Why Do You Feel Dizzy After Waking Up: सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही क्षणांसाठी डोके गरगरणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा शरीर हलके झाल्यासारखे वाटणे, असा अनुभव अनेकांना येतो. बहुतेक जण याकडे थकवा, झोप अपुरी होणे किंवा अशक्तपणा म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, अशा समस्येचा जर वारंवार त्रास होत असेल, तर ती शरीरातील एखाद्या गंभीर बदलाचा किंवा आजाराचा इशारा असू शकते.
तज्ज्ञांच्या मते, बहुतांश वेळा झोपेतून उठताच चक्कर येण्यामागे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन (Orthostatic Hypotension) हे कारण असू शकते. झोपलेल्या अवस्थेतून अचानक उभे राहिल्यावर काही क्षणांसाठी मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे चक्कर आल्यासारखे वाटते.
ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेल्या किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभी राहते, तेव्हा काही वेळासाठी रक्तदाब झपाट्याने कमी होऊ शकतो. शरीराला हा बदल लगेच नियंत्रित करता आला नाही, तर डोके गरगरणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा तोल जाण्यासारखा त्रास होऊ शकतो.
ही समस्या विशेषतः…
ज्येष्ठ नागरिकांमध्ये, कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये, तसेच काही विशिष्ट औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.
सकाळी उठल्यावर चक्कर येण्यामागची सामान्य कारणे
१. शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
रात्री झोपेत असताना शरीरातील पाण्याचे प्रमाण काहीसे कमी होते. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास सकाळी रक्तदाब कमी होऊन चक्कर येऊ शकते. तसेच मद्यपान किंवा कॅफिनचे जास्त सेवन केल्यानेही ही समस्या वाढू शकते.
२. रक्तातील साखर कमी होणे (लो ब्लड शुगर)
रात्रीपासून सकाळपर्यंत बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या आणि इन्सुलिन किंवा औषधे घेणाऱ्या व्यक्तींमध्ये चक्कर, अशक्तपणा आणि घाम येणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
३. औषधांचे दुष्परिणाम
उच्च रक्तदाब, नैराश्य, हृदयविकार किंवा झोपेच्या गोळ्या यांसारखी काही औषधे रक्तदाबावर परिणाम करतात. त्यामुळे सकाळी उठताना चक्कर येण्याची शक्यता वाढू शकते.
४. स्लीप ॲप्निया
झोपेत वारंवार श्वास थांबण्याच्या समस्येला स्लीप ॲपनिया, असे म्हणतात. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि सकाळी उठल्यावर डोके जड होणे किंवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.
५. कानाशी संबंधित समस्या
आपल्या शरीराचा तोल सांभाळण्यात कानाच्या आतील भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागात सूज, संसर्ग किंवा इतर बिघाड झाल्यास अचानक चक्कर येणे, तोल जाणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
त्याशिवाय अॅनिमिया (रक्ताची कमतरता), मायग्रेन किंवा काही न्यूरोलॉजिकल विकार यांमुळेही वारंवार चक्कर येऊ शकते.
सकाळी चक्कर येऊ नये यासाठी काय कराल?
- उठताना एकदम उभे राहू नका.
- आधी काही क्षण पलंगावर बसून मग हळूहळू उभे राहा.
- दिवसभर पुरेसे पाणी प्या.
- सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
- रात्री मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेयांचे जास्त सेवन टाळा.
- नाश्ता कधीही टाळू नका.
- एखादे औषध सुरू केल्यानंतर ही समस्या वाढली असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉक्टरांकडे कधी जावे?
जर सकाळी उठल्यावर वारंवार चक्कर येत असेल, त्यासोबत बेशुद्ध पडणे, बोलण्यात अडचण, हात-पाय सुन्न होणे, छातीत दुखणे किंवा दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण काही वेळा ही लक्षणे गंभीर आजारांचे संकेतही असू शकतात.
[टीप (Disclaimer) : ही माहिती विविध संशोधन आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय समजू नये. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.]
