Fever Symptoms: तमिळनाडूमधील अण्णा विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थ्याचा स्क्रब टायफसमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला त्याला आलेला ताप हा साधा व्हायरल किंवा हंगामी ताप असल्याचे वाटले. मात्र प्रकृती झपाट्याने खालावत गेल्यानंतर तपासणीत त्याला स्क्रब टायफस झाल्याचे स्पष्ट झाले.
आज तकच्या वृत्तानुसार, विद्यार्थ्याला सलग चार दिवसांपासून तीव्र ताप होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला डेंग्यूची चाचणी केली, मात्र ती निगेटिव्ह आली. पुढील तपासणीत स्क्रब टायफसचे निदान झाले. तोपर्यंत संसर्गामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला बोलण्यात अडचण, गोंधळलेली मानसिक अवस्था आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून आली. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अनेकजण तापाला साधा व्हायरल किंवा हवामान बदलामुळे झालेला ताप समजून घरच्या घरी औषधे घेत राहतात. मात्र ताप सतत कायम राहत असेल किंवा प्रकृतीत सुधारणा होत नसेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार न झाल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
स्क्रब टायफस म्हणजे काय?
स्क्रब टायफस हा जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. Orientia tsutsugamushi नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. संक्रमित चिगर माइट (अतिशय लहान कीटक) चावल्यामुळे हा संसर्ग होतो. हे कीटक प्रामुख्याने गवत, झुडपे आणि दाट वनस्पती असलेल्या भागात आढळतात.
स्क्रब टायफसची लक्षणे
- अचानक तीव्र ताप येणे
- डोकेदुखी
- अंगदुखी किंवा स्नायूंमध्ये वेदना
- अशक्तपणा जाणवणे
- त्वचेवर पुरळ येणे
काही रुग्णांमध्ये कीटक चावलेल्या जागी काळसर खपलीसारखा डागही दिसू शकतो. मात्र हे लक्षण प्रत्येकामध्ये आढळेलच असे नाही.
हा आजार कधी ठरतो धोकादायक?
वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास स्क्रब टायफस पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होऊ शकतो. गंभीर रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास, गोंधळलेली मानसिक अवस्था, रक्तदाब कमी होणे आणि अनेक अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.
डॉक्टरांचा सल्ला
ताप दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, औषधांनंतरही आराम मिळत नसेल किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास, जास्त गुंगी, गोंधळ, लघवी कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर विलंब न करता रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
