केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स वापरले जातात. बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत असतो, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. यासाठी काही टिप्स वापरून केसांची काळजी घेतली तर तुम्हाला केस निरोगी ठेवण्यात आणि त्यांचे सौंदर्य वाढवण्यात नक्की मदत मिळू शकते. मेथीचा वापर करून देखील आपण केसांची काळजी घेऊ शकतो. कारण मेथीमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी अनेक खनिजे आढळतात.
मेथीमुळे केस कोरडे होणे, केस गळणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा फायदा होतो. मेथी केसांच्या मुळापर्यंत पोषण पुरवते. दाट, निरोगी आणि काळे केस मिळवण्यासाठी मेथीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात.




हेही वाचा : Beauty Tips: त्वचेवर काळे डाग आहेत? टेन्शन घेऊ नका, फक्त दुधाचा असा करा वापर…
मेथी हेअर मास्क
केसांना तुम्ही मेथीचा मास्क पण लावू शकता. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावावी. २० मिनिटे ते अर्धा तास तुम्ही हे केसांना लावून ठेवू शकता. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून एकदा तुम्ही हा हेअर मास्क लावल्यास केस गळणे कमी होऊ शकतात. मेथीच्या नियमित वापरामुळे केस काळे देखील होतात.
कोंडा दूर करण्यासाठी
केसांमध्ये झालेला कोंडा दूर करण्यासाठी २ चमचे मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करावा. लिंबाचा रस नसल्यास दही देखील तुम्ही वापरू शकता. ही पेस्ट अर्धा तास केसांवर लावावी. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल.
दाट आणि मऊ केसांसाठी
प्रत्येकालाच वाटत असते की आपले केस हे दाट आणि मुलायम असावेत. यासाठी तुम्हाला २ चमचे नारळाचे दूध आणि त्यात मेथीची पेस्ट व लिंबाचा रस मिक्स करायचे आहे. या मिश्रणाचा हेअर मास्क तुम्हाला तुमचे केस मुलायम आणि दाट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकता. हा हेअर मास्क तुम्ही साधारणपणे २० मिनिटे केसांना लावायचे आहे. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)