Avoid These Foods in Summer : उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजचा वापर लक्षणीयरीत्या वाढतो. या हंगामात अन्न, भाज्या, फळे आणि इतर अनेक वस्तू बाहेर ठेवल्यास लवकर खराब होतात, त्यामुळे लोक त्या टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजचा जास्तीत जास्त वापर करतात. पण, कधीकधी आपण नकळतपणे अशा काही वस्तू फ्रिजमध्ये ठेवतो, ज्या थंड तापमानात ठेवण्यासाठी योग्य नसतात. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि पोषणमूल्ये कमी होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये त्यात हानिकारक घटक देखील तयार होऊ शकतात. यामुळे पोटाचे विकार आणि इतर आरोग्य धोके वाढू शकतात.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत?

ब्रेड

बहुतेक घरांमध्ये ब्रेड फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण, फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे तो लवकर कोरडा आणि त्याचा मऊ पोत कडक होतो. थंड तापमानामुळे ब्रेडमधील स्टार्चचे वेगाने स्फटिकीकरण होते, ज्यामुळे त्याची चव बिघडू शकते आणि बुरशी लागण्याचा धोकाही वाढू शकतो. ब्रेड हवाबंद डब्यात किंवा ब्रेड बॉक्समध्ये खोलीच्या तापमानावर ठेवणे उत्तम ठरते.

टोमॅटो

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची नैसर्गिक चव आणि सुगंध कमी होऊ शकतो. थंड तापमानामुळे टोमॅटो मऊ आणि दाणेदार होऊ शकतात, ज्यामुळे ते कमी ताजे राहतात. कमी तापमानामुळे टोमॅटोमधील एन्झाइम्सवर परिणाम होतो, ज्यामुळे ते पिकण्यास अडथळा येतो आणि त्यांची गुणवत्ता कमी होते. म्हणून, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी खोलीच्या तापमानात ठेवणे उत्तम राहणार आहे.

Award Banner

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवू नयेत. यामुळे त्यांची साल लवकर काळी पडते. थंड तापमानामुळे केळ्यांच्या पिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि आतील भाग मऊ व ओलसर होऊ शकतो. याचा परिणाम चव आणि गुणवत्ता या दोन्हींवर होतो. म्हणून, ती फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी खोलीच्या तापमानावर साठवावी.

मध

खराब होऊ नये आणि त्याचा साठवण्याचा कालावधी वाढवण्यासाठी अनेक मंडळी मध फ्रिजमध्ये ठेवतात. मध फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचे स्फटिकीकरण होऊन तो घट्ट होऊ शकतो, ज्यामुळे त्याचा पोत दाणेदार होतो. मध खोलीच्या तापमानावर थंड, कोरड्या जागी साठवावा.

कॉफी

कॉफी पावडर एअरटाइट डब्यात आणि कोरड्या ठिकाणी ठेवणे उत्तम राहील. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात ओलावा येतो आणि त्यामुळे त्यात गुठळ्या होऊ शकतात. कमी तापमानामुळे कॉफी इतर पदार्थांचा वास पटकन शोषून घेऊ शकते, ज्यामुळे तिची मूळ चव आणि सुगंध कमी होऊ शकतो. जास्त आर्द्रतेमुळे बुरशी लागण्याचा धोकाही वाढतो.

तुळशीची पाने

तुळशीची पाने जास्त काळ टिकावीत म्हणून लोक अनेकदा ती फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, यामुळे पाने कोमेजतात आणि त्यांचा नैसर्गिक सुगंध नाहीसा होतो. म्हणून, तुळशीची पाने फक्त गरजेनुसारच झाडावरून तोडावीत.

लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे त्याला लवकर कोंब फुटू शकतात. जास्त आर्द्रतेमुळे लसणाच्या पाकळ्या मऊ होऊ शकतात आणि बुरशी लागण्याचा धोका वाढतो. म्हणून, लसूण खोलीच्या तापमानात साठवणे उत्तम.