Sexual Health Tips: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव, सतत बसून राहण्याची सवय आणि चुकीच्या आहाराचा परिणाम केवळ फिटनेसवरच नाही, तर लैंगिक आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश केल्याने लैंगिक आरोग्याला फायदा होऊ शकतो का, याची चर्चा कायम होत असते. फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. वरुण शाह यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये बीटरूट, कलिंगड, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये-बिया आणि डाळिंब यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला. हे पदार्थ लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, त्यामुळे त्यांना ‘नैसर्गिक व्हायग्रा’ असे संबोधले जाते.

पण हे पदार्थ खरंच व्हायग्रासारखे काम करतात का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बीटरूट, कलिंगड आणि डाळिंबाचा आहारात समावेश का?

बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात. शरीरात त्यांचे रूपांतर नायट्रिक ऑक्साइडमध्ये होऊ शकते, याचा संबंध रक्तवाहिन्यांच्या कार्याशी आहे. चांगले रक्ताभिसरण हे संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असून त्यात विविध पोषक घटक आढळतात. तर डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे या फळांचा संतुलित आहारातील समावेश एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

हिरव्या पालेभाज्या ठरू शकतात फायदेशीर

डाएटिशियन जिनल पटेल यांच्या मते, पालक, मेथी आणि तांदुळजा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन E, लोह, झिंक, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक मिळतात. या भाज्या नियमित आहाराचा भाग केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्यांचा थेट लैंगिक क्षमता वाढवणारा किंवा इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार करणारा परिणाम सिद्ध झालेला नाही.

बदाम, अक्रोड आणि बिया का खाव्यात?

नट्स आणि सीड्समध्ये प्रथिने, फायदेशीर फॅट्स आणि इतर पोषक घटक असतात. बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रण आणि संतुलित आहारासाठीही हे पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.

मग हे पदार्थ ‘नैसर्गिक व्हायग्रा’ आहेत का?

याचं उत्तर थोडं वेगळं आहे. डाएटिशियन जिनल पटेल यांनी स्पष्ट केलं की, या पदार्थांना ‘नैसर्गिक व्हायग्रा’ म्हणण्याइतका ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. बीटरूट, पालेभाज्या, फळं, नट्स आणि बिया हे आरोग्यदायी आहाराचा भाग असू शकतात; मात्र त्यांचा व्हायग्रासारखा थेट परिणाम होतो, असं म्हणता येत नाही.

लैंगिक आरोग्यासाठी फक्त ‘हॅक्स’वर अवलंबून राहू नका

लैंगिक क्षमतेशी संबंधित समस्या वारंवार जाणवत असतील, तर केवळ एखादं फळ किंवा पदार्थ खाऊन समस्या दूर होईल, असा समज करून घेऊ नका. इरेक्टाइल डिसफंक्शनमागे रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, लठ्ठपणा, तणाव, जीवनशैली किंवा इतर कारणे असू शकतात. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण या सवयी महत्त्वाच्या आहेत. समस्या कायम राहिल्यास डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. थोडक्यात काय तर बीटरूट, कलिंगड, डाळिंब, हिरव्या पालेभाज्या, नट्स आणि बिया आहारासाठी नक्कीच पौष्टिक पर्याय आहेत; पण त्यांना ‘नैसर्गिक व्हायग्रा’ समजून लैंगिक समस्यांवर उपचार म्हणून वापरणे योग्य नाही.