Home Remedies for Gas: अनेकदा भूक लागल्यामुळे आपण जेवताना गरजेपेक्षा जास्त खातो. कधी आवडीचे पदार्थ पाहून जेवणावर ताव मारला जातो, तर कधी तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा आहारात समावेश होतो. मात्र, जेवण झाल्यानंतर काही वेळातच पोट जड होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, ढेकर येणे किंवा गॅसमुळे अस्वस्थता जाणवणे, अशा समस्या अनेकांना सतावतात. विशेषतः रात्रीचे जेवण भरपेट केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल, तर काही जणांना पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो.

काही लोकांना थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट फुगल्यासारखे वाटते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ब्लोटिंग म्हणजेच पोटफुगी, असे म्हटले जाते. अशा वेळी पोटात ताण जाणवणे, अस्वस्थ वाटणे आणि दैनंदिन कामांवरही परिणाम होणे शक्य आहे. गॅस, अपचन व बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारींमागे खाण्यापिण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाल किंवा पचनसंस्थेशी संबंधित इतर कारणे असू शकतात.

अशा वेळी अनेक जण घरगुती उपायांचा आधार घेतात. जेवणानंतर काही पदार्थ खाण्याची भारतीय परंपराही याच संदर्भात लक्ष वेधून घेते. मात्र, एखादा घरगुती पदार्थ खाल्ल्याने प्रत्येकाला सारखाच फायदा होईल, असे नाही. त्यामुळे कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा आणि कोणत्या वेळी त्याचे सेवन करावे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

भरपेट जेवणामुळे पचनावर ताण येऊ शकतो?

भूक लागल्यावर गरजेपेक्षा जास्त खाणे, एकाच वेळी भरपूर अन्न सेवन करणे किंवा जेवल्यानंतर लगेच आडवे होणे, या सवयींमुळे काही लोकांना पोट जड होणे आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो. तेलकट पदार्थ आणि अतिमसालेदार अन्नाचे सेवन केल्यानंतरही काही जणांना अस्वस्थता जाणवते.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल छाजेर यांच्या मते, भरपेट जेवण केल्यामुळे अन्नाचे पचन करणे शरीरासाठी तुलनेने कठीण होऊ शकते. त्यामुळे जेवताना पोट तुडुंब भरण्याऐवजी आवश्यक तेवढेच अन्न खाणे महत्त्वाचे आहे.

जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी काही वेळ सरळ बसणे किंवा हलके चालणे उपयुक्त ठरू शकते. मात्र, वारंवार पोट फुगणे, सतत ढेकर येणे किंवा पोटात दुखणे यांसारखी लक्षणे दिसत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये.

पचनासाठी बडीशेप कशी ठरू शकते उपयुक्त?

भारतीय घरांमध्ये जेवणानंतर बडीशेप खाण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. काही ठिकाणी बडीशेपचा वापर मुखशुद्धीसाठी केला जातो. बडीशेपमध्ये तंतुमय पदार्थ आणि विविध वनस्पतीजन्य घटक असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून तिचा समावेश केला जाऊ शकतो.

बडीशेपेतील तंतुमय घटक आतड्यांच्या नियमित कार्यासाठी मदत करू शकतात. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि तंतुमय पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करणे यांमुळे मलविसर्जन नियमित ठेवण्यास मदत होऊ शकते. काही लोकांना बडीशेप खाल्ल्यानंतर पोटातील अस्वस्थता कमी झाल्यासारखी वाटू शकते. मात्र, गॅस किंवा पोटफुगीवर बडीशेपेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सारखाच असेल, याची खात्री देता येत नाही.

बडीशेप चावून खाणे हा तिच्या सेवनाचा एक सोपा मार्ग आहे. तसेच बडीशेप पाण्यात भिजवून किंवा उकळून तयार केलेले पाणीही काही जण पितात. मात्र, बडीशेपचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता किंवा पोटफुगी हमखास दूर होते, असा निष्कर्ष काढता येत नाही.

खडीसाखरेसोबत खाल्ल्याने काय फायदा?

जेवणानंतर बडीशेपेसोबत आणखी एका पदार्थाचे सेवन करण्याची पद्धत अनेक घरांमध्ये दिसते. या दोन्ही पदार्थांचे मिश्रण मुखशुद्धीसाठी वापरले जाते. बडीशेपेमुळे तोंडाला ताजेपणा जाणवू शकतो; तर खडीसाखर गोड चव देते.

खडीसाखर हा साखरेचाच एक प्रकार असल्यामुळे तिचे सेवन करताना प्रमाणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खडीसाखर नियमित खाण्यापूर्वी आपल्या आहारातील साखरेचे प्रमाण लक्षात घ्यावे. खडीसाखर शरीरातील विषारी घटक बाहेर काढते किंवा पचनसंस्था सुधारते, असे ठोसपणे सांगण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

त्यामुळे या मिश्रणाकडे पचनाच्या त्रासावरील हमखास उपचार म्हणून न पाहता, मर्यादित प्रमाणात घेतला जाणारा पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून पाहणे योग्य ठरेल.

सेवन कसे करावे?

बडीशेपचा आहारात समावेश करण्याचे काही सोपे मार्ग आहेत.

चावून खाणे : जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खाता येते.
बडीशेपचे पाणी: बडीशेप पाण्यात भिजवून किंवा उकळून, ते पाणी गाळून पिता येते.
प्रमाणाकडे लक्ष द्या : कोणताही पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळावे. खडीसाखरेचे सेवनही मर्यादित ठेवावे.
खाण्याच्या सवयी सुधारा: हळूहळू खाणे, अन्न नीट चावणे, एकाच वेळी अति प्रमाणात न खाणे आणि जेवणानंतर हलके चालणे या सवयी उपयुक्त ठरू शकतात.

मग जेवणानंतर कोणते दोन पदार्थ खाता येतात?

जेवणानंतर पोटातील अस्वस्थता कमी व्हावी आणि तोंडाला ताजेपणा मिळावा, यासाठी पारंपरिक पद्धतीने एकत्र खाल्ले जाणारे दोन पदार्थ म्हणजे बडीशेप आणि खडीसाखर!

या दोन्ही पदार्थांचे थोड्या प्रमाणात सेवन करता येऊ शकते. मात्र, गॅस, आम्लपित्त, अपचन किंवा पोटफुगीचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील कारण शोधणे महत्त्वाचे आहे. विशेषतः तीव्र पोटदुखी, उलट्या, मलविसर्जनात रक्त किंवा अनपेक्षित वजन घटणे, अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

(महत्त्वाची टीप: ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. बडीशेप आणि खडीसाखर हे वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. पचनाशी संबंधित तक्रारी कायम राहिल्यास किंवा वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)