Flaxseed Benefits: जवस (Flaxseed) हे पोषक तत्त्वांनी समृद्ध अशा बिया असून, संतुलित आहाराचा उत्तम भाग मानले जाते. अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने, लिग्नॅन्स आणि मॅग्नेशियमसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे आढळतात. नियमित आणि मर्यादित प्रमाणात अळशीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटण्यासही ती उपयुक्त ठरू शकते. अळशीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. अळशी भाजून, पूड करून किंवा दही, ओट्स, सॅलेड आणि स्मूदीमध्ये मिसळून खाता येते.
जवस खाण्याचे फायदे
वजन कमी करणे
काही अभ्यासांनुसार, जवसाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. जवसामध्ये विद्राव्य फायबर असते, जे जास्त खाण्याची इच्छा कमी करते; यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरलेले राहते. त्यामुळे लोक जास्त खाणे टाळतात, काही अभ्यासांनुसार, जवसाचे सेवन करणारे लोक सहजपणे शरीराचे वजन आणि पोटावरील चरबी कमी करू शकतात.
जवस खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात
साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात जवसातील फायबर महत्त्वाची भूमिका बजावते. फायबरमुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे शोषण सोपे होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जवसाऐवजी जवसाचे तेल वापरल्याने हे फायदे मिळणार नाहीत, कारण त्यात फायबरचा अभाव असतो.
रक्तदाब कमी करणे
काही अभ्यासांनुसार जवसाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दररोज ४ चमचे जवसाचे सेवन केल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे पक्षाघात आणि हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो.
कर्करोगामध्ये फायदेशीर
काही अभ्यासांनुसार, मोनोपॉजनंतर जवसाचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त प्राण्यांवरील अभ्यासात असे आढळून आले आहे की, जवसाच्या सेवनाने मोठ्या आतड्याचा, त्वचेचा, रक्ताचा आणि फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
‘या’ पद्धतीने करा सेवन
जवस (अळशी) अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येते. जवस हलके भाजून त्याची पूड करून खाल्ल्यास शरीराला त्यातील पोषक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. ही पूड दही, ओट्स, पोहे, उपमा, सॅलेड, डाळ, भाजी किंवा सूपमध्ये मिसळून खाता येते. तसेच स्मूदी, ताक किंवा लस्सीमध्येही जवसाची पूड घालू शकता. काही जण जवसाची चटणी किंवा मुखवास म्हणूनही सेवन करतात. साधारणपणे दररोज १ ते २ टेबलस्पून (सुमारे १०–२० ग्रॅम) जवस पुरेसे मानले जाते. जवस खाताना पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
