Anjeer benefits: अंजीर हे एक सुके फळ आहे, जे लोक अनेकदा सुक्या मेव्याच्या स्वरूपात खातात. अंजिरामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या पोषक तत्त्वांमुळेच त्याला पोषक तत्त्वांचा खजिना म्हटले जाते. आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र दोन्ही अंजीरला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. नवी दिल्ली येथील एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरमधील ऑन्कोलॉजी डाएटिशियन डॉ. मानसी यादव यांनी जनसत्ताला सांगितले की, अंजीर खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो, शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता भरून निघते आणि स्टॅमिना वाढतो. दुधासोबत सुका मेवा खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.

दुधात अंजीर उकडून किंवा रात्रभर भिजवून ठेवल्यास पचनक्रिया सुधारण्यास, हाडे मजबूत करण्यास, झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. तथापि, प्रश्न असा निर्माण होतो की, दुधासोबत अंजीर खाणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे का? चला, एका आहारतज्ज्ञाकडून दुधासोबत अंजीर खाण्याचे आरोग्यावरील परिणाम, ते खाण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, याबद्दल जाणून घेऊया.

अंजीरचे दूध म्हणजे काय?

अंजीरचे दूध म्हणजे दुधात अंजीर उकळून ते पिणे. अंजीर आणि दुधाचे सेवन करणे हा एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात; तर दूध हा प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. जेव्हा या दोन्हींचा आहारात एकत्र समावेश केला जातो, तेव्हा शरीराला दुहेरी फायदा मिळतो. दुधासोबत अंजीर खाणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा स्रोत आहे; तर अंजीरमध्ये फायबर आणि इतर पोषक तत्त्वे असतात. या दोन्हींना एकत्र करून एक पौष्टिक नाश्ता बनवता येतो. तथापि, मधुमेह असलेल्या किंवा वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी दूध आणि अंजीर या दोन्हींमधील एकूण उष्मांक आणि कर्बोदकांच्या प्रमाणाबद्दल जागरूक असले पाहिजे.

मधुमेहात अंजीर खाणे

मधुमेही व्यक्तीदेखील अंजीर खाऊ शकतात; परंतु त्याचे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे. सुक्या अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदके अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे. अंजीर ओट्स, लापशी किंवा इतर सुकामेव्यासोबत खाल्ल्यास हा नाश्ता पौष्टिकदृष्ट्या संतुलित होऊ शकतो.

हाडे आणि दात अधिक मजबूत होतात

अंजीर आणि दूध या दोन्हींमध्ये कॅल्शियम असते, जे मजबूत हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे. दुधातील कॅल्शियम आणि अंजीरमधील खनिजे संतुलित आहाराचा भाग असू शकतात.

बद्धकोष्ठता आणि पचनासाठी उपयुक्त

सुक्या अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे मल नरम करण्यास आणि नियमित मलत्यागास मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पुरेसे पाणी आणि संतुलित आहारासोबत अंजीर खाणे फायदेशीर ठरू शकते. काही लोकांना दुधामुळेदेखील पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून आपल्या वैद्यकीय स्थितीनुसार अंजीर दुधाचे सेवन करा.

शरीराला भरपूर ताकद मिळते

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदके असतात, तर दुधात प्रथिने, चरबी आणि कर्बोदके असतात. त्यामुळे अंजीरचे दूध एक पौष्टिक आणि ऊर्जा देणारा नाश्ता ठरू शकतो. त्याचे सेवन अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ज्यांना वजन वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, त्यांच्यासाठी याला वैद्यकीय समस्येवरील उपचार न मानता, संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पाहणे उत्तम ठरेल.

हृदयाच्या आरोग्यासाठी

अंजीरमध्ये पोटॅशियम आणि फायबरसारखी पोषक तत्त्वे असतात. फायबरयुक्त आहार हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. तथापि, अंजीरचे दूध थेट हृदयरोग बरा करते किंवा हृदयाच्या आरोग्याची हमी देते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

अंजीरचे दूध कसे बनवायचे?

त्यासाठी सुमारे दोन-तीन सुके अंजीर घेऊन, ते स्वच्छ धुवा. एका कपात दुधात अंजीर घालून मंद किंवा मध्यम आचेवर काही मिनिटे गरम करा. दूध थोडे थंड झाल्यावर कोमट असतानाच प्या. अधिक गोडवा येण्यासाठी मध मिसळण्याची गरज नाही, विशेषतः जर तुम्ही आधीच पुरेसे गोड पदार्थ खात असाल तर.

कोणी सावधगिरी बाळगावी?

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदके असतात. त्यामुळे मधुमेहींनी ते किती प्रमाणात खावे याबाबत काळजी घ्यावी. जास्त अंजीर खाल्ल्याने त्यातील फायबरमुळे गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांना दुधामुळे समस्या येऊ शकतात. जर तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या असेल किंवा विशेष आहाराची गरज असेल, तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.