नवी दिल्ली : उन्हाळय़ात आपण आपली त्वचा, केसांची काळजी घेतो. मात्र, या काळात इतर महत्त्वाच्या अवयवांचीही काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. ‘डोळे’ हा असाच महत्त्वाचा अवयव आहे. उन्हाळय़ात डोळय़ांचे आरोग्य जपणे नितांत गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उन्हाळय़ात डोळय़ांवर अतिरिक्त ताण येतो. वाढता उष्मा आपल्या डोळय़ांसाठी हानीकारक असतो. या काळात जर थेट उन्हाच्या संपर्कात आपले डोळे आले तर उन्हातील अतिनील किरणांमुळे डोळय़ात मोतिबिंदू किंवा नेत्रपटलाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. उन्हामुळे डोळय़ांना अ‍ॅलर्जी होऊन, त्यांना सौम्य खाज सुटते. ते लाल होतात. सारखे पाणी येते. पापण्या सुजतात. त्यात जिवाणू किंवा विषाणू संसर्ग होण्याचा धोका असतो.  उन्हाच्या अतिसंपर्कामुळे डोळय़ांची जळजळ होते. अंधुक दिसण्याचा त्रास होतो. त्यामुळे अंधत्वाचा धोका उद्भवू शकतो. बुब्बुळांचे विकार होतात. प्रसंगी डोळय़ांचा कर्करोगही होऊ शकतो. उष्णता आणि प्रदूषण, हवेतील धूलिकणांमुळे डोळय़ांचे हे विकार होतात.

उन्हाळय़ात आणि इतरही काळात डोळय़ांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञ अशा प्रकारे डोळय़ांची काळजी घ्या असे सांगतात : जर ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरत असाल तर तुमचे हात धुत राहा. क्रीडा स्पर्धासारख्या उपक्रमांत भाग घेताना डोळय़ांचे संरक्षक आवरण घाला. अतिनील किरणांपासून संरक्षक काचेचे गॉगल घालावेत. तुमची ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ अतिनील किरणांपासून डोळय़ांचे संरक्षण करणारी असली तरी असे गॉगल घालावेत. कारण डोळय़ांच्या उर्वरित भागांचे उष्म्यापासून ते संरक्षण करतात. तसेच तुमचे डोळे कोरडे होऊ देत नाहीत. 

उन्हाळय़ात निर्जलीकरण होत असते. त्यामुळे उन्हाळय़ात डोळय़ांच्या संरक्षणाचे उपाय न केल्यास डोळय़ांत असलेला ओलाव्याचे बाष्पीभवन होऊन डोळे कोरडे पडतात. अश्रूनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात आवर्जून पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.