Relationships Extramarital Dating Apps india : भारतात कुटुंब व्यवस्था आणि विवाहसंस्था यांना मोठं महत्त्व आहे; पण डिजिटल युगामुळे भारतातील कुटुंब व्यवस्था आणि वैवाहिक जीवन झपाट्यानं बदलत आहे. लोकांची नातेसंबंधांबाबतची मानसिकता हळूहळू बदलते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे विवाहबाह्य डेटिंग ॲप्सची वाढती लोकप्रियता. ग्लिडन या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपच्या ताज्या सर्वेक्षणात भारतातील विवाहबाह्य संबंधांबाबतची धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही चकित व्हाल. नेमकं यात काय म्हटलं आहे ते जाणून घेऊ…
भारतात अंदाजे ४० लाख लोक सध्या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपचा वापर करीत आहेत. वैयक्तिक गरजा, भावनिक ओलावा किंवा जोडीदाराकडून न मिळणारे सुख शोधण्यासाठी लोक आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घेत आहेत.
त्यात आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू शहर आघाडीवर आहे. एकूण युजर्सपैकी १८ युजर्स हे एकट्या बंगळुरू शहरातील आहेत. त्यापाठोपाठ हैदराबाद (१७%), दिल्ली (११%) व मुंबई (९%) यांचा क्रमांक लागतो. हा बदल केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर, लखनौ, सुरत, चंदिगड व गुवाहाटी यांसारख्या लहान शहरांमधूनही या अॅपला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसतेय. विशेष बाब म्हणजे, मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तसेच रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या तमिळनाडूतील कांचीपुरममध्येही अशा संबंधांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसतेय.
स्त्री की पुरुष, कोणाची संख्या अधिक?
या ॲपवर ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिला आहेत. त्यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांत महिलांचा सहभाग १४८ टक्क्यांनी वाढला आहे. त्यात पुरुष साधारणपणे २५-३० वयोगटातील महिलांशी संवाद साधण्यास पसंती देतात; तर महिला ३०-४० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या पुरुष व्यावसायिकांना उदा. डॉक्टर, वरिष्ठ अधिकारी, सीए यांना प्राधान्य देतात.
किती तास करतात वापर?
भारतीय वापरकर्ते या अॅपवर दिवसातून सरासरी १ ते १.५ तास घालवतात. प्रामुख्याने दुपारी १२ ते ३ आणि रात्री १० ते १२ या वेळेत अॅपवर सर्वाधिक लोक अॅटिव्ह असतात.
का वाढतोय कल?
या बदलत्या सामाजिक मानसिकतेविषयी बोलताना ग्लिडन इंडियाच्या कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल म्हणाल्या की, भारतात विवाह ही पवित्र परंपरा मानली जाते. असे असले तरी अनेक लोक भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वत:ची ओळख जपण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घेत आहेत. ही एक प्रकारची शांत क्रांती आहे.
Extramarital Dating App वापरण्यामागे कारणं काय?
काही वापरकर्त्यांच्या मते, वैवाहिक आयुष्याला कंटाळलेल्या आणि जोडीदाराकडून भावनिक जवळीक मिळत नसलेल्या व्यक्ती या प्लॅटफॉर्मकडे वळल्या. काही जण केवळ उत्सुकता, तर काही जण थ्रिल म्हणून याचा वापर करत असल्याचे सांगतात. सर्वेक्षणानुसार, ६० टक्क्यांहून अधिक भारतीय आता ‘ओपन मॅरेज’ किंवा ‘रिलेशनशिप अनार्की’सारख्या अपारंपरिक संबंधांच्या संकल्पना स्वीकारत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये जोडीदाराला अशा संबंधांची कल्पना असूनही ते गप्प राहणे पसंत करत असल्याचे दिसून आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा बदल म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नसून, विवाहामध्ये अपूर्ण राहिलेल्या भावनिक गरजा पूर्ण करण्याचा आणि स्वतःची ओळख लपवण्याचा एक प्रयत्न आहे. हे आकडे भारतासारख्या ‘कुटुंबवत्सल’ देशात विवाहाच्या पवित्र बंधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलत असल्याचे अधोरेखित करतात.
