Festival Sweets Liver Health Risk : भारतात सण म्हणजे मिठाई आणि गोड-धोड पदार्थ. होळी असो वा दिवाळी, लोक आवडीने मिठाई खातात आणि एकमेकांच्या घरी भेट म्हणूनही देतात. ही मिठाई कित्येक आठवडे फ्रिजमध्ये ठेवून खाल्ली जाते. परंतु, डॉक्टर या साखरेला शरीरासाठी विषासमान मानतात. साखरेचे पेय, तळलेले पदार्थ आणि जड जेवण केवळ कॅलरीज वाढवत नाही, तर साखरेचे प्रमाण लिव्हरलाही नुकसान पोहोचवते. कधीतरी थोडेफार गोड खाल्ल्याने लिव्हरला हानी पोहोचण्याची शक्यता कमी असते, परंतु वारंवार जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लिव्हरमध्ये चरबी (फॅट) जमा होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
शारदा हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉ. भुमेश त्यागी यांच्या मते, जास्त गोड पचवण्यात लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते. फ्रक्टोज (Fructose), जे टेबल शुगर, गोड पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स किंवा गोड पेयांमध्ये आढळते, त्याचा बहुतांश भाग लिव्हरमध्ये जाऊन जमा होतो. जेव्हा तुम्ही सतत जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाता, तेव्हा लिव्हर अतिरिक्त कार्बोहायड्रेट्सच्या काही भागाचे चरबीमध्ये रूपांतर करते. दीर्घकाळात ही चरबी ‘मेटाबॉलिक डिस्फंक्शन-असोसिएटेड स्टेआटोटिक लिव्हर डिसीज’ (MASLD) चे कारण बनू शकते, ज्याला पूर्वी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) म्हणून ओळखले जात होते.
खूप जास्त गोड खाल्ल्यावर साखरेचा शरीरावर काय परिणाम होतो?
जेव्हा तुम्ही मिठाई खाता, तेव्हा कार्बोहायड्रेट्स साखरेत रूपांतरित होतात आणि रक्तात मिसळतात. ग्लुकोजचा वापर आपले शरीर ऊर्जेसाठी (Energy) त्वरित करते किंवा नंतरच्या वापरासाठी साठवून ठेवते. दुसरीकडे, फ्रक्टोज प्रामुख्याने आपल्या लिव्हरद्वारे मेटाबॉलाइज्ड केले जाते. सतत जास्त फ्रक्टोज आणि कॅलरीज घेतल्याने लिव्हरमध्ये ‘डी नोव्हो लिपोजेनेसिस’ नावाच्या प्रक्रियेद्वारे फॅटी ॲसिडचे उत्पादन वाढू शकते. या चरबीचा काही भाग लिव्हरच्या पेशींमध्ये जमा होऊ शकतो. एका दिवसात गोड खाल्ल्याने असे होत नाही, तर दीर्घकाळाची सवय नुकसान पोहोचवू शकते. यासह तुमचे वजन जास्त असेल, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा टाईप-२ मधुमेह असेल तर अशा लोकांसाठी धोका अधिक वाढू शकतो.
साखरेमुळे लिव्हरला सूज येते का?
लिव्हरमध्ये चरबी जमा होणे म्हणजे लिव्हरला सूज आली आहे किंवा ते खराब झाले आहे असे नाही. MASLD ही एक मोठी समस्या आहे, ज्यामध्ये काही लोकांमध्ये सूज किंवा जखम नसतानाही लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते. काही लोकांमध्ये हा चयापचय विकार वाढून ‘मेटाबॉलिक डिस्फंक्शन-असोसिएटेड स्टेआटोहेपेटायटिस’मध्ये बदलू शकतो; ज्यामध्ये लिव्हरमध्ये चरबी साचण्यासह सूज येते आणि लिव्हरच्या पेशींचे नुकसान होते. दीर्घकाळ असे घडल्याने फायब्रोसिस, सिरोसिस आणि काही प्रकरणांमध्ये लिव्हर कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
