Family Sharing Soap Is It Safe: घरात एकच साबण ठेवायचा आणि कुटुंबातील प्रत्येकाने त्याच साबणाने अंघोळ करायची, ही अनेक घरांमधील अगदी सामान्य सवय आहे. खर्च वाचतो आणि प्रत्येकासाठी वेगळा साबण ठेवण्याची गरजही राहत नाही. मात्र, तुम्ही वापरत असलेल्या साबणाच्या वडीवर नेमकं काय असतं, याचा कधी विचार केला आहे का? वापरलेला साबण ओला राहिला, तर त्यावर सूक्ष्मजीव आढळू शकतात, अशी माहिती काही संशोधनांतून समोर आली आहे. त्यामुळे एकाच साबणाचा संपूर्ण कुटुंबाने वापर करणे योग्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
मात्र, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. साबणावर जंतू आढळणे आणि त्या साबणामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उपलब्ध संशोधनात या दोन्ही बाबतीत वेगवेगळे निष्कर्ष दिसतात.
साबणाच्या वडीवर जंतू सापडतात?
२००६ मध्ये Indian Journal of Dental Research मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दंत चिकित्सालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साबणाच्या वड्यांची तपासणी करण्यात आली. संशोधकांनी १८ दंत चिकित्सालयांमधून साबणाचे ३२ नमुने घेतले. विशेष म्हणजे सर्व ३२ नमुन्यांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ आढळली. प्रत्येक साबणाच्या वडीवर साधारण दोन ते पाच प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या प्रजाती आढळल्या. जास्त वापरल्या जाणाऱ्या साबणांमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या तुलनेने अधिक असल्याचेही या अभ्यासात दिसून आले.
या अभ्यासात विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशीजन्य सूक्ष्मजीव आढळले, त्यामुळे वापरात असलेली साबणाची वडी ही सूक्ष्मजीवांचे ठिकाण बनू शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला. मात्र, हा अभ्यास दंत चिकित्सालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साबणांवर करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे निष्कर्ष प्रत्येक घरातील अंघोळीच्या साबणाला तंतोतंत लागू होतीलच, असे नाही.
आणखी एका अभ्यासात काय दिसले?
२०१५ मध्ये American Journal of Infection Control मध्ये प्रकाशित झालेल्या रुग्णालयातील अभ्यासातही साबणाच्या वड्या आणि द्रव स्वरूपातील साबणातील सूक्ष्मजीवांची तुलना करण्यात आली. वर्षभरात ९९ साबणाच्या वड्या आणि ६० द्रव स्वरूपातील साबणाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६१ साबणाच्या वड्या म्हणजे ६१.६ टक्के नमुन्यांमध्ये विविध सूक्ष्मजीव आढळले. द्रव स्वरूपातील साबणाच्या ६० नमुन्यांपैकी २ म्हणजे ३.३ टक्के नमुने दूषित आढळले.
मात्र, हा अभ्यासही रुग्णालयाच्या वातावरणातील साबणांवर आधारित होता. त्यामुळे घरात एकाच साबणाचा वापर केल्याने नक्कीच संसर्ग होतो, असा निष्कर्ष या आकडेवारीतून काढता येत नाही.
मग एकाच साबणामुळे संसर्ग होतो का?
इथेच खरी मेख समोर आली आहे. १९६५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दूषित साबणाच्या वड्यांमधून जीवाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात का, याची तपासणी करण्यात आली होती. या प्रयोगात वापरलेल्या साबणाच्या माध्यमातून जीवाणू सहजपणे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे आढळले नाही.
त्यानंतरच्या १९८८ मधील प्रयोगातही दूषित साबणाच्या वड्यांवर E. coli आणि Pseudomonas aeruginosa हे जीवाणू मुद्दाम ठेवून त्यांचा वापर करण्यात आला; परंतु प्रयोगांत सहभागी झालेल्या १६ व्यक्तींच्या हातांवर अंघोळीनंतर किंवा हात धुतल्यानंतर या दोन्ही जीवाणूंची लक्षणीय उपस्थिती आढळली नाही. संशोधकांनी नियमित हात धुण्यासाठी वापरलेल्या साबणाच्या वड्यांमुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याचे नमूद केले.
म्हणूनच एकाच साबणाचा वापर केला म्हणजे संसर्ग होणारच, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
मग घरात काय काळजी घ्यावी?
तरीही स्वच्छतेच्या दृष्टीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र साबणाची वडी ठेवणे हा अधिक सोपा पर्याय ठरू शकतो. विशेषतः एखाद्या व्यक्तीला त्वचेचा संसर्ग, जखम, पुरळ किंवा इतर त्वचारोग असल्यास वैयक्तिक वस्तू वेगळ्या ठेवणे अधिक योग्य ठरते.
साबण वापरल्यानंतर तो सतत पाण्यात किंवा ओलसर साबणदाणीत पडून राहणार नाही याची काळजी घ्या. साबण शक्यतो कोरडा राहील आणि पाणी निघून जाईल अशा साबणदाणीत ठेवावा. घरातील एखाद्या व्यक्तीला त्वचेचा संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैयक्तिक स्वच्छतेसाठी स्वतंत्र वस्तूंचा वापर करणे चांगले.
तसेच प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. एखाद्याला अनुकूल असलेला साबण दुसऱ्याच्या त्वचेला कोरडेपणा, खाज किंवा जळजळ देऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन, साबणाची निवड करणेही महत्त्वाचे आहे.
थोडक्यात, साबणाच्या वडीवर सूक्ष्मजीव आढळू शकतात हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे; मात्र त्यामुळे एकाच साबणाचा वापर केल्याने आजार हमखास पसरतो, असे ठोसपणे म्हणता येत नाही. तरीही स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने साबण कोरडा ठेवणे, त्वचेचा संसर्ग असल्यास वैयक्तिक साबण वापरणे आणि त्वचेला अनुकूल उत्पादन निवडणे या सवयींचा अवलंब करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
(महत्त्वाची सूचना : ही माहिती उपलब्ध संशोधनावर आधारित आहे. ती वैद्यकीय निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही. त्वचेवर सतत खाज, पुरळ, जळजळ किंवा संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
