तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइनने अफगाणी युझर्सची खाती सुरक्षित केली आहेत. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइनने या आठवड्यात असं सांगितलं आहे की, तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी नागरिकांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांना लक्ष्य होण्यापासून वाचवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. फेसबुकने अफगाणिस्तानमधील युझर्सच्या खात्यांची फ्रेंडलिस्ट पाहण्याची किंवा शोधण्याची लोकांची क्षमता तात्पुरती काढून टाकली आहे. सुरक्षा धोरण प्रमुख नॅथॅनियल ग्लेचर यांनी गुरुवारी याबाबतचं ट्विट केलं आहे.

Facebook वर ‘वन क्लिक टूल’ तर Instagram वर पॉप-अप अलर्टस

ग्लेइचरने असंही म्हटलं म्हटलं आहे की, कंपनीने अफगाणिस्तानमधील युझर्ससाठी त्यांचे खातं लॉक करण्यासाठी ‘वन क्लिक टूल’ लाँच केलं आहे. त्यामुळे जे त्यांचे फेसबुक मित्र नाहीत ते त्यांच्या टाइमलाईन पोस्ट पाहू शकणार नाहीत किंवा त्यांचे प्रोफाइल फोटो शेअर करू शकणार नाहीत. “अफगाणिस्तानमध्ये आम्ही इन्स्टाग्रामवर पॉप-अप अलर्टस आणत आहोत ज्यामध्ये तुमचं खातं कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी विशिष्ट स्टेप्स असतील”, असंही ग्लेइचरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मानवाधिकार गटांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता

मानवाधिकार गटांनी याबाबत अशी चिंता व्यक्त केली आहे की, तालिबानी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर अफगाणी नागरिकांचा डिजिटल इतिहास किंवा सामाजिक संबंधांचा (डिजिटल हिस्ट्री आणि सोशल कनेक्शन्स) मागोवा घेण्यासाठी करू शकतात.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या आठवड्यात म्हटलं आहे की, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसह हजारो अफगाणींना तालिबानपासून गंभीर धोका आहे. इतकंच नव्हे तर, अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराने खेळाडूंना सोशल मीडिया डिलीट करण्याची आणि त्यांची सार्वजनिक ओळख पुसून टाकण्याचं आवाहन केलं आहे.

तोपर्यंत Twitter ‘ती’ खाती तात्पुरती स्थगित करणार

ट्विटर इंकने म्हटलं आहे की, ते देशातील गटांना समर्थन देण्यासाठी नागरी समाज भागीदारांच्या संपर्कात आहेत. तसेच, अर्काइव्ह ट्वीट काढून टाकण्यासाठी थेट विनंत्या गतिमान करण्यासाठी ते इंटरनेट अर्काइव्ह सोबत काम करत आहे. ट्विटरने असंही म्हटलं आहे की जर युझर्स त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यास असमर्थ असतील किंवा त्यांच्या खात्यावर अशी माहिती आहे ज्यामुळे त्यांना धोका पोहोचू शकत असेल तर, युझर्सना पुन्हा प्रवेश मिळेपर्यंत आणि आपला काँटेट हटवण्याचा एक्सेस मिळेपर्यंत कंपनी ती खाती तात्पुरती स्थगित करू शकते. ट्विटरने असंही सांगितलं आहे की ते सरकारी संस्थांशी संलग्न खात्यांचे सक्रियपणे निरीक्षण करत आहेत.

LinkedInने लपवलं आपल्या युझर्सचं कनेक्शन

लिंक्डइनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या व्यावसायिक नेटवर्किंग साईटने तात्पुरते अफगाणिस्तानमधील आपल्या युझर्सचं कनेक्शन लपवलं आहे. जेणेकरून इतर युझर्स त्यांना पाहू शकणार नाहीत.