5 Lentils That May Increase Uric Acid Levels: आपण रोज खाणाऱ्या डाळी शरीरासाठी किती पौष्टिक असतात हे सर्वांनाच माहीत आहे. प्रथिनं, तंतू, जीवनसत्त्वं व खनिजं यांनी भरपूर समृद्ध असलेल्या अशा या डाळी आरोग्यासाठी अमृतासारख्या वाटतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का की काही डाळी शरीरात ‘युरिक ॲसिड’चं प्रमाण झपाट्यानं वाढवतात आणि हेच पुढे सांध्यांच्या वेदना, सूज आणि युरिक ॲसिडमुळे होणारा संधिवात (गाऊट) यांसारख्या गंभीर समस्यांचं कारण ठरू शकतं. चला तर मग जाणून घेऊया, त्या कोणत्या डाळी आहेत, ज्या युरिक ॲसिड वाढवतात आणि त्यामागचं खरं कारण काय आहे ते आपण पाहूया.

युरिक ॲसिड म्हणजे नेमकं काय?

युरिक ॲसिड हे आपल्या शरीरात तयार होणारं नैसर्गिक रासायनिक द्रव्य आहे. आपण जेव्हा ‘प्युरिन’ नावाचं द्रव्य असलेले अन्नपदार्थ खातो (उदा. काही डाळी, मासे, मांस, इ.), तेव्हा शरीर त्याचं विघटन करताना युरिक ॲसिड निर्माण होतं. सामान्य स्थितीत हे ॲसिड आपल्या मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकलं जातं. पण, जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा हे सांध्यांत साचून क्रिस्टल्स तयार करतं, ज्यामुळे हात-पाय सुजणे, वेदना होणे व चालताना त्रास होणे अशी लक्षणं दिसू लागतात.

‘या’ डाळींमुळे वाढतंय युरिक ॲसिड

१. मसूर डाळ

आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी मसूर डाळ, युरिक ॲसिड रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यात ‘प्युरिन’चं प्रमाण खूप जास्त असतं, जे शरीरात ॲसिडची पातळी झपाट्याने वाढवते. ज्यांना सांध्यात दुखणं, कडकपणा किंवा सूज येते त्यांनी मसूर डाळ खाणं टाळावं.

२. राजमा

राजमा म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत. पण, युरिक ॲसिड वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये याचा उल्लेख कायम केला जातो. राजमामधील उच्च प्युरिन प्रमाणामुळे शरीरात ॲसिड तयार होतं आणि त्यातून सांध्यात तीव्र वेदना निर्माण होतात, म्हणूनच युरिक ॲसिड जास्त असणाऱ्या लोकांनी राजमा फारच कमी प्रमाणात घ्यावा.

३. चणाडाळ

चणाडाळ ही साधारणपणे बहुतेक घरांमध्ये दररोज वापरली जाते; पण ज्यांच्या शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांच्यासाठी ही डाळ विषासारखी ठरू शकते. त्यात असलेला प्युरिन हा घटक सांधेदुखीचा त्रास वाढवतात, सांध्यामध्ये सूज निर्माण करतो आणि हालचाल कठीण करतात, त्यामुळे चणाडाळ टाळणंच योग्य.

४. हरभरे (छोले)

हरभरे किंवा छोलेही युरिक ॲसिड वाढवणाऱ्या डाळींमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यात असलेला प्युरिन हा घटक शरीरात सूज, दाह व वेदना वाढवतात. याच्या नियमित सेवनामुळे लिव्हर आणि किडनीवरही ताण येऊ शकतो, त्यामुळे युरिक ॲसिड जास्त असलेल्या रुग्णांनी हरभरे शक्य तितक्या कमी प्रमाणात खावे.

५. उडीद डाळ

उडीद डाळ विशेषतः काळी असलेली, शरीरातील ॲसिडची पातळी दुप्पट वेगाने वाढवते. ही डाळ प्रथिनांनी समृद्ध असली तरी युरिक ॲसिड असणाऱ्यांसाठी ती घातक परिणाम करणारी ठरू शकते. सांध्यांच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी उडीद डाळीपासून दूर राहणं उत्तम.

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला

युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, हलका व्यायाम करा आणि आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी प्युरिन असलेले पदार्थ समाविष्ट करा. डाळींचं सेवन करताना विविधता ठेवा आणि प्रमाण नेहमी मर्यादित ठेवा.

लक्षात ठेवा : सर्व डाळी आरोग्यासाठी चांगल्या असतात; पण प्रत्येकासाठी नाहीत. तुमच्या शरीरात युरिक ॲसिड जास्त असेल तर ‘या’ पाच डाळी टाळणंच शहाणपणाचं ठरेल. कारण- थोडासा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या वेदनांचं कारण बनू शकतो.