Fiber rich vegetables: आतड्यांचे आरोग्य हा आपल्या संपूर्ण आरोग्याचा पाया आहे. अपचनामुळे तुमच्या ऊर्जेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पारस हेल्थ पाटणा येथील इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. व्ही. के. ठाकूर, पचनाचे विकार टाळण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहारावर भर देण्याची शिफारस करतात. काही फायबरयुक्त भाज्या केवळ चयापचय क्रियाच वाढवत नाहीत, तर रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.

आपल्या धावपळीच्या जीवनात लोक अनेकदा आरोग्यदायी आहार घेत असल्याचा दावा करतात; पण त्यांच्या आहारात अनेकदा संतुलनाचा अभाव असतो. अयोग्य आहाराचे परिणाम बहुतेकदा पचनसंस्थेवर सर्वांत आधी दिसून येतात. तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि वारंवार भूक लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टर सांगतात की, आहारात थोडासा बदल केल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचनापासून आराम मिळू शकतो. तंतुमय पदार्थांनी (फायबरने) भरपूर भाज्या खाल्ल्याने केवळ पचनक्रियाच सुधारणार नाही, तर वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होईल.

आहारातील फायबर म्हणजे काय?

Award Banner

आहारातील फायबर हे वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये आढळणारे एक पोषक तत्त्व आहे, जे शरीर पूर्णपणे पचवू शकत नाही. तंतूंचे दोन प्रकार आहेत: विद्राव्य तंतू, जे पाण्यात विरघळतात. कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखणे हे त्याचे कार्य आहे. दुसरा प्रकार अविद्राव्य तंतू आहे, जो शौचास घट्टपणा आणून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

तुम्ही दररोज किती फायबरचे सेवन केले पाहिजे?

पुरुषांनी दररोज ३०-३८ ग्रॅम फायबरचे सेवन करावे.

महिलांनी दररोज २१-२५ ग्रॅम फायबरचे सेवन करावे.

फायबरच्या कमतरतेची लक्षणे

शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे पचनक्रिया बिघडू शकते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अचानक वजन वाढणे आणि वारंवार भूक लागणे ही फायबरच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

आहारात फायबर वाढवण्याचे सोपे मार्ग

शरीरातील फायबर वाढवण्यासाठी प्रत्येक जेवणात भाज्यांचा समावेश करा.

जेवणापूर्वी सॅलड खा.

प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा आणि भरपूर पाणी प्या.

कोणत्या भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते?

फायबरयुक्त भाज्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, पालक, गाजर, बीट, रताळे, वाटाणे, कोबी, फुलकोबी, भेंडी व भोपळा यांचा समावेश करू शकता. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर पालक, दुधी भोपळा, गाजर व घेवडा यांचा विचार करा. या भाज्या अत्यंत फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन केल्याने शौचास साफ होण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

वजन घटवण्यासाठी फायबरची कशी मदत होते?

फायबरयुक्त भाज्या खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अति खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. दररोज फायबरयुक्त भाज्यांचे सेवन केल्याने कॅलरीजच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असलेले पर्याय

कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असलेल्या भाज्यांमध्ये काकडी, झुकिनी, ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. फायबर शरीरातील साखरेचे शोषण मंदावते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहींनी कारले, घेवडा, गाजर व पालक यांसारख्या भाज्यांचे सेवन करावे.

महत्त्वाची खबरदारी

फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवा
भरपूर पाणी प्या