Improve Eyesight Naturally: लॅपटॉप, टीव्ही… या सगळ्यांच्या स्क्रीनसमोर दिवसाचा मोठा वेळ जातो. त्यामुळे डोळ्यांवर सतत ताण येतो, दृष्टी धूसर होणे, डोळे कोरडे पडणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. कमी वयातच चष्म्याचा नंबर वाढत असल्याची तक्रारही अनेक जण करतात. मात्र, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा योग्य वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आयुर्वेदिक परंपरेत सांगितले जाते.

अनेकांना प्रश्न पडतो की, साधे घरगुती मिश्रण डोळ्यांच्या आरोग्यासाठी खरोखर उपयोगी ठरू शकते का? आयुर्वेदिक मतानुसार, काही नैसर्गिक घटक शरीरातील वात-पित्ताचा समतोल राखण्यास, शरीराला पोषण देण्यास आणि डोळ्यांचा थकवा कमी करण्यास मदत करू शकतात.

स्क्रीन टाईम वाढल्याने डोळ्यांवर परिणाम होतो?

आजच्या डिजिटल युगात अनेकांचा दिवसाचा बराचसा वेळ मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर जातो. सतत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे, लाल होणे, थकवा जाणवणे आणि काही वेळेस दृष्टी धूसर वाटणे अशा समस्या होऊ शकतात.

आहारातून व्हिटॅमिन ए, सी, ई आणि ओमेगा-३ यांसारख्या पोषक घटकांची योग्य मात्रा मिळणेही डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य आहार, स्क्रीन टाईम कमी करणे आणि डोळ्यांना नियमित विश्रांती देणे गरजेचे आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते ‘या’ तीन गोष्टींचे मिश्रण उपयुक्त

हरिद्वार येथील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीपक कुमार यांच्या मतानुसार, काही नैसर्गिक घटकांचा योग्य आणि मर्यादित वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामध्ये तूप, काळी मिरी आणि खडीसाखर यांचा उल्लेख केला जातो.

आयुर्वेदिक परंपरेनुसार या तिन्ही पदार्थांचे मिश्रण डोळ्यांसाठी उपयुक्त मानले जाते. मात्र, यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा दृष्टी निश्चितपणे पूर्ववत होते, असा वैद्यकीय दावा करता येत नाही.

मिश्रण कसे तयार करायचे?

घरात सहज उपलब्ध असलेल्या या तीन पदार्थांचे मिश्रण तयार करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :

  • ग्रॅम काळी मिरीचे बारीक चूर्ण
  • २०० ग्रॅम धाग्याची खडीसाखर (चूर्ण करून)
  • २५० ग्रॅम तूप

सर्वप्रथम तूप हलके गरम करावे. त्यानंतर त्यामध्ये काळ्या मिरीचे चूर्ण आणि खडीसाखरेचे चूर्ण घालून चांगले मिसळावे. मिश्रण थंड झाल्यानंतर ते स्वच्छ बरणीत भरून ठेवावे.

सेवन कसे करावे?

आयुर्वेदिक मतानुसार, सकाळी आणि रात्री एक चमचा मिश्रण कोमट दुधासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, कोणतेही घरगुती किंवा आयुर्वेदिक मिश्रण नियमितपणे घेण्यापूर्वी, विशेषतः मधुमेह किंवा इतर आजार असल्यास, डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

तूप, काळी मिरी आणि खडीसाखर डोळ्यांसाठी कसे उपयुक्त मानले जाते?

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या तिन्ही पदार्थांचे काही गुणधर्म सांगितले जातात.

१) तूप

तुपामध्ये काही प्रमाणात जीवनसत्त्वे आणि चरबी असते. आयुर्वेदिक परंपरेत तूप शरीराला पोषण देणारे मानले जाते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

२) काळी मिरी

काळी मिरीमध्ये विविध नैसर्गिक घटक असतात. आयुर्वेदिक मतानुसार ती पचनक्रिया आणि शरीरातील रक्ताभिसरणासाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही तिचा वापर केला जातो.

३) खडीसाखर

आयुर्वेदिक परंपरेत खडीसाखरेचा वापर शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. मात्र, खडीसाखर ही साखरेचाच प्रकार असल्याने तिचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी आणखी काय कराल?

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ एका घरगुती उपायावर अवलंबून न राहता, आहार आणि जीवनशैलीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

  • हिरव्या पालेभाज्या, गाजर, बदाम आणि अक्रोड यांचा आहारात समावेश करावा.
  • स्क्रीन पाहताना मध्येच डोळ्यांना विश्रांती द्यावी.
  • पुरेशी झोप घ्यावी.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
  • नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
  • डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा थकवा जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(महत्त्वाची सूचना : ही माहिती आयुर्वेदिक परंपरेतील मतांवर आधारित आहे. या मिश्रणामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा कमी झालेली दृष्टी पूर्णपणे पूर्ववत होते, याचा ठोस वैद्यकीय पुरावा असल्याचे गृहीत धरू नये. डोळ्यांची दृष्टी अचानक कमी होणे, अंधुक दिसणे किंवा इतर गंभीर त्रास जाणवत असल्यास स्वतःहून उपचार न करता, नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)