. तसेच चयापचयही सुधारते. सांध्यांची अखंडता आणि कण्याची मजबुती टिकवण्यासाठीही पाणी हवं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने त्याचा वंगणासारखा वापर होतो. ज्यामुळे सांध्यांचे घर्षण कमी होते.
  • काही शहरांमध्ये जड पाणी असते. अशा ठिकाणी पाणी शुद्ध करून वापरायला हवे. यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दहा मिनिटे पाणी उकळवणे. जिथे पाणी उकळणे शक्य नसेल तिथे ग्राहकांनी पाण्याचा नीट अभ्यास करून सुरक्षित पाण्याचे मार्ग शोधायला हवेत. यासाठी नियमितपणे पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जायला हवी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extra side effects drinking enough water health temperature ysh