Shortness of Breath Causes: स्वास्थ्यकर आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मनही प्रसन्न राहते. आजकाल जिमला जाण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सकाळी लवकर केलेला व्यायाम शरीराला अधिक ऊर्जा देतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक बनवतो. मात्र, व्यायाम करताना योग्य पद्धतींचे पालन न केल्यास उलट थकवा आणि श्वास लागण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सध्या धाप लागणे किंवा चालताना-धावताना श्वास जलद होणे ही समस्या खूप सामान्य झाली आहे. केवळ वयस्करच नाही, तर तरुणांमध्येही हा त्रास वाढताना दिसतो. अनेकांना धावताना किंवा अगदी जलद चालतानाही लवकर दम लागतो. त्यामुळे ते नियमित कार्डिओ व्यायाम करण्यापासून दूर राहतात. सुरुवातीला ही गोष्ट सामान्य वाटली तरीत्याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, व्यायाम करताना श्वासोच्छ्वासाची योग्य पद्धत खूप महत्त्वाची असते. बहुतेक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. धावताना किंवा चालताना शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज असते. अशा वेळी योग्य श्वास घेतला नाही, तर शरीर पटकन थकते. म्हणूनच व्यायाम करताना नेहमी नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. तशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
तसेच, श्वास नेहमी खोल आणि संथपणे घ्यावा. लहान लहान श्वास घेतल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि कार्बन डायऑक्साइड योग्य प्रकारे बाहेर पडत नाही. परिणामी थकवा अधिक जाणवतो. त्यामुळे प्रत्येक श्वास दीर्घ आणि नियंत्रित असेल याकडे विशेष लक्ष द्या.
व्यायाम करताना शरीराची स्थिती (पोश्चर)देखील तितकीच महत्त्वाची आहे. चालताना किंवा धावताना पाठीचा कणा सरळ ठेवा, खांदे मोकळे ठेवा आणि नजर समोर ठेवा. योग्य पोश्चरमुळे श्वास घेणे सोपे होते आणि शरीरावर अनावश्यक ताण येत नाही. जर तुम्ही कमी गती ठेवून धावत असाल, तर नाकाने श्वास घेणे अधिक फायदेशीर ठरते.
अनेक जण धाप लागते म्हणून धावायला घाबरतात. परंतु, धावताना थोडी धाप लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण- त्या वेळी हृदय वेगाने काम करत असते आणि शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासते. मात्र, हा त्रास खूप वाढत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
नियमित व्यायाम, योग्य श्वासोच्छ्वास आणि संतुलित जीवनशैली यांमुळे केवळ थकवाच कमी होत नाही, तर हृदयही मजबूत राहते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात या सोप्या सवयी अंगीकारा आणि स्वास्थ्यशील, ऊर्जावान आयुष्याचा आनंद घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
