foods to avoid eating with curd​ : भारतीय आहारात दह्याला एक विशेष स्थान आहे. प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले दही पचनासाठी वरदान मानले जाते. पण, आयुर्वेदानुसार त्याचे सेवन करण्यासाठी काही कठोर नियम आहेत. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पदार्थांबरोबर दह्याचे सेवन केल्यास शरीरातील ‘कफ’ आणि ‘पित्त’ दोष वाढू शकतात, ज्यामुळे त्वचेचे आजार, सायनसच्या समस्या आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर विनोद कुमार शर्मा यांच्या मते, दह्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य पदार्थांबरोबर दह्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो. अन्यथा त्याचे शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. चला, तर दही खाताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि खाण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दल जाणून घेऊयात…

दही

दही जड आणि उष्ण मानले जाते. गरम केल्यावर त्याचे गुणधर्म असंतुलित होतात आणि शरीरावर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गरम दही जड असल्यामुळे पचायला जड जातात. यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि शरीरातील विषारी घटक वाढू शकतात. दही कफ वाढवणारा पदार्थ मानला जातो. गरम केल्याने आणखी कफ तयार होऊ शकतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, ॲलर्जीचा त्रास वाढू शकतो. यामुळे रक्तातील अशुद्धता वाढू शकते. मुरुमे, पुरळ आणि खाज येणे यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. गरम दह्यामुळे ॲसिडिटी आणि पोटातील जळजळ वाढू शकते, ज्यामुळे ज्यांना आधीच पोटाचे विकार आहेत त्यांच्यासाठी हे विषारी ठरू शकते.

Award Banner

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दह्यासोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जात नाही. हा एक विरुद्ध आहार मानला जातो. दूध आणि दही दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. पण, त्यांचे गुणधर्म भिन्न आहेत. त्यांचे एकत्र सेवन केल्याने पचनसंस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दही आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने अपचन होऊन शरीरात विषारी द्रव्ये जमा होऊ शकतात. दूध आणि दही दोन्ही कफ (श्लेष्म) वाढवतात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने कफ दोषाचे असंतुलन होऊ शकते. या मिश्रणामुळे आतड्यांमध्ये आंबवण्याची प्रक्रिया वाढू शकते, ज्यामुळे पोट फुगते आणि जडपणा जाणवतो.

कांदा

आयुर्वेदानुसार दही आणि कांदा एकत्र खाणे विरुद्ध आहार मानले जाते. दहीची तासीर थंड आणि जड असते, तर कांदा गरम प्रकृतीचा असतो. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ले तर शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) बिघडू शकतात. यामुळे पचनाच्या समस्या, गॅस, ॲलर्जी, त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते. म्हणून, दही आणि कांदा वेगवेगळ्या वेळी खाणे उत्तम आहे.

उडीद डाळ

आयुर्वेदानुसार, दही आणि उडीद डाळ एकत्र खाऊ नये. दही जड असते त्यामुळे कफ वाढवते, तर उडीद डाळ देखील जड असल्यामुळे पचायला कठीण जाते. हे एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि जडपणा जाणवतो. दीर्घकाळ असे केल्याने शरीरात विषारी द्रव्ये जमा होण्याचा धोकाही वाढतो.

मासे

आयुर्वेदानुसार, दही आणि मासे एकत्र खाणे विरुद्ध अन्न मानले जाते. दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि त्यामुळे कफ वाढतो, तर मासे उष्ण मानले जातात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरातील दोषांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे पचनाच्या समस्या, ॲलर्जी आणि त्वचेचे विकार जसे की डाग, खाज आणि कोड यांचा धोका वाढू शकतो, म्हणून ते वेगवेगळे खाणे उत्तम राहील.

लिंबू आणि टोमॅटो

आयुर्वेदानुसार, दह्यासोबत लिंबू आणि टोमॅटोचे सेवन करू नये. दही जड आणि लिंबू, टोमॅटो आंबट व आम्लधर्मी असतात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊन गॅस, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. या पदार्थांच्या मिश्रणामुळे शरीरातील विषारी घटक वाढून त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मग दही खाण्याची योग्य पद्धत कोणती?

आयुर्वेदानुसार, दह्याचे योग्य प्रकारे सेवन केल्यास दही शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. दिवसा दही खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते, पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे रात्री दही खाणे टाळा. ज्यामुळे कफ वाढतो. दह्यामध्ये काळी मिरी, मध किंवा गूळ मिसळून खाणे फायदेशीर ठरू शकते. नेहमी ताजे दही खाण्यावर भर ठेवा.