How Poor Sleep Can Spike Your Blood Sugar Overnight :मधूमेह ही केवळ आहाराशी संबंधित समस्या नसून ती संपूर्ण जीवनशैलीशी जोडलेली आहे. सकाळी रिकाम्या पोटी (फास्टिंग)ते जेवणानंतर (पोस्ट-मील) पर्यंत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. मात्र अनेक रुग्ण असे आढळतात की, ते मधुमेह कमी करणारा आहार घेत असूनही त्यांची रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी सातत्याने जास्त येते. अशा वेळी प्रश्न पडतो—नेमकं चुकतंय तरी कुठे?

ठाण्यातील KIMS हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसिन विभागातील सल्लागार डॉ. अनिकेत मुळे यांच्या मते, रात्रीची अपुरी झोप ही रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामागील एक महत्त्वाची आणि दुर्लक्षित कारणे आहे.

झोप आणि रक्तातील साखरेची पातळी यांचा थेट संबंध

मधूमेह नियंत्रणासाठी आहार आणि व्यायामा इतकाच झोपेचा दर्जा महत्त्वाचा असतो. शरीराला दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत आणि सलग झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र अनेक रुग्ण रात्री नीट झोपत नाहीत—वारंवार जाग येणे, तणाव, मोबाइल स्क्रीनचा जास्त वापर, उशिरा झोपणे यामुळे झोपेचा दर्जा खालावतो.

डॉ. मुळे सांगतात की, “झोप अपुरी राहिल्यास शरीरात ‘कॉर्टिसोल’ या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढते. हा हार्मोन्स वाढला की शरीरातील पेशी इंसुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. परिणामी, रक्तातील साखर पेशींमध्ये शोषली जात नाही आणि रक्तामध्येच जास्त काळ राहते. यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात.

एक रात्रीची कमी झोपही ठरू शकते कारण

‘Journal of Clinical Endocrinology & Metabolism’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, एखाद्या निरोगी व्यक्तीनेही जर सलग एक रात्र चार तासांपेक्षा कमी झोप घेतली, तर दुसर्‍या दिवशी त्याची इंसुलिन संवेदनशीलता २० ते २५ टक्क्यांनी घटू शकते. म्हणजेच, शरीराला साखर नियंत्रित करण्यात लगेचच अडथळा येतो.

तज्ज्ञांच्या मते, अनेकांना वाटते की मेटाबॉलिक बदल हळूहळू होतात, मात्र प्रत्यक्षात शरीर काही तासांतच त्याची प्रतिक्रिया दाखवते. त्यामुळे नेहमी सुरक्षित मानला जाणारा नाश्ता देखील अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो.

आहार योग्य असूनही रक्तातील साखरेची पातळी वाढत असेल तर काय करावे?

डॉ. मुळे स्पष्ट करतात की, अशा परिस्थितीत घाबरून आहार अधिक कमी करणे हा उपाय नाही. उलट, झोपेच्या सवयी सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे.

  • नियमित वेळेला झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा
  • झोपण्याआधी स्क्रीन टाइम कमी करा
  • रात्री जड आणि उशिरा जेवण टाळा
  • पुरेसे पाणी प्या
  • आहारात प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅटचा समावेश ठेवा

जर सातत्याने रिकाम्या पोटी किंवा दिवसातील रक्तातील साखरेची पातळी रीडिंग असामान्य येत असतील, तर हा संकेत आहे की केवळ आहार नव्हे, तर झोपेची जीवनशैली बदलण्याची गरज आहे.

मधूमेहसाठी झोप का इतकी महत्त्वाची?

तज्ज्ञांच्या मते, झोप ही शरीराची रीसेट सिस्टीम आहे. गाढ झोपेत भूक, तृप्ती आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे हार्मोन्स नैसर्गिक चक्रात काम करतात. झोप कमी झाल्यास हा समतोल बिघडतो. परिणामी भूक वाढते, कार्बोहायड्रेट्सची ओढ वाढते आणि साखर पचवण्याची क्षमता कमी होते.

दीर्घकाळ हीच स्थिती राहिल्यास, आहार योग्य असूनही मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढू शकतो.

निष्कर्ष

मधूमेह नियंत्रणासाठी केवळ काय खातो याकडे नव्हे, तर कधी आणि किती झोपतो याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. शांत, पुरेशी झोप ही औषधा इतकीच प्रभावी ठरू शकते—विशेषतः रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी.