Is Period Twice A Month Dangerous: मासिक पाळी ही महिलांसाठी एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, जेव्हा मासिक पाळीच्या सायकलमध्ये अचानक बदल होतो, तेव्हा काळजी वाटणे स्वाभाविक आहे. कधी कधी महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते, ही परिस्थिती सुरुवातीला चिंताजनक वाटत असली तरी ते नेहमीच एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण नसते. पण, ही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीर अनेकदा संकेत देत असते आणि ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारणपणे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे मानले जाते, परंतु २१ ते ३५ दिवसांचे चक्रदेखील सामान्य मानले जाते. जर तुमचे चक्र कमी दिवसांचे असेल तर तुम्हाला महिन्यातून दोनदा पाळी आल्यासारखे वाटू शकते. कधीकधी तणाव, आहारातील बदल किंवा निद्रानाशामुळे पाळीत चढ-उतार होऊ शकतो, पण जर हे सतत होत राहिले तर पाळी अनियमित मानली जाऊ शकते.
यामागे काय कारणं असू शकतात?
मासिक पाळी अनियमित येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन. शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या संतुलनातील बिघाडामुळे मासिक पाळीची वेळ आणि रक्तस्राव बदलू शकतो.
याव्यतिरिक्त, पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. या स्थितीमुळे अंडाशयामध्ये लहान गाठी तयार होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
गर्भाशयातील फायब्रॉइड्समुळे जास्त रक्तस्त्राव किंवा वारंवार मासिक पाळी येऊ शकते. थायरॉईडच्या समस्यांचाही मासिक पाळीवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी अनियमित होऊ शकते.
ही समस्या धोकादायक केव्हा बनते?
जर ही समस्या अधूनमधून उद्भवत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. पण, जर तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येत असेल, अतिरक्तस्राव होत असेल किंवा अशक्तपणा वा चक्कर येत असेल तर हे एक धोकादायक लक्षण असू शकते. जर हे दीर्घकाळ टिकून राहिले तर त्यामुळे ॲनिमियासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
काय उपाय करावे?
आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे. जर तुमची मासिक पाळी महिन्यातून दोनदा येत असेल किंवा वेदनादायी असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव कमी करणे हे देखील आवश्यक आहे. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष असले पाहिजे. वेळेवर लक्ष दिल्यास मोठ्या समस्या टाळता येतात.
(टीप- कोणतेही उपाय करण्या
