कोणताही ऋतू असला तरी हल्ली उकाडा कायम असतो. त्यामुळे ‘ऊन जरा जास्त आहे.’ हे वाक्य आजकाल कोणत्याही महिन्यात, कोणत्याही दिवशी ऐकायला मिळते. मुंबई, ठाणेकरांना तर बाराही महिने तळपत्या उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागते. एप्रिल-मे आणि ऑक्टोबरमध्ये ते जरा जास्त असते इतकेच! अशा वातावरणात ‘कूल’ पेहरावानिशी आपण उकाडा आपल्यापुरता कमी करू शकतो..

ऋतुकालानुसार जसा आहारात बदल होतो, तसाच पेहेरावातही होतो. माणसांच्या कपडय़ांचा थेट संबंध त्या त्या भागातील हवामानाशी निगडित असतो. शहरी विभागात पावसाळा असो वा हिवाळा, उकाडा कायम असतो. त्यामुळे त्या हवामानाला अनुरूप कपडय़ांना पसंती दिली जाते. या दिवसात ट्रेंडी दिसावं म्हणून लेस, कॉटन व सिल्क विस्कॉस वापरतात. चिकन, ट्रॉपिकल वूल हे समर स्पेशल आहेत. या फॅब्रिक्सने घाम शोषला जातो आणि हवा खेळती राहते. उन्हाळ्याच्या या दिवसात अगदी हलकं, सुटसुटीत कपडे घातले जातात. त्यामध्ये क्रॅम्प, पॅण्ट, कफ्तान, मेश टॉप्स्, पलाझ्झो, जम्पसूट आदी कपडयांचे प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

सनकोटला पर्याय श्रगचा

सनकोट किंवा ओव्हरकोट्सची फॅशन आता आउटडेटेड झाली आहे. पोल्का डॉट्स किंवा फुलाफुलांचे सफेद सनकोट्स घेण्याऐवजी त्याचा थोडा स्टायलिश अवतार असलेले  कॉटन जॅकेट उपलब्ध आहेत. जॅकेट किंवा श्रग कॉटनचा आणि अगदी पातळ असला की झालं. कुठलाही टय़ुनिक, टीशर्ट आणि हे फंकी जॅकेट हे कोम्बो फारच उत्तम दिसेल. सध्या वेगवेगळ्या नेट जॅकेट, होजिअरी जॅकेटची चलती आहे. ठाण्यातील गावदेवी मार्केट, जांभळी नाका तसेच मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोड, फॅशन स्ट्रीट इत्यादी ठिकाणी अशी जॅकेट्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही २०० ते ५०० रुपयांच्या रेंजमध्ये आहे.

गॉगल्स

हल्ली सनग्लासेसच्या शेड्समध्ये विविधता पाहायला मिळते. मक्र्युरी/मिरर फिनिश ग्लेअर्सची चलती आहे. नुकतेच दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक बडय़ा ब्रॅण्डस्ने त्यांचे नवीन कलेक्शन बाजारात आणले. यामध्ये मक्र्युरी/ मिरर फिनीश ग्लेअर्स आहेत. या ग्लेअर्सचा वापर पार्टीसाठी करण्यात येतो. कलर्ड ग्लासेसमध्ये डोळ्यांना मानवेल, त्रास होणार नाही, अशा काचांचे ग्लासेस सध्या बाजारात पहायला मिळतात. काचांबरोबर विविध रंगाच्या फ्रेमस्ही बाजारात आल्या आहेत. ओव्हरसाइझ गॉगलची या मोसमातही चलती आहे. याशिवाय एव्हिएटर सनग्लासेसही ट्रेण्डमध्ये आहेत.

स्कार्फ

ऑक्टोबर हीटमध्ये प्रदूषण आणि चटके बसवणारे उन्हापासून संरक्षण म्हणून वापरले जाणारे स्कार्फ पुन्हा नव्या फॅशनमध्ये येत आहेत. स्टोल्सबरोबर शॉल्सचीही यंदा मार्केटमध्ये चलती आहे. एखाद्या पार्टीसाठी किंवा खास कार्यक्रमासाठी जाताना हे स्कार्फ वापरता येतात. वजनाला हलके आणि उन्हापासून संरक्षण करतील असे स्टोल्स आणि स्कार्फ सध्या मुलींमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. कॉटन, सिल्क, पश्मिना, काश्मिरी सिल्क या फॅब्रिक्समध्ये ते उपलब्ध आहेत. याबरोबरच कार्यालय किंवा महाविद्यालयात उपयोगी पडतील असे सिल्कचे स्टोल्सही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारण १०० रुपयांपासून हे सिल्कचे स्टोल्स मिळतात.

टय़ूनिक टॉप, स्ट्रेचेबल शर्ट, शॉर्ट शर्ट, टी-शर्ट, मिनी स्कर्ट, लाँग स्कर्ट, फॉर्मल ड्रेस, जिन्स पॅन्ट, लेगिंग्स प्रत्येक पोशाखासोबत स्कार्फ चांगले दिसतात. दिवसेंदिवस स्कार्फ तोंडाला गुंडाळण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा रीतीने स्कार्फ ही आता बहुउपयोगी वस्तू बनू लागली आहे.

मास्क..

सर्वसाधारणपणे त्वचा आणि चेहऱ्याच्या सौंदर्याविषयी काळजी घेण्यात महिला आघाडीवर असल्या तरी आता पुरुषही आपल्या चेहऱ्याची खास देखभाल करू लागले आहेत. उन्हाळ्यात त्वचा काळवंडू नये म्हणून पुरुषांसाठी खास स्कार्फ आणि मास्क बाजारात आले आहेत. आजवर पुरुष वर्ग उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून रुमाल चेहऱ्यावर बांधत होते. मात्र त्यांची ही गरज ओळखून बाजारात खास मुलांसाठी असलेले विविध आकारातील मास्क आले आहेत. हे मास्क आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. यामध्ये आकर्षक अशा प्रिंटस् आपल्याला पाहायला मिळतील..

हॅण्डग्लोव्हस्

सध्या बाजारामध्ये ट्रेण्डी असे हॅण्ड ग्लोव्हस् उपलब्ध आहेत. हल्ली दुचाकी चालवताना ऊन, वारा आणि धूळ या तिन्हीपासून बचाव करण्यासाठी या हातमोज्यांचा वापर केला जातो. यामध्ये महिलांसाठी खास रंगबेरंगी हातमोजे बाजारात उपलब्ध आहेत. हे मोजे कोपरापासून ते हाताच्या बोटांपर्यंतचा भाग पूर्णत: झाकतात, त्यामुळे सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पुरुषांसाठी रफ अ‍ॅण्ड टफ लुक देणारे असे मोजेही मिळतात. जे लोक दुचाकीशिवाय प्रवास करतात, त्यांच्यासाठीही बाजारात काही हातमोज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी मनगटी हातमोजे बाजारात मिळतात.

कुठे मिळतील ?

फॅशन स्ट्रीट, वांद्रे हिल रोड, कुलाबा कॉजवे, बांद्रा िलकिंग रोड, अंधेरी लोखंडवाला मार्केटमध्ये या सर्व वस्तू उपलब्ध आहेत. सध्या मॉल्समध्येही कुल कलेक्शन्स पाहायला मिळतात. या सर्वाच्या किमती साधारणपणे २०० रुपयांपासून सुरू होतात.