Are packaged food labels misleading? मार्केटमध्ये आज असंख्य प्रकारचे पॅकेज्ड फूड उपलब्ध आहेत. बिस्किटं, ब्रेड, सीरिल, स्नॅक्स, प्रोटीन बार, दही, ज्यूस अशा अनेक पदार्थांवर ‘Natural’, ‘Multigrain’, ‘No Added Sugar’, ‘Sugar-Free’, ‘High Protein’ असे शब्द ठळकपणे लिहिलेले असतात. हे शब्द पाहून अनेकांना एखादा पदार्थ आरोग्यासाठी चांगला असल्याचं वाटतं. मात्र, पॅकेटच्या पुढील बाजूवर लिहिलेला दावा आणि त्या पदार्थाची संपूर्ण पोषणमूल्य माहिती यात फरक असू शकतो. म्हणूनच फूड लेबल वाचताना केवळ ‘हेल्दी’ वाटणारे शब्द पाहू नका. त्यांचा नेमका अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे.
‘Natural’ म्हणजे नेमकं हेल्दी का?
फूड पॅकेटवर ‘Natural’ लिहिलं आहे म्हणून तो पदार्थ कमी साखर, कमी कॅलरी किंवा अधिक पौष्टिक असेलच असं नाही. एखाद्या पदार्थात नैसर्गिक स्रोतांमधून आलेले घटक असू शकतात, पण त्यात साखर, फॅट किंवा कॅलरीचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे ‘Natural’ हा शब्द पाहून निर्णय घेण्याऐवजी पॅकेटच्या मागील बाजूला दिलेली Nutrition Information नक्की तपासा.
‘Multigrain’ म्हणजे ‘Whole Grain’ नाही
‘Multigrain’ म्हणजे एका पदार्थात एकापेक्षा जास्त प्रकारचे धान्य वापरलेले आहेत. मात्र, त्यातील सर्व धान्यं हे पूर्ण असतीलच असं नाही. काही मल्टीग्रेन ब्रेड, क्रॅकर किंवा सीरियलमध्ये पूर्ण धान्यासोबत रिफाइंड धान्यांचाही वापर केलेला असू शकतो. तुम्हाला खरंच पूर्ण धान्याचा पदार्थ हवा असेल, तर Ingredients List मध्ये ‘Whole Wheat’ किंवा ‘Whole Grain’ कुठे दिलं आहे ते पाहा. यादीतील घटक कोणत्या क्रमाने दिले आहेत, हेही महत्त्वाचं आहे.
‘No Added Sugar’ म्हणजे साखर अजिबात नाही?
हा शब्द अनेकदा ग्राहकांचा गैरसमज करून देऊ शकतो. ‘No Added Sugar’ म्हणजे पदार्थ बनवताना स्वतंत्रपणे साखर घातलेली नाही. पण याचा अर्थ त्या पदार्थात साखरच नाही असा होत नाही. उदाहरणार्थ, फळांपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर असू शकते. त्यामुळे Total Sugar किती आहे, हे Nutrition Panel मध्ये पाहणं गरजेचं आहे.
‘Sugar-Free’ म्हणजे कमी कॅलरी? अजिबात नाही
‘Sugar-Free’ आणि ‘Low-Calorie’ हे समान अर्थाचे शब्द नाहीत. साखरेऐवजी काही पदार्थांमध्ये नॉन-शुगर स्वीटनर किंवा इतर ऊर्जा देणारे घटक वापरले जाऊ शकतात. इतकंच नाही, तर काही शुगर-फ्री बिस्किटं, चॉकलेट्स किंवा डेझर्टमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे वजन किंवा कॅलरीकडे लक्ष असेल, तर Energy/Calories सोबत Fat आणि इतर पोषक घटकही तपासा.
‘High Protein’ पाहून लगेच खरेदी करू नका
आजकाल पॅकेज्ड फूडमध्ये ‘High Protein’ हा दावा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सीरियल, बिस्किटं, स्नॅक बारपासून दही आणि इतर पदार्थांपर्यंत हा शब्द वापरला जातो. मात्र, जास्त प्रोटीन असणं म्हणजे तो पदार्थ पूर्णपणे संतुलित आहे असं नाही. एखाद्या प्रोटीनयुक्त स्नॅकमध्ये सॅच्युरेटेड फॅट, साखर किंवा सोडियम मोठ्या प्रमाणात असू शकतं. म्हणून फक्त ‘High Protein’ पाहू नका. एका सर्व्हिंगमध्ये किती प्रोटीन आहे आणि सर्व्हिंग साइज किती आहे, हे दोन्ही तपासा.
‘Zero Cholesterol’ म्हणजे पूर्णपणे हेल्दी?
प्लांट-बेस्ड पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉल नसणं शक्य आहे. पण ‘Zero Cholesterol’ म्हणजे त्यात कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट किंवा सोडियम कमी आहेच असं नाही. त्यामुळे केवळ कोलेस्ट्रॉलचा आकडा पाहून पदार्थ हेल्दी आहे असा निष्कर्ष काढू नका.
‘Low Fat’ किंवा ‘Fat-Free’ असलं तरी लक्ष द्या
एखाद्या पदार्थातील फॅट कमी केल्यानंतर चव आणि टेक्सचर टिकवण्यासाठी इतर घटकांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे फक्त ‘कमी फॅट’ पाहणं पुरेसं नाही. त्याऐवजी सॅच्युरेटेड फॅट, साखर, सोडियम, प्रोटीन आणि फायबर यांचं प्रमाण एकत्र पाहा.
‘No Preservatives’ म्हणजे जास्त पौष्टिक?
‘No Preservatives’ असा दावा असलेला पदार्थ आपोआप अधिक पौष्टिक असेलच असं नाही. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी फक्त प्रिझर्वेटिव्हच नाही, तर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि रेफ्रिजरेशन यांसारख्या पद्धतींचाही वापर केला जाऊ शकतो.
मग फूड लेबल वाचताना नेमकं काय पाहायचं?
पॅकेटचा पुढील भाग प्रामुख्याने ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी डिझाइन केलेला असतो. त्यामुळे केवळ मोठ्या अक्षरात लिहिलेले ‘Natural’, ‘Sugar-Free’ किंवा ‘High Protein’ असे दावे पाहण्याऐवजी पॅकेट उलटून Nutrition Facts आणि Ingredients List तपासा.
खरेदी करण्यापूर्वी हे मुद्दे नक्की पाहा:
- Serving Size
- Calories/Energy
- Total Sugar
- Saturated Fat
- Sodium
- Protein
- Dietary Fibre
- Ingredients List
पॅकेटवर काय लिहिलं आहे यापेक्षा त्यात प्रत्यक्षात काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लेबल वाचण्याची सवय लावल्यास केवळ आकर्षक दावे पाहून पदार्थ निवडण्याऐवजी अधिक माहितीपूर्ण निवड करता येऊ शकते.
