How to Stop Snoring Naturally: अनेकांना रात्री झोपताना नकळत घोरण्याची सवय असते. काहींना ही खूप साधी गोष्ट वाटते; पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत घोरणे हे कधी कधी आरोग्याशी संबंधित गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. विशेष म्हणजे, जी व्यक्ती घोरते तिला स्वतःला त्याची जाणीवही होत नाही; मात्र तिच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीसाठी हा आवाज अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. परिणामी त्या व्यक्तीची झोपही वारंवार बिघडू शकते.
रात्री शांत झोपेत अचानक मोठ्याने घोरणे सुरू झाले की, इतरांची झोपमोड होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड आणि डोकेदुखीसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता, त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक खूप थकलेले असतात किंवा ज्यांना सर्दी, नाक बंद होणे, घशात खवखव किंवा कफ वाढणे यांसारख्या समस्या असतात, त्यांच्यामध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक वाढते. विशेषतः हिवाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. एका अंदाजानुसार १८ वर्षांवरील सुमारे ४५ टक्के लोकांना कधी ना कधी घोरण्याचा त्रास जाणवतो.
बाजारात घोरणे कमी करण्यासाठी विविध औषधे उपलब्ध असली तरी आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, काही नैसर्गिक उपाय आणि सवयींमध्ये बदल करूनही ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते.
१. झोपण्याची पद्धत बदला
घोरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाठीवर झोपण्याची सवय. पाठीवर झोपल्यावर जीभ व टाळू एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यामुळे श्वसनमार्ग अंशतः बंद होतो आणि घोरण्याचा आवाज येऊ लागतो.
त्यावर सर्वांत सोपा उपाय म्हणजे कुशीवर (करवट घेऊन) झोपठणे. या स्थितीत श्वसनमार्ग मोकळा राहतो आणि घोरणे कमी होण्यास मदत होते. तसेच रोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. झोप अपुरी राहिल्यास घशातील स्नायू सैल होतात आणि त्यामुळे घोरणे वाढू शकते.
२. उशी आणि बेड स्वच्छ ठेवा
अनेक जण उशीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. मात्र, उशीमध्ये धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होतात. त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते किंवा नाक बंद होण्याची समस्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे घोरणे वाढते.
म्हणूनच दर दोन आठवड्यांनी उशी उन्हात वाळवणे आणि उशीचे कव्हर नियमित धुणे आवश्यक आहे. त्यामुळे जंतू आणि धूळ कमी होते. तसेच झोपताना डोके थोडे उंच ठेवले, तर श्वसन अधिक सुरळीत होते आणि घोरणे कमी होण्यास मदत होते.
३. थकवा आणि सर्दी टाळा
खूप थकवा, सर्दी किंवा घशात कफ साचल्यास श्वसनमार्गावर परिणाम होतो आणि घोरणे वाढू शकते. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती देणे, गरम पाणी पिणे आणि सर्दी-खोकल्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका
कधी कधी घोरणे सामान्य असू शकते. मात्र, जर ही समस्या दीर्घकाळ कायम राहत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा हे झोपेशी संबंधित गंभीर विकाराचे लक्षण असू शकते.
म्हणूनच रात्रीचे घोरणे हा केवळ त्रासदायक आवाज नसून, शरीर देत असलेला एक इशारा असू शकतो. योग्य वेळी काळजी घेतली आणि काही साध्या सवयी बदलल्या, तर या समस्येवर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते.
