Dizziness When Standing Up: अनेकांना कधी ना कधी असा अनुभव येतो की, खुर्ची किंवा बेडवरून अचानक उभे राहिल्यावर डोके गरगरते, डोळ्यांसमोर अंधार येतो किंवा क्षणभरात तोल जाईल, असे वाटते. अनेक जण याला थकवा किंवा सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशी लक्षणे वारंवार दिसत असतील, तर ती शरीरात सुरू झालेल्या एका आरोग्य समस्येचा तो इशारा असू शकतो.
वैद्यकीय भाषेत या स्थितीला ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन किंवा पोश्चर हायपोटेन्शन, असे म्हटले जाते. साध्या भाषेत सांगायचे झाले, तर बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतून अचानक उभे राहिल्यावर शरीराचा रक्तदाब पटकन संतुलित होत नाही. त्यामुळे काही क्षणांसाठी मेंदूपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नाही आणि त्यामुळे चक्कर येणे, धूसर दिसणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे, अशी लक्षणे दिसू लागतात.
तज्ज्ञांच्या मते, आपण उभे राहतो त्या क्षणी गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्ताचा काही भाग पायांकडे सरकतो. सामान्य परिस्थितीत शरीरातील नर्व्हस सिस्टीम त्वरित प्रतिक्रिया देत, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाची धडधड किंचित वाढते. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीतपणे होतो; पण जर ही प्रक्रिया उशिरा झाली, तर काही क्षणांसाठी मेंदूला कमी रक्त आणि ऑक्सिजन मिळतो. याच वेळी चक्कर येण्याची समस्या जाणवते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता, रक्ताची कमतरता, काही औषधांचा परिणाम, दीर्घकाळ बेडवर विश्रांती घेणे किंवा वाढते वय ही या समस्येमागील प्रमुख कारणे असू शकतात. वय वाढल्यावर शरीराची प्रतिक्रिया देण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे ही समस्या वृद्धांमध्ये अधिक दिसून येते.
काही संशोधनांमध्ये एक धक्कादायक बाबही समोर आली आहे. उभे राहिल्यानंतर पहिल्या एका मिनिटात रक्तदाब अचानक कमी झाल्यास भविष्यात डिमेन्शिया (स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार) होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः उभे राहिल्यानंतर ३० सेकंदांच्या आत सिस्टोलिक रक्तदाब २० mmHg किंवा त्यापेक्षा जास्त कमी झाल्यास पुढील काळात मेंदूशी संबंधित समस्या उदभवण्याची शक्यता जास्त असल्याचे काही अभ्यासात दिसून आले आहे.
म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला आहे की, जर वारंवार उभे राहिल्यावर चक्कर येत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन उभे राहिल्यावर रक्तदाबाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये या समस्येमुळे पडणे, हाड मोडणे किंवा गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो.
या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही साध्या सवयी उपयुक्त ठरू शकतात. उदाहरणार्थ- अचानक उभे राहण्याऐवजी हळूहळू उठणे, पुरेसे पाणी पिणे, शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे, पायांचे हलके व्यायाम करणे आणि घरात घसरणार नाही याची काळजी घेणे. तसेच कोणती औषधे घेत असाल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.
वेळीच योग्य काळजी घेतली आणि जीवनशैलीत छोटे बदल केले, तर ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे पुढच्या वेळी उभे राहिल्यावर चक्कर आली, तर ती साधी गोष्ट समजून दुर्लक्ष करण्याऐवजी शरीर देत असलेला तो संकेत समजून घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
