Fermented Garlic Health Benefits: ब्लड प्रेशर आणि रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका इतर लोकांपेक्षा ४ पट जास्त असतो. रक्तवाहिन्यांची समस्या असो वा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं असो, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसूण उत्तम पर्याय ठरू शकतो. लसूण हा स्वयंपाकघरातला असा मसाला आहे जो स्वयंपाकातच नाही तर अनेक आजारांवरील घरगुती उपाय आहे. आयुर्वेदात लसूण हा एक उत्तम औषध मानला जातो, मात्र त्याची तिखट चव सर्वांना आवडतेच असं नाही. त्याच्या चवीमुळे लोक तो कच्चा खाणे टाळतात, पण जेवणात त्याचा वापरही कमी करतात.
आयुर्वेद आणि युनानी औषध तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी लसूण खाण्याची सर्वोत्तम पद्धत सांगितली आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा नियंत्रणात राहील आणि ब्लड प्रेशर नॉर्मल राहील. लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ हृदयाचे आरोग्यही सुधारेल. डॉ. सलीम यांनी सांगितले की, आंबवलेला लसूण खाल्ल्यास त्याचे अधिक फायदे मिळू शकतात. आंबवल्यानंतर त्याची चव आणि वास दोन्ही सौम्य होतात, तर त्यातील काही जैव-सक्रिय घटक आणखी सक्रिय होऊ शकतात. तर मग जाणून घेऊया कच्चा लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत आणि आंबवलेला लसूण आजारांवर प्रभावीपणे कसा उपचार करतो…
कच्चा लसूण फायदेशीर, पण त्याचे सेवन कसे करायचे?
अनेक जण सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात, पण प्रत्येकाला त्याची तिखट चव आवडत नाही. काहींना तो खाल्ल्यानंतर तोंडात जळजळ, तीव्र वास, ढेकर, पित्त, पोटात जळजळ किंवा मळमळ यासारख्या समस्या जाणवू शकतात. यामुळे बरेच जण काही दिवसांनी त्याचे सेवन करणे थांबवतात. लसूण आरोग्यासाठी एक आवश्यक मसाला आहे. त्यात अनेक बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात. ते शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसंच ते खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त लसूण रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. लसूण फायदेशीर आहे, मात्र जर तो खाणे शक्यन नसेल तर तुम्ही तो आंबवून त्याचे सेवन करू शकता.
आंबवलेल्या लसणाचे फायदे
आंबवलेला लसूण म्हणजे जो काही आठवड्यांसाठी मिठाच्या पाण्यात साठवून ठेवला जातो. त्यामुळे नैसर्गिक आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रकियेदरम्यान लसणाची चव पूर्वीपेक्षा सौम्य आणि किंचित गोड होऊ शकते. त्याचा वासही कमी होतो आणि त्याचा पोत मऊ होतो. डॉ. सलीम यांनी स्पष्ट केले की, लसूण आंबवल्याने त्यातील काही जैव-सक्रिय संयुगांची क्रियाशीलता वाढू शकते, त्यामुळे शरीर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते.
अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले की, आंबवलेल्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट क्रियाशीलता वाढलेली असू शकते. तसंच आंबवलेला लसूण कच्च्या लसणापेक्षा तीन ते चार पट अधिक प्रभावी आहे किंवा तो रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करू शकतो.
घरी आंबवलेला लसूण कसा तयार करायचा?
आंबवलेला लसूण तयार करण्यासाठी सर्वात आधी १५ ते १६ लसणाच्या पाकळ्या सोलून स्वच्छ धुवा. त्या एका स्वच्छ काचेच्या बरणीत ठेवा. १ लिटर पाण्यात ४ मोठे चमचे मीठ पूर्णपणे विरघळवून खारवण्याचे ब्राइन तयार करा. बरणीत लसणाच्या सर्व पाकळ्या पूर्णपणे बुडतील इतके पाणी घाला. त्यानंतर त्यात सुमारे १ छोटा चमचा व्हिनेगर घाला आणि बरणीचे झाकण घट्ट बंद करा. बरणी सामान्य तापमान असलेल्या आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर असलेल्या ठिकाणी ठेवा. आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, बरणीत वायू तयार होतो, म्हणून दर २ ते ३ दिवसांनी तो वायू बाहेर जाण्यासाठी झाकण थोडे सैल करा. या प्रक्रियेदरम्यान लसूण तपकिरी किंवा जांभळा होऊ शकतो. हे सामान्य आहे. आंबवलेला लसूण तयार होण्यासाठी साधारणपणे ३० ते ४५ दिवस लागतात. काही लोक तर तो ६० ते ९० दिवसांपर्यंत आंबवतात. जास्त काळ आंबवल्याने चवीत बदल होऊ शकतो.
आंबवलेला लसूण कसा खावा?
जर तुम्ही पहिल्यांदाच आंबवलेला लसूण खात असाल, तर फक्त एका पाकळीने सुरूवात करा. प्रत्येक पाकळीवर शरीर कशी प्रतिक्रिया देते याचे निरीक्षण करा. जर तुमच्या शरीराला कोणतीही समस्या जाणवली नाही, तर तुम्ही पाकळ्यांची संख्या २ किंवा ३ पर्यंत वाढवू शकता. हे रिकाम्या पोटी घ्यावे की जेवणानंतर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोणती सावधगिरी बाळगावी?
जर तुम्ही वॉरफेरिन, एपिक्साबान, रिव्हॅरॉक्सबॅन, क्लोपिडोग्रेल यांसारखी रक्त पातळ करणारी औषदे किंवा अॅस्पिरिनचा हाय डोस घेत असाल, तर आंबवलेला लसूण किंवा इतर कोणताही पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसणामुळे रक्त पातळ होण्याचा परिणामदेखील होऊ शकतो, त्यामुळे काही लोकांमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांना लसणाची अॅलर्जी आहे किंवा ज्यांचे पोट संवेदनशील आहे, त्यांनी देखील लसूण खाताना सावधगिरी बाळगावी. लसूम सेवन केल्यानंतर तुम्हाला खाज सुटणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोटाच्या गंभीर समस्या जाणवल्यास त्याचे सेवन ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
