Fenugreek Seeds Water Benefits: स्वयंपाकघरात मेथीचा वापर विविध प्रकारे केला जातो; पण तुम्हाला माहीत आहे का की मेथी किंवा अगदी मेथीचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते? याचे कारण म्हणजे त्यात तंतुमय पदार्थ, लोह, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने साधारण एका महिन्यात तुमच्या शरीरात विविध बदल घडून येऊ शकतात. त्याचे सेवन केल्याने लोकांना विविध फायदे मिळू शकतात. मात्र, जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असल्यास तुम्ही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आपण मेथीचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
मेथीचे पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या दूर होण्यास मदत होते?
मेथीचे पाणी पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. त्यात तंतुमय पदार्थ (फायबर) असतो, जो पचनसंस्था स्वच्छ करण्यास मदत करतो. त्यातील पोषक घटक पोटाच्या आतील अस्तरांना आराम देतात आणि आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास कमी करतात. त्यामुळे अपचन किंवा छातीत जळजळ होण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांना याचा फायदा होतो.
मेथीचे पाणी कसे तयार करावे?
एका ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. तुमची इच्छा असल्यास तुम्ही भिजवलेले मेथी दाणे चावूनही खाऊ शकता. लवकरात लवकर परिणाम दिसण्यासाठी तुम्ही साधारण महिनाभर हा क्रम पाळला पाहिजे.
मेथीचे पाणी पिण्याचे फायदे
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारा तंतुमय पदार्थ असतो, जो पचन सुधारण्यास मदत करू शकतो. दररोज मेथीचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
मेथीमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होऊ शकते आणि अति खाणे टाळण्यास मदत मिळते; मात्र केवळ मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकत नाही.
काही अभ्यासांनुसार, मेथीच्या बियांमधील घटक शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचा उपचार म्हणून वापर करू नये. काही संशोधनानुसार, मेथीचे सेवन केल्याने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ (हानिकारक कोलेस्ट्रॉल) कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, असे घडेलच याची खात्री देता येत नाही. कारण- याचे फायदे व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात.
