The Reason Why You Feel Sleepy Every Afternoon After Lunch: दुपारचे जेवण झाल्यानंतर अचानक डोळ्यांवर झोप येणे, कामात लक्ष न लागणे, सतत जांभई येणे किंवा काही वेळ वामकुक्षी घ्यावीशी वाटणे, हा अनुभव अनेकांना येतो. विशेषतः भरपेट जेवण केल्यानंतर शरीर जड झाल्यासारखे वाटते आणि काही वेळ डुलकी काढावीशी वाटते. त्यामुळे अनेक जण याकडे अगदी सामान्य गोष्ट म्हणून पाहतात. मात्र, जेवल्यानंतर रोजच खूप झोप येत असेल, थकवा जाणवत असेल किंवा एकाग्रता कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
भारताचे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, जेवल्यानंतर जाणवणारा थकवा हा शरीरातील चयापचय यंत्रणा अन्नावर कशी प्रक्रिया करते, संप्रेरकांचे संतुलन कसे राखते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नियंत्रित करते, याच्याशी संबंधित असू शकतो.
जेवल्यानंतर झोप का येते?
जेवल्यानंतर शरीराचे लक्ष अन्नाच्या पचनक्रियेकडे वळते. पचन होण्याच्या दृष्टीने पोट आणि आतड्यांकडे रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे काही काळ शरीराला सुस्ती किंवा आळस जाणवू शकतो. परिणामी डोळ्यांवर झोप येणे, कामात लक्ष न लागणे किंवा थोडी वामकुक्षी घ्यावीशी वाटणे स्वाभाविक आहे.
विशेषतः भरपेट जेवण केल्यानंतर ही भावना अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच अतिशय कष्टाचे किंवा जोरदार शारीरिक काम करण्याऐवजी शरीराला थोडा वेळ देणे योग्य ठरते. हृदयविकार असलेल्या व्यक्तींमध्ये जेवणानंतर शरीरातील रक्तप्रवाहात होणाऱ्या बदलांमुळे काही वेळा छातीत दुखण्यासारखी समस्या वाढू शकते.
भरपेट जेवणामुळे वाढते सुस्ती
जेवल्यानंतर येणाऱ्या सुस्तीमागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अति प्रमाणात खाणे. मोठ्या प्रमाणात अन्न खाल्ल्यास शरीराला ते पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यातच पांढरा तांदूळ, मिठाई, गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांसारखे शुद्ध कर्बोदकांनी युक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले, तर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.
रक्तातील साखर वाढल्यानंतर शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते. अशा रीतीने रक्तशर्करेची वेगाने वाढ वा घट झाल्यामुळे काही व्यक्तींना अचानक अशक्तपणा, जडपणा किंवा प्रचंड झोप येऊ शकते.
डॉ. व्ही. मोहन सांगतात, “जेवल्यानंतर थोडी विश्रांती किंवा निवांतपणा जाणवणे सामान्य आहे; मात्र रोज प्रत्येक जेवणानंतर खूप झोप येत असेल, थकवा जाणवत असेल किंवा लक्ष केंद्रित करता येत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखरेचे नियंत्रण योग्य नसल्याचा हा सुरुवातीचा संकेत असू शकतो.”
रोज जेवल्यानंतर डुलक्या येत असल्यास सावध व्हा!
कधीतरी जेवल्यानंतर झोप येणे ही चिंतेची बाब नसू शकते. मात्र, जवळपास प्रत्येक वेळी जेवणानंतर खूप मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत असेल, डोळे मिटत असतील किंवा काम करणे कठीण होत असेल, तर यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
रक्तातील साखरेमध्ये वारंवार होणारे चढ-उतार काही वेळा पूर्वमधुमेह किंवा मधुमेहाचा सुरुवातीचा इशारा ठरू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे वारंवार जाणवत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि आवश्यक तपासण्या करून घेणे योग्य ठरते.
थोडे बदल करा, जेवणानंतरचा थकवा कमी होऊ शकतो
जेवणाचे प्रमाण कमी ठेवणे, ताटात प्रथिने आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे, तसेच गोड आणि अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे, अशा पद्धतीने आपल्यावर योग्य रीतीने नियंत्रण ठेवल्यास रक्तातील साखर अधिक स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते.
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी काही वेळ हलके चालणेही उपयुक्त ठरू शकते. नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि वजन नियंत्रणात ठेवणे यामुंळे दिवसभरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
म्हणूनच दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या डुलकीकडे नेहमीच केवळ आळस म्हणून पाहू नका. कधीतरी येणारी वामकुक्षी सामान्य असू शकते; पण रोजची तीव्र झोप आणि येणारा थकवा शरीराकडून मिळणारा एखादा धोक्याचा संकेतही असू शकतो. शरीर देत असलेल्या अशा छोट्या छोट्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या ओळखण्यास आणि त्यावर वेळीच योग्य उपाय करण्यास मदत होऊ शकते.
