Frequent Urination Reason: तुम्हाला दिवसभर वारंवार टॉयलेटला जावं लागतं का? थोड्या-थोड्या वेळाने लघवीला जाण्याची इच्छा होते किंवा रात्रीही अनेक वेळा झोप मोडते का? वारंवार लघवी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जास्त पाणी पिणे, काही औषधे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर, डायबिटीज आणि पुरुषांमध्ये वाढलेली प्रोस्टेट यांसारख्या समस्यांमुळे वारंवार लघवी होऊ शकते. पण अनेक वेळा तुमचा आहारही ब्लॅडरवर परिणाम करू शकतो.

KIMS हॉस्पिटलचे अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर विश्वास एमआर यांचं म्हणणं आहे की, काही पदार्थांमुळे वारंवार लघवी होण्याची समस्या वाढू शकते. विशेषतः कॅफिन, कार्बोनेटेड ड्रिंक्स, आंबट फळं आणि मसालेदार पदार्थ काही लोकांमध्ये त्रास वाढवू शकतात.

कॅफिन असलेले पदार्थ

जर तुम्ही दिवसाची सुरुवात कॉफी किंवा चहाने करत असाल आणि दिवसभर अनेक कप घेत असाल, तर यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारखी कॅफिन असलेली पेये लघवी वाढवू शकतात आणि काही लोकांमध्ये ब्लॅडरचा त्रासही वाढवू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, याकडे लक्ष द्या.

आंबट फळं आणि त्यांचा ज्यूस

संत्रं, लिंबू, मोसंबी आणि इतर फळं अॅसिडिक म्हणजेच आम्लयुक्त असतात. काही लोकांमध्ये यामुळे ब्लॅडरला त्रास होऊ शकतो आणि वारंवार लघवीची गरज भासू शकते. विशेषतः आंबट फळांचा ज्यूस काही लोकांसाठी जास्त त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही फळं खाणं किंवा त्यांचा ज्यूस पिणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. पण ही फळं खाल्ल्यानंतर किंवा ज्यूस प्यायल्यानंतर वारंवार लघवीची समस्या होत असेल, तर त्यांचं सेवन कमी करून पाहा.

कार्बोनेटेड ड्रिंक्स

सोडा, कोल्ड ड्रिंक आणि इतर कार्बोनेटेड ड्रिंक्समुळेही काही लोकांमध्ये ब्लॅडरचा त्रास वाढू शकतो. विशेष म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये कॅफिनही असेल, तर दोन संभाव्य ट्रिगर एकाच वेळी काम करू शकतात. त्यामुळे वारंवार लघवीची तक्रार असलेल्या लोकांनी अशी पेये कमी करून पाहावीत.

खूप जास्त मसालेदार पदार्थ

मिरची आणि खूप जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही ब्लॅडरचा त्रास असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. मसालेदार पदार्थांचाही अशा गोष्टींमध्ये समावेश केला जातो, ज्यामुळे काही लोकांमध्ये ब्लॅडरची लक्षणं वाढू शकतात. जर मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार लघवी होणे, अचानक लघवीची तीव्र इच्छा होणे किंवा ब्लॅडरमध्ये जळजळ जाणवणे यांसारख्या समस्या होत असतील, तर त्याकडे लक्ष द्या.

प्रत्येक वेळी वारंवार लघवी होण्याचं कारण अन्न नसतं

हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की वारंवार लघवी होण्याचा अर्थ नेहमीच तुम्ही काही चुकीचं खाल्लं आहे, असा होत नाही. UTI, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर, डायबिटीज, जास्त प्रमाणात पाणी पिणे, काही औषधे आणि पुरुषांमध्ये वाढलेली प्रोस्टेट यांसारखी अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे फक्त काही पदार्थांपासून दूर राहणं पुरेसं नाही.

कोणता पदार्थ तुमचा त्रास वाढवतो हे कसं ओळखायचं?

प्रत्येक व्यक्तीचा ब्लॅडर वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे काही लोकांमध्ये एखादा विशिष्ट पदार्थ लक्षणं वाढवू शकतो, तर दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. यासाठी तुम्ही काही दिवस तुमच्या आहाराकडे लक्ष देऊन एक डाएट प्लॅन करून पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला कोणत्या पदार्थामुळे त्रास वाढतो हे समजण्यास आणि आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)