Feet Tingling Symptoms: तुम्हालाही अनेकदा पायात जळजळ जाणवते का? जर पायात सतत जळजळ होत असेल, वारंवार मुंग्या येत असतील आणि त्याचं नेमकं कारण समजत नसेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कारण ही समस्या पेरिफेरल न्यूरोपॅथी (Peripheral Neuropathy) मुळे असू शकते.

पेरिफेरल न्यूरोपॅथीचा परिणाम हात, पाय आणि बाहूंवर होऊ शकतो, मात्र बहुतेक वेळा पाय जास्त प्रभावित होतात. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर उपचार कसे केले जातात, हे जाणून घेऊया.

पेरिफेरल न्यूरोपॅथीनुसार वेगवेगळी लक्षणं

सेन्सरी न्यूरोपॅथी: या प्रकारात स्पर्श, तापमान, वेदना किंवा इतर संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या नसांना इजा होते.

मोटर न्यूरोपॅथी: या प्रकारात शरीराच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांना इजा होते.

ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी: या प्रकारात पचनक्रिया, मूत्राशयाचं कार्य आणि रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होतो.

मोनोन्यूरोपॅथी: या प्रकारात सेंट्रल नर्व्हस सिस्टिमच्या बाहेरील एखादी एकच नस खराब होते.

पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये रुग्णाला यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त प्रकारांचा त्रास होऊ शकतो.

सेन्सरी न्यूरोपॅथीची लक्षणं

  • प्रभावित भागात सुई टोचल्यासारखं वाटणं
  • पाय सुन्न होणं आणि वेदना किंवा तापमानातील बदल जाणवत नाहीत
  • पायात अचानक तीव्र वेदना होणं
  • हलकासा स्पर्श झाला तरी वेदना होणं
  • तोल जाणं आणि पायांची स्थिती नीट समजत नाही

मोटर न्यूरोपॅथीची लक्षणं

  • स्नायूंमध्ये गोळे येणं किंवा स्नायू फडफडणं
  • स्नायू कमकुवत होणं किंवा पक्षाघात होणं, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त स्नायूंवर परिणाम होतो
  • स्नायू बारीक होणं
  • पायाचा पंजा वर उचलताना अडचण येणं

ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीची लक्षणं

  • बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणं, विशेषतः रात्री हा त्रास जाणवणं
  • पोट फुगणं, पोटातून आवाज येणं, मळमळ होणं
  • रक्तदाब कमी होऊन चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं
  • हृदयाचे ठोके वेगाने धडधडणं
  • नेहमीपेक्षा जास्त घाम येणं
  • पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या
  • मूत्राशय पूर्णपणे रिकामा करण्यात अडचण येणं
  • शौचावर नियंत्रण राहू नये

मोनोन्यूरोपॅथीची लक्षणं

  • बोटांची संवेदना कमी होणं आणि कमजोरी जाणवणं
  • एकच वस्तू दोन दिसणं (डबल व्हिजन) आणि डोळ्यांनी नीट फोकस करता न येणं
  • चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी जाणवणं
  • पायात वेदना, कमजोरी आणि संवेदना कमी होणं

पेरिफेरल न्यूरोपॅथीवर उपचार कसे केले जातात?

पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये सर्वप्रथम या समस्येचं नेमकं कारण शोधलं जातं आणि ते दूर करण्यावर भर दिला जातो. जर शरीरात व्हिटॅमिन बी12ची कमतरता असेल तर ती भरून काढली जाते. मधुमेह असल्यास तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय नसांमधील वेदना कमी करण्यासाठीही उपचार केले जातात. रुग्णाच्या समस्येनुसार डॉक्टर योग्य उपचार ठरवतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)