डोळ्याखाली फोडी येणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, जेव्हा ती उदभवते तेव्हा वेदना, सूज आणि जळजळ यांमुळे लक्षणीय अस्वस्थता येते. सुरुवातीला ती पापण्यांवर एक लहान सूज किंवा पुरळ म्हणून दिसून येते, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. मात्र, जर त्वरित लक्ष दिले नाही, तर ही समस्या आणखी वाढू शकते आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांना कारणीभूत ठरू शकते. म्हणून त्याबद्दल योग्य माहिती आणि वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय भाषेत रांजणवाडी म्हणून ओळखले जाणारी ही फोडी सहसा जीवाणूंच्या संसर्गामुळे होते. घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे, वारंवार डोळे चोळणे, डोळ्यांची स्वच्छता कमी असणे व कमकुवत प्रतिकारशक्ती ही रांजणवाडीची मुख्य कारणे मानली जातात. त्याशिवाय, जास्त थकवा, झोपेचा अभाव, मोबाईल फोन किंवा लॅपटॉपचा दीर्घकाळ वापर आणि जुना किंवा खराब मेकअप वापरणे यांमुळेदेखील रांजणवाडी (स्टाय) होण्याचा धोका वाढतो.

रांजणवाडीची लक्षणे कशी ओळखावीत?

रांजणवाडीची लक्षणे हळूहळू दिसून येतात. सुरुवातीला पापण्यांवर सौम्य लालसरपणा आणि सूज येऊ शकते. त्यानंतर वेदना, जळजळ, डोळ्यात जडपणा आणि कधी कधी डोळ्यांतून पाणी येऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये पापणीवर एक लहान गाठ किंवा फोड तयार होतो, ज्याला केलेला स्पर्श वेदनादायक असतो. जर त्वरित उपचार केले नाहीत, तर सूज आणि वेदना दोन्ही वाढू शकतात.

Award Banner

उबदार कापडाचा वापर

रांजणवाडीसाठी पहिला आणि सर्वांत प्रभावी घरगुती उपाय म्हणजे डोळ्यावर उबदार, ओलसर कापड किंवा उबदार पॅड ठेवणे स्वच्छ कापड कोमट पाण्यात भिजवा, ते पिळून काढा आणि बंद डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. दिवसातून दोन ते तीन वेळा सुमारे १० मिनिटे कॉम्प्रेस लावल्याने फोड पिकण्यास आणि लवकर बरे होण्यास मदत होते. या काळात डोळ्यावर वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

कोरफड जेल थंडपणा आणि आराम देईल

कोरफडीमध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा घटक आणि थंड करणारे गुणधर्म आहेत, जे रांजणवाडीच्या उपचारात खूप उपयुक्त ठरू शकतात. डोळ्याबाहेरील प्रभावित भागात ताजे कोरफडीचे जेल हळूवारपणे लावा. डोळ्यात जेल जाणार नाही याची काळजी घ्या. दिवसातून एकदा किंवा दोनदा ते वापरल्याने जळजळ, लालसरपणा आणि सूज दूर होण्यास मदत होते.

हळद

भारतीय घरांमध्ये हळदीचा वापर औषध म्हणून केला जातो. त्यातील अँटीसेप्टिक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात. स्वच्छ पाण्यात चिमूटभर हळद मिसळून पातळ पेस्ट बनवा आणि डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर हळुवारपणे लावा. डोळ्यांत हळद जाणार नाही याची काळजी घ्या. कारण- त्यामुळे जळजळ वाढू शकते.

डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या

डोळ्यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे किंवा चोळणे टाळा. कारण- त्यामुळे जीवाणू पसरू शकतात. डोळ्यांभोवती हात लावताना नेहमीच स्वच्छ हात वापरा. ​​काही दिवसांसाठी मस्कारा, आयलायनर किंवा इतर डोळ्यांचा मेकअप वापरणे टाळा. इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून तुमचा टॉवेल आणि रुमाल वेगळा ठेवा.

विश्रांती आणि झोपेमुळे लवकर आराम मिळेल

पुरेशी विश्रांती आणि चांगली झोप डोळ्यांना लवकर बरे होण्यास मदत करते. झोपेचा अभाव शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे संसर्ग बरा होणे कठीण होते. जर तुम्हाला डोळ्यांना सूज आली असेल, तर मोबाईल फोन, टेलिव्हिजन व लॅपटॉप यांचा मर्यादित वापर करा आणि तुमच्या डोळ्यांना नियमित विश्रांती द्या.

अन्न

डोळ्यांच्या आजारादरम्यान योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि सूज कमी होते. हिरव्या भाज्या, फळे आणि अ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. सूज वाढू नये यासाठी तळलेल्या आणि मसालेदार पदार्थांचे सेवन मर्यादित करा.

निष्कर्ष

बऱ्याचदा घरगुती उपायांनी रांजणवाडी बरी होऊ शकते. परंतु, जर सूज आणि वेदना वाढल्या, जास्त पाणी येऊ लागले किंवा डोळ्यांतून पू येऊ लागला किंवा अनेक दिवस आराम मिळाला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.