Fenugreek seeds benefits for diabetes: स्वयंपाकघरात सहज आढळणारे मेथीचे दाणे केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत, तर पोषणशास्त्राच्या दृष्टीने ते अत्यंत प्रभावी ‘बायो-ॲक्टिव्ह’ सुपरफूड मानले जातात. क्लिनिकल न्यूट्रिशन आणि चयापचय क्रियेबाबतच्या संशोधनानुसार, केवळ १४ दिवस योग्य पद्धतीने मेथीच्या दाण्यांचे नियमित सेवन केल्यास शरीराच्या संपूर्ण चयापचय प्रक्रियेत आतून आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. पारंपरिक उपाय आणि ऑनलाइन माहितीनुसार, सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने वजन वेगाने कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी (मधुमेह) सहजपणे नियंत्रित राहण्यास मदत होते. परंतु, मेथी दाणे खरोखरच अतिरिक्त वजन आणि रक्तातील वाढलेली साखर पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतात का? विज्ञान आणि आहारतज्ज्ञ या दाव्यांशी सहमत आहेत का? कोणताही घरगुती उपायाचा विचार करण्यापूर्वी, त्यामागचा वैज्ञानिक आधार आणि त्याचे योग्य प्रमाण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक आणि विश्वसनीय उत्तरे डॉ. हंसा योगेंद्र यांनी दिली आहेत. सलग दोन आठवडे दररोज मेथीचे दाणे खाल्ल्याने आपल्या चयापचय क्रियेवर आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो, ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणी त्याचे अतिसेवन टाळावे, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

मेथीच्या बियांचे पोषक घटक

मेथीच्या बिया या पोषक घटकांचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये फायबर (तंतुमय पदार्थ), प्रथिने, कर्बोदके आणि विविध फायटोकेमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, पोटॅशियम, तांबे व मँगनीज यांसारखी आवश्यक खनिजेही आढळतात. मेथीमध्ये असलेली अँटीऑक्सिडंट्स आणि सॅपोनिन्स शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

वात आणि कफ दोष संतुलित करण्यास मदत

आयुर्वेदानुसार, १४ दिवस नियमितपणे मेथी दाण्यांचे सेवन केल्याने शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित होण्यास मदत होऊ शकते. मेथीचा उष्ण गुणधर्म शरीरात साचलेला अतिरिक्त कफ कमी करण्यासाठी आणि गॅस, शरीरातील ताठरपणा व जडपणा यांसारख्या वात-संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

रक्तातील शर्करा नियंत्रणास साह्य

मेथीमध्ये विरघळणाऱ्या तंतूमय पदार्थांचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे जेवणानंतर शरीरात ग्लुकोज शोषले जाण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यावर नियंत्रण राहते आणि मधुमेह व्यवस्थापनात मदत होते.

Journal of Diabetes and Metab्olic Disorders और National Center for Biotechnology Information (NCBI) एका प्रकाशित वैद्यकीय अभ्यासानुसार, मेथीच्या दाण्यांमध्ये ‘गॅलेक्टोमनन’ (galactomannan) नावाचा अत्यंत चिकट आणि पाण्यात विरघळणारा तंतुमय घटक (soluble fiber) असतो. जेव्हा तुम्ही मेथीचे दाणे खाता, तेव्हा हा घटक जठर आणि लहान आतड्यामध्ये एक संरक्षक म्हणून जेलसारखा थर तयार करतो. हा जेल अन्नातील कर्बोदके (carbohydrates) आणि ग्लुकोज शोषले जाण्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी करतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखण्यास मदत होते.

पाचनसंस्था सुधारण्यासाठी फायदेशीर

मेथीमधील फायबर आणि नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट जड वाटणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. नियमित सेवनामुळे मलविसर्जनाची प्रक्रिया सुरळीत राहते आणि परिणामी पचनसंस्था निरोगी राहते.’इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशन’ आणि ‘युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच ‘म्युसिलेज’ (mucilage) नावाचा एक नैसर्गिक चिकट पदार्थ असतो, जो जुनाट बद्धकोष्ठतेवरही गुणकारी ठरतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, मेथीचे नियमित सेवन केल्याने एलडीएल (वाईट) कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यातील फायबर आणि सॅपोनिन्स चरबीच्या शोषणावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो.

वजन नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

मेथीचे दाणे आणि पाने फायबर व अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहण्यास मदत होते. त्याचे नियमित आणि संतुलित सेवन केल्याने वारंवार लागणारी भूक कमी होऊ शकते. परिणामी, अनावश्यक खाणे आणि अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळता येते. त्याव्यतिरिक्त, मेथीचे दाणे दाहविरोधी (अँटी-इन्फ्लेमेटरी) गुणधर्म एकूण आरोग्य सुधारण्यात आणि वजन व्यवस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

सेवन कसे करावे?

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते रिकाम्या पोटी चावून खाल्ले जाऊ शकतात. त्याव्यतिरिक्त ते मोड आलेल्या स्वरूपात किंवा चहाच्या रूपात घेता येतात. तसेच जेवणात मसाल्यासारखे वापरता येतात. तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार योग्य प्रमाण आणि वापराच्या पद्धतीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. आरोग्यासाठी दररोज ५ ते २० ग्रॅम मेथीचे दाणे खाणे पुरेसे असते. जर तुम्ही मधुमेहासाठी औषधे घेत असाल, तर तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवा; कारण त्यामुळे रक्तातील साखर खूप कमी होण्याची शक्यता असते.