Homemade Liquid Fertilizer for Rose, Jasmine and Hibiscus Plants: जास्वंदाचे रोप अनेकांच्या अंगणात, गच्चीवर किंवा बाल्कनीत आवर्जून दिसते. मोठी, आकर्षक आणि लालभडक फुले देणारे हे झाड सौंदर्य वाढवण्याबरोबरच धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. मात्र, अनेकदा झाड हिरवेगार दिसते, पानेही चांगली असतात; पण फुलांची संख्या फारच कमी असते. अशा वेळी अनेक जण बाजारातील महागडी रासायनिक खते वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तूंमधून तयार होणारा एक साधा द्रव पदार्थ जास्वंदाच्या रोपाला भरघोस फुलांनी बहरवू शकतो?
बागकाम तज्ज्ञ कविता जोशी यांनी यासाठी एक अतिशय सोपा आणि खर्चविरहित उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे हा द्रव पदार्थ तयार करण्यासाठी घरातील स्वयंपाकघरातून निघणारा भाजीपाला आणि फळांच्या साली पुरेसे आहेत. त्यामुळे घरातील कचऱ्याचाच उपयोग करून तुम्ही झाडांसाठी पोषणयुक्त सेंद्रिय खत तयार करू शकता.
कोणता द्रव पदार्थ तयार करायचा?
हा द्रव पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याची साले, कांद्याची साले, लसणाची साले, तसेच न शिजवलेल्या भाज्या आणि फळांची साले वापरायची आहेत. बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. हे घटक जास्वंदीला अधिक फुलोरा आणण्यास मदत करतात. कांद्याच्या सालींमध्ये सल्फर, पोटॅशियम आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.
लसणाच्या सालींमध्ये नैसर्गिक जंतुरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे झाडांवर होणारे काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. या द्रवासाठी कोणतेही महागडे साहित्य विकत घेण्याची गरज नसून, फक्त साली जमा करत राहायची आहेत.
द्रव खत तयार करण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम जमा केलेली साले एका बादलीत किंवा मोठ्या भांड्यात टाका. त्यात पुरेसे स्वच्छ पाणी घाला. त्यानंतर भांडे झाकून सावलीच्या ठिकाणी तीन दिवस ठेवून द्या.
या तीन दिवसांत सालींमधील पोषक घटक हळूहळू पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाण्याचा रंग थोडासा बदलतो आणि ते पोषणयुक्त द्रव खत तयार होते. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते साली मिक्सरमध्ये बारीक करूनही पाण्यात मिसळू शकतात. मात्र, तीन दिवस भिजवून ठेवलेल्या द्रवामध्ये पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे उतरतात.
वापरण्यापूर्वी हे करा
तयार झालेला द्रव थेट झाडांसाठी वापरू नका. प्रथम तो जाळी किंवा स्वच्छ कापडाच्या साह्याने गाळून घ्या. त्यानंतर या द्रवाचा एक भाग घेऊन त्यात दोन ते तीन भाग साधे पाणी मिसळा. त्यामुळे खत योग्य प्रमाणात पातळ होईल आणि झाडांच्या मुळांना त्रास होणार नाही.
झाडांना खत कसे द्यायचे?
तयार केलेले पातळ द्रवरूपातील खत थेट झाडाच्या मातीमध्ये घालावे. अगदी पाणी घालताना जसे प्रमाण ठेवता तसेच प्रमाण ठेवणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात खत घालू नये.
हे द्रव केवळ जास्वंदाच्या रोपासाठीच नव्हे, तर गुलाब, मोगरा, फळझाडे आणि अनेक भाजीपाल्याच्या रोपांसाठीही उपयुक्त ठरते. पोटॅशियमयुक्त द्रवामुळे फुलांची संख्या वाढण्यास मदत होते आणि फुले अधिक टवटवीत व आकर्षक दिसू लागतात.
जास्वंदाच्या रोपाला भरपूर फुले यावीत यासाठी आणखी काही महत्त्वाच्या टिप्स…
- जास्वंदाच्या झाडाला दररोज किमान पाच ते सहा तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. पुरेसा प्रकाश मिळाल्यास झाड अधिक जोमाने फुलते.
- फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी झाडाची हलकी छाटणी करणेही गरजेचे आहे. त्यामुळे नवीन फांद्या फुटतात आणि त्यावर अधिक कळ्या येतात.
- झाडावरील कोमेजलेली किंवा सुकलेली फुले त्वरित काढून टाका. त्यामुळे झाडाची ऊर्जा नवीन कळ्या तयार करण्यासाठी वापरली जाते.
तसेच माती कायम किंचित ओलसर राहील याची काळजी घ्या. मात्र, कुंडीत पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. योग्य सूर्यप्रकाश, वेळेवर पाणी आणि हा घरगुती सेंद्रिय द्रव यांचा वापर केल्यास जास्वंदाचे झाड फुलांनी बहरून जाईल आणि तुमची बाग अधिक सुंदर दिसू लागेल.
