स्वमग्नता या रोगाचे निदान करण्यासाठी संशोधकांनी डोळ्याच्या माध्यमातून (रेटिनाची चाचणी) करण्याची एक चाचणी शोधून काढली असून त्यात काही वर्षे आधीच स्वमग्नतेचा धोका कळतो. स्वमग्नता हा शारीरिक व मानसिक विकासाशी संबंधित आजार आहे. ऑटिझम अँड डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, डोळ्याला कुठलाही छेद न देतात नेत्रपटलातील विद्युत संदेशांचा अभ्यास करून मुलांना पुढे स्वमग्नतेचा धोका आहे का, हे समजून घेता येते. ऑस्ट्रेलियातील फ्लाइंडर्स विद्यापीठाने ही चाचणी एकूण १८० जणांवर केली. त्यात ५ ते २१ गटातील लोकांचा समावेश होता.

स्वमग्नता विकाराशी संबंधित काही जैवखुणांचाही यात संबंध असतो त्यातून त्याचा धोका आधीच ओळखता येतो. रेटिना हा मेंदूशी जोडलेला असतो. त्यामुळेच स्वमग्नतेच्या विकाराचा धोका रेटिनाच्या तपासणीतून करता येतो, असा दावा या संशोधन निबंधाचे लेखक पॉल कॉन्स्टेबल यांनी केला आहे. साध्या सोप्या उपकरणाने डोळ्याला छेद न देता ही तपासणी केली जाते.

लवकर धोका कळल्याने वेळीच उपाययोजना करणे सोपे जाते. जर आधीच मुलांना हा रोग झाल्याचे समजले तर आई-वडील पुढे तसाच दोष असलेली मुले जन्माला घालायची नाहीत असा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे स्वमग्नता लवकर समजल्यास कुटुंबाचे गणितही बदलते. जरी पहिल्या मुलाला असा आजार असल्याचे निदान झाले तर त्यासाठी वेळीच उपाययोजना करून त्याचे आणखी गंभीर स्वरूपात होणारे रूपांतर टाळता येते. यात वैज्ञानिकांना या विकाराची जैवखुण सापडली असून त्यांनी त्याची माहिती जाहीर केलेली नाही.