नुकतीच दिवाळी होऊन गेली. या सणादरम्यान आपण बरेच असे पदार्थ खातो; ज्यामुळे आपले वजन वाढून शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते. दरम्यान, आपल्या दिनचर्येतदेखील थोडेफार बदल झाल्याने व्यायाम बंद होतो. अंगाची फारशी हालचाल होत नाही. म्हणून दिवाळीनंतर किंवा कोणत्याही कार्यक्रमानंतर सगळे जण पुन्हा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची तयारी सुरू करतात. तुमच्या सोबतदेखील असे काहीसे झाले असेल, तर आता पुन्हा आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी या पाच सोप्या आणि घरगुती टिप्स बघा. मात्र, आपले वजन पटापट कमी करण्यासाठी आणि अतिरिक्त चरबी शक्य तितक्या लवकर घटवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे घ्यावेच लागतील.
वजनावर नियंत्रण ठेवणारे, पोटावरील अतिरिक्त चरबी घटवणारी अनेक पेये आणि पदार्थ असतात. त्यातील घरी बनवता येणाऱ्या पाच सोप्या पेयांचे फायदे पाहा.
कॅलरीज जाळणारी पाच घरगुती पेये :
१. ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारून शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. त्यामध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे व्यक्तीची मरगळ जाऊन, त्याला तरतरी येण्यास मदत होते.
२. लिंबू पाणी
लिंबू पाण्यामुळे, शरीराला हायड्रेशन मिळते आणि व्यक्तीला ताजेतवाने वाटते. व्यक्तीने लिंबू पाण्याचे सेवन केल्याने त्याचे पोट भरलेले राहून इतर अनावश्यक पदार्थ, तेलकट किंवा गोड पदार्थ खाणे टाळले जाऊ शकते. लिंबू पाणी पिण्याने लघवीवाटेदेखील शरीरातील अनावश्यक घटकांचा निचरा होऊ शकतो.
हेही वाचा : तुम्हीही चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पित आहात? मग पाहा, हे गुळाच्या चहाचे पाच आरोग्यदायी फायदे…
३. आल्याचा चहा
आल्याचा चहा हा घसादुखीच्या त्रासावर उत्तम उपाय असून, या चहामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबीदेखील जाळण्यास मदत होऊ शकते. आल्याचा चहादेखील चयापचय क्रिया सुधारून, चरबी घटवण्यास मदत करू शकतो.
४. कोरफडीचा रस
कोरफडीचा रस हा मुळातच शरीरासाठी चांगला असून, अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करतो. त्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे कोरफडीचा रस तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो.
५. काकडीचे पाणी
काकडीच्या पाण्यात, साखर आणि कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असून, त्याच्या वापराने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. काकडीचे पाणी पिण्याने, लघवीवाटे शरीरातील अनावश्यक आणि घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते.
या पाच पेयांव्यतिरिक्त अजून बरेच उपाय तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करू शकता.
पौष्टिक आहार घेणे
आपल्या आहारात साखरेचे पदार्थ, प्रक्रिया केले पदार्थ घेणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी फळे, भाज्या आणि डाळींचा समावेश करावा.
दररोज व्यायाम करणे
व्यायाम हा आपल्या शररावरील चरबी आणि कॅलरी जाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम अवश्य करावा. त्यात तुम्ही सकाळी चालायला जाणे, योगासने करणे किंवा जिम लावूनदेखील शरीराला व्यायामाची सवय लावू शकता.
पुरेशी झोप घेणे
तुम्ही जर शरीराला आवश्यक तितकी झोप घेतली नाहीत, तर त्याचा परिणामदेखील वजनवाढीवर होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभराची कामे करताना शरीर आणि मेंदूवर ताण येतो. परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी सात ते आठ तासांची रात्रीची झोप घेणे आवश्यक असते.
ताणतणाव कमी करणे
शरीर व मनावर ताण आल्याने वजनात वाढ होऊ शकते. त्यामुळे मन शांत राहण्यासाठी व त्यावरील ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करू शकता.
हेही वाचा : दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त
मद्यपान करणे टाळावे
मद्यपान केल्याने शरीराचे वजन वाढते. त्यामुळे मद्यपानावर नियंत्रण ठेवावे अथवा ते पूर्णपणे टाळावे.
वाढलेले वजन आणि पोटावरील चरबी केवळ निरोगी पद्धतीने कमी केली जाऊ शकते. त्यामुळे वजनाबाबत ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आपले आरोग्य, व्यायाम व आहाराकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. आपल्या जीवनशैलीत जर योग्य व आवश्यक तो बदल आणि पोषक आहार व व्यायाम केल्यास तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवू शकता.
[टीप : वरील लेख हा मिळवलेल्या माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]