Eye Twitching: अचानक डोळा फडफडू लागला की अनेकांच्या मनात पहिला विचार येतो ‘उजवा डोळा फडफडतोय की डावा?’ त्यानंतर लगेच शुभ-अशुभ संकेतांच्या समजुती आठवतात. मात्र, डोळा फडफडण्यामागे शुभ किंवा अशुभ संकेत नसून त्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचं नेत्रतज्ज्ञ सांगतात. अनेकदा काही सेकंद किंवा काही मिनिटांसाठी पापणी अचानक फडफडू लागते. काही जण याचा संबंध भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेशी जोडतात. मात्र, वैद्यकीय भाषेत या स्थितीला पापणी मायोकेमिया (Eyelid Myokymia) म्हटलं जातं.

डोळा अचानक फडफडतो तरी का?

नेत्रतज्ज्ञ डॉ. अवनी हरिहानी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये डोळे फडफडण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे. वैद्यकीयदृष्ट्या पापणी फडफडणे हे डोळ्याभोवती असलेल्या एका छोट्या स्नायूमध्ये होणाऱ्या अनैच्छिक आकुंचनामुळे होतं. चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांमधून मेंदूकडून संकेत जात असतात. काही वेळा ही नस अतिसक्रिय झाल्यामुळे पापणीच्या स्नायूमध्ये वारंवार आकुंचन होऊ लागतं आणि आपल्याला डोळा फडफडत असल्याचा अनुभव येतो. म्हणूनच उजवा किंवा डावा डोळा फडफडणे याचा शुभ किंवा अशुभ घटनेशी थेट वैज्ञानिक संबंध नाही.

कोणत्या कारणांमुळे डोळा फडफडू शकतो?

दैनंदिन जीवनातील काही सवयी आणि शारीरिक स्थितींमुळे पापणी फडफडण्याची शक्यता वाढू शकते.

  • झोपेची कमतरता
  • ताण आणि मानसिक स्ट्रेस
  • चहा किंवा कॉफीचे अतिसेवन
  • मोबाइल, कॉम्प्युटर किंवा इतर स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणे
  • शारीरिक किंवा मानसिक थकवा
  • पोषणातील कमतरता

सतत स्क्रीन पाहणे, अपुरी झोप आणि ताणतणाव यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि पापणी फडफडण्याचा त्रास जाणवू शकतो.

डोळा फडफडत असेल तर घाबरायचं का?

बहुतेक वेळा डोळा फडफडणे ही गंभीर समस्या नसते. काही काळानंतर ही हालचाल स्वतःहून थांबते आणि पापणी पुन्हा सामान्य होते. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल किंवा बराच काळ सुरू राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

‘ही’ लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर डोळा सतत फडफडत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणे जाणवत असतील, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.

  • पापणी सतत किंवा अनेक दिवस फडफडत राहणे
  • संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अनैच्छिक हालचाल होणे
  • डोळे वारंवार किंवा अनैच्छिकपणे बंद होणे
  • स्नायूंमध्ये तीव्र आकुंचन किंवा पेटके येणे

अशा वेळी केवळ शुभ-अशुभ समजुतींवर अवलंबून न राहता वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

मग उजवा डोळा शुभ आणि डावा अशुभ ही समजूत कुठून आली?

भारतीय समाजात डोळा फडफडण्याबाबत अनेक पारंपरिक समजुती प्रचलित आहेत. उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते आणि त्यातून चांगली बातमी किंवा आर्थिक फायदा होण्याचे संकेत मिळतात, अशी काहींची धारणा आहे. तर डावा डोळा फडफडणे अशुभ मानण्याचीही प्रथा आहे. काही ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठीही या समजुती वेगवेगळ्या असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच पुरुषाचा उजवा डोळा आणि स्त्रीचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. मात्र, या समजुतींना वैज्ञानिक आधार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने डोळा फडफडण्यामागे पापणीच्या स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन, झोपेची कमतरता, ताण, कॅफीन आणि स्क्रीन टाइम यांसारखी कारणे अधिक महत्त्वाची आहेत.

पुढच्या वेळी अचानक तुमचा डोळा फडफडला तर लगेच ‘काहीतरी शुभ-अशुभ घडणार’ असा निष्कर्ष काढण्याची गरज नाही. शुभ-अशुभापेक्षा तुमची झोप, स्ट्रेस, स्क्रीन टाइम आणि कॅफीनचे सेवन याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. त्रास सतत होत राहिला किंवा इतर लक्षणांसोबत दिसला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.