Which food not to eat at night : फक्त तुम्ही काय खाता हेच नाही, तर ते कोणत्या वेळी खाता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही पदार्थ खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगले असतात; पण ते रात्री खाल्ल्यास पचायला जड जाऊ शकतात. कारण- रात्री आपल्या शरीराची पचनक्रिया थोडी मंद होते. त्यामुळे आहारतज्ज्ञ साक्षी लालवानी अशा पाच आरोग्यदायी पदार्थांबद्दल माहिती देतात, जे रात्रीच्या जेवणात खाणे टाळले पाहिजे.

रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाल्ल्यास पचन, पोट फुगणे (bloating), झोपेची गुणवत्ता यांवर कसा परिणाम होऊ शकतो. संध्याकाळी पचनक्रिया नैसर्गिकरीत्या मंदावते आणि काही विशिष्ट पदार्थ रात्री खाल्ल्याने पोट फुगणे, अस्वस्थता किंवा झोपेत व्यत्यय येण्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा सूर्यास्तानंतर कोणते पाच पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि त्यामागची कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात…

१. पालक

पालक पोषक तत्त्वांनी भरपूर असला तरीही त्यातील फायबर आणि लोह (iron) पचवणे रात्रीच्या वेळी शरीरासाठी कठीण जाऊ शकते. कारण- तेव्हा पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे काही लोकांना झोपण्यापूर्वी पोट जड वाटणे किंवा अस्वस्थता जाणवणे यासारखा त्रास होऊ शकतो.

२. फळे आणि फळांचे रस

फळे आरोग्यदायी असतात. पण, रात्रीच्या जेवणात त्यांचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण – दिवसाच्या उत्तरार्धात त्यातील नैसर्गिक साखर पचवणे कठीण होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

३. काकडी आणि बीट

आहारतज्ज्ञांच्या मते, कच्ची काकडी आणि बीट हे ‘थंडावा देणारे’ (cooling) पदार्थ मानले जातात. त्या म्हणतात की, हे पदार्थ शरीरातील उष्णता निर्मितीची प्रक्रिया (thermogenesis) कमी करू शकतात आणि संध्याकाळच्या वेळी पोषक तत्वांचे योग्य पचन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पचनक्रियेला कमकुवत करू शकतात.

४. मोड आलेली कडधान्ये (Sprouts)

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर व पोषक तत्वे भरपूर असतात. पण, रात्रीच्या वेळेत खाल्ल्यास पचनासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे, पचनाशी संबंधित अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते.

५. दही

दही हा आहारामधील एक मुख्य घटक आहे. तो रात्रीच्या वेळेस खाल्ल्यास दह्याचा ‘थंडावा देणारा’ गुणधर्म शरीरात कफ (mucus) वाढवू शकतो आणि दही पचायला जड असल्याने रात्रीच्या वेळी त्याचे पचन व्हायला वेळ लागतो.

वेळही महत्त्वाची

आहारतज्ज्ञांच्या मते, एखादा पदार्थ कितीही पौष्टिक किंवा ‘सुपरफूड’ असला तरी तो दिवसभरात कधीही खाणे योग्य नसते. पचन उत्तम रीतीने होणे, शरीराला आराम मिळणे आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणाची योग्य ती वेळ पाळली जाणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही काय खाता याप्रमाणेच ते कोणत्या वेळी खाता हे पाहणेही आत्यंतिक गरजेचे आहे…